डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना; ३० नोव्हेंबर अर्ज करण्याची अंतिम मुदत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 15 : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरशांनी विहित अटी व शर्तींची पूर्तता करुन 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याची दिनांक 30 नोव्हेंबर 2019 ही अंतिम मुदत आहे.

या योजनेअंतर्गत मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपरिक धार्मिक शिक्षणाबरोबर विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी आणि उर्दू या विषयांचे शिक्षण देणे, मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इयत्ता 9 वी, 10वी, 11वी आणि 12वी यातील तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, जेणेकरुन त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत व रोजगार क्षमतेत वाढ होऊन त्यांचा आर्थिक दर्जा सुधारण्यास मदत होईल यादृष्टीने मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान देणे, शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देण्याची डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना शासनाने आणली आहे.

राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणी केलेल्या तसेच मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरसे या योजनेसाठी पात्र ठरतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई 400001 या पत्त्यावर सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे. या योजनेसाठीच्या अर्जाचा नमुना शासनाच्या https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.