उदगीर, कर्जतला नवीन एमआयडीसी - उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 29 : उदगीर आणि कर्जत येथील नवीन एमआयडीसी उभारण्यासाठी तत्वत: मान्यता देण्यात आली असून यामुळे रोजगार निर्माण होणार असल्याचे  आदिती तटकरे यांनी आज सांगितले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 385 वी बैठक मंत्रालयातील दालनात आयोजित केली होती. त्यावेळी कुमारी तटकरे बोलत होत्या.

कर्जत येथील एमआयडीसी उभारण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागेची पाहणी करण्याचे निर्देश उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कर्जत येथेही एमआयडीसी उभारणार असल्याने अधिकाधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार रोहित पवार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अनबलगन, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय काटकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
०००
संगिता बिसांद्रे/29.1.2020

'सीएए' चा राज्यातील नागरिकाला त्रास होऊ देणार नाही - गृहमंत्री अनिल देशमुख यांची स्पष्ट भूमिका

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 29 : नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी महाराष्ट्र शासनाची भूमिका स्पष्ट असून राज्यातील एकाही नागरिकाला या कायद्याचा त्रास होऊ देणार नाही वा नागरिकत्व गमवावे लागणार नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

मंत्रालय वार्ताहर कक्षामध्ये श्री. देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, नागरिकत्त्व सुधारणा कायद्याविषयी देशभरात अस्वस्थता आणि संभ्रम दिसून येत आहे. यासंबंधी अनेक मुस्लिम संघटनांकडून निवेदने प्राप्त झाली आहेत. या निवेदनाबरोबरच विशेषत: आदिवासी, भटक्या व विमुक्त जाती-जमाती तसेच दलित संघटना अशी हिंदू धर्मातील संघटनांचीही निवेदने प्राप्त झाली आहेत. त्यात प्रामुख्याने वडार, पारधी, गोसावी, कुडमुडे जोशी, लमाण, कैकाडी, रामोशी, भिल्ल आदी जाती, जमातींचा समावेश आहे.

गृहमंत्री श्री. देशमुख म्हणाले, या समाजांनी आपल्या निवेदनात स्पष्टपणाने आपल्या अस्तित्वाविषयीच चिंता व्यक्त केली आहे. या सर्व जाती-जमातींना, सर्व धर्मीयांना आम्ही आश्वस्त करीत आहोत की, एकाही नागरिकाला आपले नागरिकत्व गमवावे लागणार नाही.

आजपर्यंत अत्यंत शांततेने चालू असलेली सभा, संमेलने ज्यामध्ये गांधी, आंबेडकर विचारांचे दर्शन होते आहे. हीच पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती आहे. कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता महाराष्ट्राची पुरोगामी संस्कृती जपत, राज्याच्या परंपरेला गालबोट लागणार नाही, याची काळजी आपण सर्वजण घेऊया, असे आवाहनही श्री. देशमुख यांनी यावेळी केले.
0000
सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.29.1.2020

बचतगट चळवळीमुळे गरीबी निर्मूलनास मदत - ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत'महालक्ष्मी सरस'ने गाठला 15 कोटींच्या उलाढालीचा टप्पा
      
मुंबई, दि. 29 : महालक्ष्मी सरस प्रदर्शनास मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून पुढील वर्षी प्रदर्शनात स्टॉलची संख्या वाढविली जाईल. मुंबईकरांनी प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद दिला, यामुळे गावातील महिलांच्या आयुष्यातील गरीबी कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे केले. यावर्षी जवळपास 15 कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा या प्रदर्शनाने गाठला, अशी माहिती विभागामार्फत देण्यात आली.
      
मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनास बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ग्रामविकास विभागातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानमार्फत 17 जानेवारीपासून राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शन बीकेसी येथे भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचा समारोप मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात झाला. त्यावेळी ते बोलत होते. प्रदर्शनात उत्कृष्ट काम करणाऱ्या स्वयंसहाय्यता गटांना यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
      
मागील दीड दशकात महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून अंदाजे 8 हजार स्वयंसहाय्यता समूहांनी मुंबईकरांना सेवा दिली आहे. पहिल्या वर्षी 50 लाखांची आर्थिक उलाढाल झाली होती तर यावर्षी जवळपास 15 कोटींच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा या प्रदर्शनाने गाठला आहे.

महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता गटांबरोबर 29 राज्यांमधून विविध उत्पादने, कला घेऊन स्वयंसहाय्यता गट तसेच ग्रामीण कारागीर सहभागी झाले होते.सिताफळ रबडी, रागी कुकीज आणि हातसडीचा तांदुळ
      
प्रदर्शनात यावर्षी सिताफळ रबडी, आंबाडीचे ज्यूस, रागी कुकीज हे ग्राहकांचे आकर्षण ठरले. तसेच जळगावचे भरीत, खानदेशचे मांडे, कोकणातील मच्छी व तांदळाची भाकरी, कोल्हापूरचा तांबडा - पांढरा रस्सा, सोलापूरची शेंगाचटणी, राज्यातील विविध भागातील मसाले, हातसडीचा तांदूळ, गोंदिया जिल्ह्यातील महिलांनी शोधून काढलेला एलईडी बल्ब, कोल्हापुरी चप्पल आदींची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. यावर्षी गावातील महिलांच्या शेतकरी उत्पादक संघांनी गावातील भाजीपाला, चिकन व मटणाचा पुरवठा केला ही नाविन्यपूर्ण बाब होती.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बचगटांना पारितोषिके
      
सर्वाधिक विक्री - उत्पादने (महाराष्ट्र) या प्रवर्गात हरीओम स्वयंसहाय्यता गट, जि. लातूर यांना प्रथम क्रमांक, वरद विनायक स्वयंसहाय्यता गट, रायगड यांना द्वितीय तर विघ्नहर्ता स्वयंसहाय्यता गट यांना तृतीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले. सर्वाधिक विक्री - उत्पादने (इतर राज्य) या प्रवर्गात शिल्पयान महिला बचतगट, पश्चिम बंगाल यांना प्रथम क्रमांक, रेणु हॅन्डलुम व हॅन्डी क्राफ्ट, मणिपूर यांना व्दितीय क्रमांक तर मेखा महिला बचतगट, केरळ यांना तृतीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले.
      
सर्वाधिक विक्री - उत्पादने (फूड पॅराडाईज) या प्रवर्गात सामकादेवई स्वयंसहाय्यता गट, बीड यांना प्रथम, जयलक्ष्मी स्वयंसहाय्यता गट, नागपूर तर श्री वैष्णवीदेवी स्वयंसहाय्यता गट, ठाणे यांना तृतीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले.
      
नाविन्यपूर्ण उत्पादने या प्रवर्गात एलईडी बल्ब लाईट गेल्यानंतर सुध्दा चार तास चालू शकतो असा शोध लावणाऱ्या हरिओम स्वयंसहाय्यता गटास गौरविण्यात आले.
      
उत्कृष्ट सादरीकरण व उत्पादने मांडणी या प्रवर्गात संस्कृतिक स्वयंसहाय्यता गट, सातारा यांना प्रथम क्रमांक, आस्था स्वयंसहाय्यता गट, अमरावती यांना व्दितीय तर नरेंद्रछाया स्वयंसहाय्यता गट, लातुर यांना तृतीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले.
         
नव उद्योग प्रवर्गात यशवंती शेतकरी उत्पादक कंपनी, पालघर यांचा गौरव तर सर्वाधिक म्हणजेच 62 लक्ष रुपयाचे आर्थिक व्यवहार करणाऱ्या बीसी सखीचा गौरव करण्यात आला. तसेच न्युटी व्हिला, उपजीविका हॅब व सेंद्रीय शेतीचे प्रदर्शन मांडणी करणाऱ्या उत्पादक संघ, प्रभागसंघ, ग्रामसंघ व स्वयंसहाय्यता गट, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला.

कार्यक्रमास उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर. विमला, तारक मेहता का उलटा चष्मा मधील कलाकार कोमल भाभी व रोशन सोधी उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन मुख्य परिचालन अधिकारी रविंद्र शिंदे यांनी केले तर सूत्रसंलन राज्य अभियान व्यवस्थापक (एचआर) रामदास धुमाळे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमधील पारितोषिकांची रक्कम वाढविणार - क्रीडामंत्री सुनिल केदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

        

मुंबई, दि. 29 : राज्यातील देशी खेळांकडे खेळाडूंना आकृष्ट करण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमधील पारितोषिकांची रक्कम वाढविणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.
          
मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनाविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, आयुक्त ओमप्रकाश बकोरीया, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे प्रा.बाळासाहेब लांडगे, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव संदिप तावडे आदींची उपस्थिती होती.
          
श्री. केदार म्हणाले, राज्यातील ग्रामीण व शहरी भागात अद्यापही लोकप्रियता टिकून असलेले कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती, खो-खो हे खेळ राज्यात सर्वत्र खेळले जातात. या खेळांचा राज्यात अधिक प्रसार व्हावा या उद्देशाने व राज्यातील सर्व भागातील खेळाडू व क्रीडा प्रेमींना खेळाडूंचे दर्जेदार खेळ व कौशल्य पाहण्याची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा, स्व.खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा, कै.भाई नेरुरकर चषक खो-खो क्रीडा स्पर्धांचे शासन आणि संबंधित खेळांच्या राज्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन केले जाते, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व वाढ होण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धा व खेळांच्या माध्यमातून युवा पिढीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन महत्वाचे आहे. याकरिता खेळाडूंसाठी जास्तीत जास्त स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे त्यांच्या सुप्त क्रीडा गुणांना वाव मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा. स्पर्धांच्या आयोजनांसाठी पूर्वीपेक्षा अधिकचा निधी देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासह भोजन, निवास, प्रवास या सोयी-सुविधांसाठीही निधी वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
000
राजू धोत्रे/वि.सं.अ/29/01/2020

विद्यापीठ अभ्यास मंडळांनी अधिकाधिक संदर्भ पुस्तके तयार करावीत - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


राज्यपालांच्या हस्ते प्राणीशास्त्र पुस्तकाचे प्रकाशन


मुंबई दि. 29 : मुंबई विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अभ्यासमंडळाने तयार केलेल्या प्राणीशास्त्र विषयातील शंभराव्या पुस्तकाचे प्रकाशन करताना आनंद होत असून आगामी काळात विद्यापीठाच्या इतरही अभ्यास मंडळांनी संदर्भ पुस्तके तयार करावीत. आज ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रेस प्रमाणे मुंबई विद्यापीठानेही गुणवत्तापूर्ण आणि माफक दरात पुस्तके प्रसिद्ध करावीत अशी अपेक्षा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.

राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाने तयार केलेल्या 'टॅक्सोनॉमी ऑफ कॅारडेट्स' पुस्तकाचे प्रकाशन राजभवन येथे करण्यात आले. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर, प्र कुलगुरु रवींद्र कुलकर्णी, प्रा. विनायक दळवी, यांच्यासह  प्राणीशास्त्र अभ्यासमंडळाचे सदस्य, पुस्तकाचे लेखक, आदी उपस्थित होते.

श्री. कोश्यारी यावेळी म्हणाले, मुंबई विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाने तयार केलेल्या शंभराव्या आणि मुंबई विद्यापीठाने स्वतः प्रकाशित केलेल्या 'टॅक्सोनॉमी ऑफ कॅारडेट्स' या पुस्तकाचे प्रकाशन करणे ही आनंदाची बाब आहे. आगामी काळात अधिकाधिक पुस्तक मंडळांनी आपल्या विषयाची पुस्तके प्रकाशित होण्यावर भर देणे आवश्यक आहे. जवळपास दीड वर्षापूर्वी प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाने तयार केलेल्या 50 व्या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते तर आज शंभराव्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. त्यामुळेच पुढील दोन वर्षात या अभ्यास मंडळाने पुस्तक तयार करण्याचे द्विशतक गाठावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष प्रा. विनायक दळवी यांच्या संकल्पेतून साकारलेला हा प्रकल्प आहे. अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक तयार करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडेल एवढ्या कमी किमतीत अशी पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

महाराष्ट्रात करोना व्हायरसबाधित एकही रुग्ण नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 4600 प्रवाशांचे स्क्रिनिंग
- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. 29 : महाराष्ट्रात करोना व्हायरसमुळे बाधित झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही. सध्या 10 रुग्ण मुंबई, पुणे आणि नांदेड येथे दाखल असून त्यांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. 17 प्रवाशांची दूरध्वनीद्वारे विचारपूस केली जात आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 4600 प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

राज्यात सध्या 27 प्रवासी निरीक्षणाखाली असून त्यातील 10 प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील सहा जणांना मुंबई येथे, तीन जणांना पुणे येथे आणि एकाला नांदेड येथे दाखल करण्यात आले आहे. या दहा जणांचे नमुने एनआयव्ही कडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सहा जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. उर्वरित चार जणांच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. तीन जणांचे नमुने दुसऱ्यांदा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांचाही अहवाल अद्याप अप्राप्त आहे. उर्वरित 17 प्रवाशांची दूरध्वनीद्वारे रोज विचारपूस केली जात आहे.

