महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमी येथे सर्व आवश्यक सोयी-सुविधा पुरविणार - विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 14 : महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्क येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी येणाऱ्या अनुयायी जनतेला प्रशासनातर्फे सर्व आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यात येतील, अशी ग्वाही कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी आज दिली.

महापरिनिर्वाणदिनानिमित्त राज्यातून तसेच परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात डॉ. आंबेडकर यांचे अनुयायी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमी येथे येत असतात. त्या ठिकाणी पुरवावयाच्या सोयी-सुविधांबाबत आढावा घेण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. दौंड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, मुंबई पोलीस दलाच्या परिमंडळ -5 च्या पोलीस उपायुक्त नियती ठाकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आदी उपस्थित होते.

बैठकीमध्ये चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्ककडे येणारे रस्ते व त्यावरील वाहतुकीचे नियंत्रण, सुरक्षाव्यवस्था, परिसरातील स्वच्छता, शौचालयांची व्यवस्था, चैत्यभूमीशेजारील समुद्रावर अधिकची सागरी जीवरक्षक नौकांची व्यवस्था करणे, आरोग्य विभागातर्फे आरोग्य तपासणी या अनुषंगाने श्री. दौंड यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शन दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात यावे, मार्गावर सीसीटीव्हीची व्यवस्था, विद्युतव्यवस्था करण्यात यावी तसेच रेल्वे विभागाने या दिवशी रेल्वेसेवा सुरळीत चालविण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

शिवाजी पार्क येथे अनुयायींना भोजनासाठी व्यवस्था दरवर्षीप्रमाणे करण्याबरोबरच चैत्यभूमीकडे येणाऱ्या रस्त्यांच्या प्रारंभी पर्यायी अन्नदानाची व्यवस्था करण्यात आल्यास शिवाजी पार्क येथील व्यवस्थेवर ताण येणार नाही याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच अन्नाचा दर्जा तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला सूचना देण्यात येतील, असेही सांगण्यात आले. राज्यातून मोठ्या प्रमाणावर अनुयायी येत असल्यामुळे एसटीने दरवर्षीप्रमाणे अधिकच्या बसेस सोडाव्यात अशा सूचनाही देण्यात आल्या.

बोरीवली येथील ग्लोबल विपश्यना पॅगोडाला कमी शुल्कात भेट देण्याची संधी भीम अनुयायींना मिळावी यासाठी प्रयत्न करण्याची सूचना श्री. कांबळे यांनी यावेळी केली. बैठकीस बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस, बेस्ट, वाहतूक विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सामाजिक न्याय विभाग, तटरक्षक दल, रेल्वे आदी विभागांचे अधिकारी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे  पदाधिकारी उपस्थित होते.  

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.14.11.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.