राष्ट्रपतींच्या हस्ते शारदा दाते यांना वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


नवी दिल्ली, 03 : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शारदा दाते यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कारप्रदान करण्यात आला.

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने 1 ऑक्टोबर या आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात वयोश्रेष्ठ  पुरस्कार-2019प्रदान करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत, राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर आणि विभागाच्या सचिव निलम साहनी,अतिरिक्त सचिव उपमा श्रीवास्तव  यावेळी मंचावर उपस्थित होत्या.उल्लेखनीय योगदानासाठी 12 श्रेणींमध्ये देशातील व्यक्ती व संस्थांना यावेळी एकूण  15 पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्वत:च्या असाध्य रोगावर मात करत आपल्या गतिमंद मुलाला इंटरनॅशनल सेलिब्रेटी बनविण्याची किमया करणाऱ्या इचलकरंजी येथील शारदा दाते यांना यावेळी वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता पुरस्काराने गौरविण्यात आले. 2 लाख 50 हजार रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.शारदा दाते स्वत: कर्करोगाने ग्रस्त असून लग्नानंतर तब्बल 10 वर्षांनी त्यांच्या पोटी प्रथमेश हा गतिमंद मुलगा जन्माला आला. अशा कठीण समयी डगमगून न जाता  त्यांनी परिस्थितीचा  समर्थपणे सामना केला. आपल्या गतिमंद मुलाच्या प्रगतीसाठी त्यांनी कष्ट उपसले व मुलाला घडवत मातृत्वाचा आदर्श निर्माण केला. मुलावर उपचार सुरु असतानाच त्याचे शिक्षणही पूर्ण केले आणि त्याला स्वत:च्या पायावर उभे केले. प्रथमेश सारख्या गतिमंद मुलांच्या कल्याणासाठी कार्यरत संस्थांसोबत गेल्या 10 वर्षांपासून श्रीमती दाते जुळल्या असून आपले योगदान देत आहेत.इचलकरंजी येथील डी.के.टी.ई. संस्थेच्या टेक्स्टाइल इंजिनिअरींग कॉलेजमध्ये गेल्या 11 वर्षांपासून प्रथमेश हा ग्रंथपाल सहायक म्हणून कार्यरत आहे. त्याच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून प्रथमेशला राष्ट्रीय दिव्यांग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रथमेशच्या आदर्शवत कार्याचे कौतुक म्हणून त्याला स्वानुभव कथनासाठी देश-विदेशातून आमंत्रणही येतात तो आता इंटरनॅशनल सेलिब्रेटी  झाला आहे.  शारदा दाते यांनी समाजापुढे घालून दिलेल्या आदर्शामुळेच त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले .

00000

रितेश भुयार /वृत विशेष क्र.227 / दि.03.10.2019                             


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.