'करोना' व्हायरसग्रस्त रुग्णांसाठी मुंबईत कस्तुरबा आणि पुणे येथे नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
००००
अजय जाधव/विसंअ/29.1.2020

सरपंचाची निवड सदस्यांमधून होणार असल्याने ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होईल - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 29 : सरपंचांची निवड थेट लोकांमधून निवडणुकीद्वारे करण्याऐवजी आता पूर्वीप्रमाणेच निवडून आलेल्या सदस्यांमधून करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे सरपंच आणि सदस्य यांच्यामध्ये सुसंवाद वाढून ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होईल, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामधील कलम 7, कलम 13, कलम 15, कलम 35, कलम 38, कलम 43, कलम 62, कलम 62 अ मध्ये सुधारणा व कलम 30 अ - 1 ब व कलम 145-1 अ चा नव्याने समावेश करण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली. संबंधित कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

श्री. मुश्रीफ म्हणाले, सध्या सुरु असलेल्या सरपंचांच्या थेट निवडीच्या पद्धतीमुळे त्याचा विपरीत परिणाम गावाच्या विकास कामावर झाल्याचे दिसून येत आहे. सरपंच एका विचाराचे व सदस्य दुसऱ्या विचाराचे असे चित्र अनेक ग्रामपंचायतींमध्ये दिसत आहे. थेट निवडून आलेले सरपंच व सदस्य यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे अनेक ठिकाणी दिसते. याचा गावाच्या विकास कामावर परिणाम होत आहे. आपल्या देशात अध्यक्षीय पद्धती नाही, तर मग गावात थेट सरपंच निवडीची पद्धती का ? असा प्रश्न यापूर्वी उपस्थित केला होता. त्यामुळे सरपंचांची थेट निवडीची पद्धती रद्द करुन सदस्यांमधून सरपंच निवड करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.

या निर्णयाबद्दल श्री. मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्यांचे आभार मानले.
००००
इरशाद बागवान/विसंअ/29.1.2020

मेट्रो - ३ च्या भुयारीकरणाचा पंचविसावा टप्पा पूर्ण; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची उपस्थिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. २९ : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो मार्ग ३ च्या भुयारीकरणाचा पंचविसावा टप्पा वरळी येथे राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. एकूण ७ पॅकेज असलेल्या या मार्गातील पॅकेज - ३ चा हा भुयारीकरणाचा पहिलाच टप्पा होता. मेट्रो -३ मार्गिकेतील पॅकेज -३ हे सर्वात लांब पॅकेज असून या अंतर्गत मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक व वरळी या स्थानकांचा समावेश आहे.

पॅकेज-३ चे टनेल बोअरिंग मशीन 'तानसा-१' सायन्स म्युझियमच्या उत्तर दिशेपासून २७ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यान्वित झाले. अनेक भौगोलिक आव्हानांना सामोरे जाऊन अप लाईन बोगद्याचे २ हजार ७३ मीटर भुयारीकरण पूर्ण केले आहे. या भुयारीकरणासाठी १ हजार ३८१ सेगमेंट रिंग्सचा वापर करण्यात आला आहे. एकूण १७ टीबीएम सध्या ३३.५ किमी लांब मार्गिकेवर कार्यरत आहेत.

वाहतुकीच्या दृष्टीने कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा मेट्रो मार्ग ३ महत्त्वाचा प्रकल्प आहे. यामुळे मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासाच्या समस्या सुटतील. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे पर्यटन व पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. मेट्रो -३ मार्गिकेवरील काम प्रगतीपथावर असल्याचे बघून आनंद वाटला. प्रकल्पाचे  आतापर्यंत जवळपास ७८ टक्के भुयारीकरण व ५० टक्क्यांहून अधिक बांधकाम पूर्ण झाले आहे. एमएमआरसी याच उत्साहाने व गतीने प्रकल्पाचे काम सुरू ठेवेल, असेही मंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.

मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल म्हणाले,  प्रकल्पाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठल्याचा आनंद आहे. आमच्या अभियंत्यांच्या व तज्ज्ञांच्या टीमने हे आव्हानात्मक काम सुलभरित्या पार पाडले आहे. आतापर्यंत उपनगरीय रेल्वेद्वारे न जोडली गेलेली मुख्य व्यापारी केंद्र पॅकेज-३ द्वारे जोडली जाणार आहेत. मेट्रो-३ कार्यान्वित झाल्यावर या भागात नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होईल, असेही श्री. देओल म्हणाले.
0000
इर्शाद बागवान/विसंअ/दि.२९.०१.२०२०

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 29 : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

बेस्ट जनतेसाठीची अत्यावश्यक सेवा असून जनतेला सुव्यवस्थ‍ित सोयी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. बेस्ट समिती व मुंबई महानगरपालिका यांच्यात झालेल्या ठरावानुसार बेस्टचे सुनियोजीत व्यवस्थापन करण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेवर असून या जबाबदारीचे पालन महानगरपालिकेने करणे गरजेचे आहे. तसेच बेस्टच्या उत्पादनात अधिकाधिक वाढ होण्याच्या दृष्टीने  मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा. कर्मचाऱ्यांचे पगार नियमित व्हावे. कामगारांवर कुठलाही अन्याय होणार नाही, याची महानगरपालिकेने दक्षता घ्यावी, असेही श्री.पटोले यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बैठकीत बेस्ट उपक्रमातील अतिरिक्त मनुष्यबळाची कपात करू नये, कंत्राटाने बसवाहक कर्मचारी नियुक्त करण्याचा बेस्ट समितीचा निर्णय मागे घेण्यात यावा, विनावाहक बसगाड्या चालविण्याचा निर्णय रद्द करावा, सेवानिवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांच्या अंतिम देयकाचे प्रदान तातडीने करण्यात यावे. बेस्ट कर्मचाऱ्यांवर अन्याय न करता वेतनकरार करण्यात यावा याबाबत तसेच मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमाशी संबंधित '' अर्थसंकल्पाचे विलिनीकरण मुंबई महानगरपालिकेच्या अ अर्थसंकल्पात करणेबाबतचा प्रस्ताव शासनास लवकरात लवकर पाठवावा चर्चा झाली. कामगारांच्या  प्रलंबित  मागण्या लवकर पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्याचे यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.

यावेळी बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे, कर्मचारी व्यवस्थापक शंकर नायर, बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष अरविंद कादीनकर, जनरल सेक्रटरी शशांक राव, बेस्ट एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नितिन पाटील तसेच संबंधित अधिकारी  उपस्थित होते.
००००
संगिता बिसांद्रे/29.1.2020

मीरा भाईंदर, ठाण्याच्या डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे काम सुरु करण्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 29 : मिरा भाईंदर व ठाणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाला आवश्यक परवानगी व निधी देण्यात आला असून या भवनाचे काम तात्काळ सुरु करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

मीरा भाईंदर व ठाणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या निर्मितीबाबत आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आली त्यावेळी श्री. मुंडे बोलत होते.

मंत्री श्री. मुंडे म्हणाले, मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील मौजे घोडबंदर सर्वे क्र. 233, 3800 चौ.मी. जागेवर सांस्कृतिक भवन, विपश्यना केंद्र व बहुउद्देशीय इमारत बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मीरा भाईंदर येथील सांस्कृतिक भवनाला 12 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. तसेच ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधील घोडबंदर रोड परिसरामध्ये कासारवडवली येथील 1700 चौ.मी. सुविधा भूखंड डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठी देण्यात आलेला आहे. ठाणे येथील सांस्कृतिक भवनाला 11 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. या दोन्ही भवनाच्या आवश्यक त्या परवानग्या व निधी देण्यात आला असून काम सुरु करण्याचे निर्देश यावेळी श्री. मुंडे यांनी दिले.

