टंचाई काळातील सिंचन पाणीपुरवठा प्रकल्पाच्या थकित वीज देयकाची रक्कम तात्काळ अदा करा - जलसंपदामंत्री जयंत पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 6 :  टंचाई काळातील सिंचन पाणीपुरवठा प्रकल्पांच्या वीज देयकाची प्रलंबित असलेली रक्कम मदत आणि पुनर्वसन विभागाने तात्काळ अदा करावी, अशा सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

आज विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टेंभू उपसा सिंचन योजना, विसापूर उपसा सिंचन योजना, म्हैसाळ उपसा सिंचन योजना, ताकारी उपसा सिंचन योजना, राधानगरी, दुधगंगा, वारणा आणि तुळशी प्रकल्प, कण्हेर, उरमोडी प्रकल्प आणि धोम आणि धोम बलकवडी प्रकल्पाच्या कालवा समित्यांची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस कालवा समितीचे सदस्य व जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बिगर सिंचन पाणीपुरवठा वीज देयकाच्या थकित रकमेच्या वसुलीसाठी एक निश्चित कार्यक्रम आखण्यात यावा अशा सूचना देऊन श्री. पाटील म्हणाले, यासंदर्भात मदत पुनर्वसन व वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेण्यात यावी.

शाश्वत स्वरूपात पाणी मिळते आहे असा अनुभव आल्यानंतर लोकांची, शेतकऱ्यांची पाण्याबाबतची मागणी किंवा तक्रारी कमी होतील त्यादृष्टीने पाणी वाटपाचे परिपूर्ण नियोजन व्हावे असेही ते म्हणाले. मंगळवेढा, सांगोला तालुक्याला पाणी देण्यासाठी ठोस उपाय सुचविण्यात यावा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीत राधानगरी, दुधगंगा, वारणा, तुळशी प्रकल्प, धोम आणि धोम बलकवडी प्रकल्प, कण्हेर व उरमोडी प्रकल्प, टेंभू, विसापूर, म्हैसाळ, ताकारी प्रकल्पातील सध्या उपलब्ध पाणीसाठा, रब्बी व उन्हाळ हंगामाचे नियोजन, खरीपासाठी भविष्यात द्यावयाची पाण्याची आवर्तने यासंबंधीचे सादरीकरण करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.