यावेळी आमदार प्रताप सरनाईक, सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन, मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त बालाजी खतगावकर, तहसिलदार नंदकुमार देशमुख व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
000
दत्तात्रय कोकरे/विसंअ/29.1.2020

संत चोखामेळा जन्मस्थळ असलेल्या मेव्हुणाराजाच्या विकासासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी - मंत्री धनंजय मुंडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 29 : संत चोखामेळा यांचे जन्मस्थळ असलेल्या मेव्हुणाराजा, ता. देऊळगाव, जि. बुलढाणा येथील  समाज मंदिर बांधकामास साडेचार कोटी रुपये देणार असून 14 एप्रिल 2021 ला याचे उद्घाटन करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

संत चोखामेळा जन्मस्थळ विकासकामाबाबत आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री. मुंडे बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत असलेली घटनास्थळे व महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना पर्यटनाचा दर्जा देऊन या स्थळांचा विकास करणे याअंतर्गत संत चोखामेळा जन्मस्थान मेव्हुणाराजा ता. देऊळगाव राजा येथील जन्मस्थळ विकसित करण्यात येणार आहे.

श्री. मुंडे म्हणाले, संत चोखामेळा जन्मस्थळ मेव्हुणाराजा येथील समाज मंदिरास साडेचार कोटी रुपये देणार असून त्याव्यतिरिक्त नव्याने फर्निचरसाठी सुधारित प्रस्ताव तात्काळ सादर करावे. यापूर्वी शासनाने 51 लाख रुपयांचा निधी दिला होता त्याची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. जन्मस्थळ परिसराचे सुशोभीकरण पूर्णत्वास आले आहे. जन्मस्थ्‍ाळाच्या विकासकामासाठी आवश्यक असल्यास वाढीव निधी देण्यात येणार आहे.

यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या विले पार्लेतील चर्चचे सुयोग्य पुनर्वसन करण्याचे मंत्री नवाब मलिक यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 29 : मुंबई महापालिकेच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे बाधित होत असलेल्या विले पार्ले येथील दि पेन्टीकोस्टल मिशन सोसायटीच्या चर्चच्या प्रश्नासंदर्भात अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. महापालिकेने रस्ता रुंदीकरण करताना चर्च इमारतीच्या होणाऱ्या नुकसानीसाठी त्यांना योग्य भरपाई द्यावी, चर्चचे सुयोग्य पुनर्वसन करावे आणि अल्पसंख्याक ख्रिस्ती समाजाच्या धार्मिक हक्कांचे संरक्षण करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.

मुंबई महापालिकेने या चर्चला निष्कासनासंदर्भात नोटीस बजावली आहे. तथापि हे चर्च १९५२ पूर्वीपासून कार्यरत आहे. ख्रिस्ती समाजबांधव येथे प्रार्थनेसाठी येतात. या प्रार्थनास्थळाजवळून जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मुंबई महापालिका करणार आहे. त्यामुळे चर्च इमारतीस बाधा पोहोचत आहे. मुंबई महापालिकेने हे काम करताना नियमानुसार प्रक्रियेचे पालन करुनच कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री श्री. मलिक यांनी यावेळी दिल्या.

पुनर्वसनासाठी चर्चला इतरत्र सुयोग्य जागा आणि बांधकाम खर्च द्यावा किंवा आजच्या रेडीरेकनरच्या दरानुसार दुप्पट भरपाई देण्यात यावी, असे दोन पर्याय यावेळी सुचविण्यात आले. त्यापैकी पहिल्या पर्यायास चर्च प्रतिनिधींनी संमती दर्शविली. महापालिकेने सुयोग्य जागेवर चर्चचे पुनर्वसन करावे आणि बांधकाम खर्च द्यावा, असे चर्च प्रतिनिधींनी मान्य केले. त्यावर विहित प्रक्रियेचे पालन करुन चर्चचे योग्य पुनर्वसन करण्यात यावे. अल्पसंख्याक समुदायाच्या धार्मिक हक्कांचे संपूर्ण संरक्षण करण्यात यावे. प्रार्थनास्थळ हलविण्यासारख्या संवेदनशील विषयांवर प्रशासनाने त्या समुदायाशी चर्चा करुन संवादातून मार्ग काढावा, अशा सूचना मंत्री श्री. मलिक यांनी यावेळी दिल्या.

बैठकीस अल्पसंख्याक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी, सहसचिव एस. सी. तडवी, महापालिकेच्या बांधकाम विभागाचे प्रमुख अभियंता विनोद चिटोर, उपप्रमुख अभियंता चक्रधर कांडीलकर, चर्चचे पदाधिकारी पास्टर रॉबर्ट एस., पास्टर मॉस्को के., के. व्ही. बेंजामिन, कुरीअन चेरीयन, गणेश फर्नांडीस, श्रीमती निलोफर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
००००
इर्शाद बागवान/विसंअ/दि.२९.०१.२०२०

'कॉमा' माहितीपटाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते अनावरण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 29 : कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचे निदान वेळीच होणे गरजेचे असल्याने कर्करोगाविषयी जनजागृती होणे अतिशय आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

कर्करोगावर मात केलेल्या श्रीमती अलका भुजबळ यांच्या जीवनावर आधारित 'कॉमा' माहितीपटाचे अनावरण राजभवन येथे  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक देवेंद्र भुजबळ, रिलायन्स हॉस्प‍िटलचे डॉ.गुस्ताद डावर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.रेखा डावर, 'कॉमा' पुस्तकाच्या लेखिका श्रीमती अलका भुजबळ, कॉमा माहितीपटाचे दिग्दर्शक आशिष निनगुरकर आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, कर्करोगाविषयी जनजागृती होणे अतिशय आवश्यक असून यावर त्वरित उपाययोजना झाल्यास काही बाबतीत नियंत्रण ठेवता येऊ शकते. स्वत: कर्करोगावर यशस्वी मात केलेल्या लेखिका श्रीमती अलका भुजबळ यांचे अभिनंदन करताना त्यांच्या 'कॉमा' या पुस्तकातून तसेच माहितीपटातून लोक प्रेरणा घेतील, असा विश्वास राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी व्यक्त केला.

कॉमा पुस्तकाच्या प्रतीची भेट दिली असताना श्री.कोश्यारी म्हणाले, या पुस्तकामध्ये स्वत:च्या संघर्षाची कहाणी मांडण्यात आली आहे, या पुस्तकाचे हिंदी व इंग्रजीमध्ये अनुवाद होणे आवश्यक आहे. 

श्रीमती अलका भुजबळ म्हणाल्या, कर्करोगावर मात करत असताना मला कुटुंबाचा खूप मोठा आधार मिळाला. तसेच माझ्या कुटुंबातील व्यक्तींनी मला प्रोत्साहन देऊन मोलाचे सहकार्य केले. आपण ज्या डॉक्टरांकडून उपचार घेतो, त्या डॉक्टरांवर विश्वास ठेवणे  महत्त्वाचे असते. कर्करोगाला घाबरु नका तर त्यावर मात करा, असेही आवाहन श्रीमती भुजबळ यांनी यावेळी केले.

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.रेखा डावर म्हणाल्या, स्त्रियांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. चाळीशीनंतर सर्व स्त्रियांनी दरवर्षी ठराविक तपासण्या करुन घेण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले. 

माहितीपट पाहिल्यानंतर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे म्हणाले, श्रीमती अलका भुजबळ यांनी कर्करोगावर जी मात केली आहे, ती निश्चितच कौतुकास्पद आहे. कर्करोगाला न घाबरता त्यावर मात करणाऱ्या श्रीमती भुजबळ स्वत: एक आदर्श आहेत. त्यांनी या माहितीपटामध्ये स्वत:च्या संघर्षाची कहाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा लढा कर्करोगग्रस्तांसाठी नव्हे तर इतरांसाठीदेखील प्रेरणादायी आहे, असा विश्वास श्री.पांढरपट्टे यांनी व्यक्त केला.

समाजात कर्करोगाबद्दल जी भीती आहे, त्याबद्दलचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. कर्करोगावरसुद्धा मात करता येऊ शकते. त्याचे उदाहरण स्वत: श्रीमती भुजबळ आपल्यासमोर आहेत. कर्करोगाशी सामना कशा प्रकारे केला जातो हे ह्या माहितीपटाच्या माध्यमातून आपल्या समोर येत असल्याचेही श्री.पांढरपट्टे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन श्री.देवेंद्र भुजबळ यांनी केले तर आभार श्रीमती अलका भुजबळ यांनी मानले. प्रारंभी डॉ.गुस्ताद डावर यांनी राज्यपालांना शाल, पुष्पगुच्छ देऊन तर डॉ.रेखा डावर यांनी स्मृतीचिन्ह देऊन गौरविले.

Blogger द्वारा समर्थित.