औषधे, वैद्यकीय पथकासह गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील सांगलीत पूरग्रस्तांच्या तपासणीसाठी दाखल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


घाबरून न जाण्याचे आवाहन

सांगली, दि. 12 : सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बाधित झालेल्या गावातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी स्वच्छता व आरोग्यविषयक उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे. आलेल्या प्रचंड महापुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून या पूरग्रस्तांसाठी सर्व स्तरातून मदतीचे ओघ येत आहेत. या पुरामुळे सांगली परिसरात साथीचे आजार त्वचेचे आजार बळावण्याची दाट शक्यता लक्षात घेता स्वतः डॉक्टर असलेले राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील या पूरग्रस्तांसाठी आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी औषधांसह वैद्यकिय पथक घेऊन सांगलीमध्ये कार्यरत झाले आहेत.

डॉ. पाटील हे 8 तज्ञ डॉक्टरांसह, 4 फार्मासिस्ट, 4 सामाजिक कार्यकर्ते, 4 पॅरामेडिक्स असिस्टंट व इतर असे 25 सदस्यांच्या वैद्यकीय मदत पथकासह 2 रुग्णवाहिका तसेच दहा हजार पूरग्रस्तांना पुरेल एवढा औषध साठा घेऊन सांगलीमध्ये दाखल झाले. आज सकाळपासून सांगली जिल्ह्यातील भिलवडी ता. पलूसमधील माळवाडी, उमाजीनगर, लक्ष्मी चौक, अशा अनेक गावागावात जाऊन डॉ. पाटील यांनी रुग्णांची तपासणी करून शासन आपल्या पाठिशी आहे, अशी ग्वाही उपस्थित नागरिकांना दिली. गावातली अवस्था बिकट असून सगळीकडे चिखलाचे साम्राज्य आहे, अशा चिखलातून डॉ. पाटील यांनी मोटर सायकलवरून गावातील घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी केली. औषधाचा साठा किती आहे आणि येत्या काळामध्ये कोणती औषधे लागू शकतात याची माहिती घेऊन स्थानिकांना दिलासा देण्याचे काम डॉ. पाटील करीत आहेत.निसर्ग कोपला असला तरीही घाबरून जाऊ नये. अशा काळात आम्ही आपल्यासोबत सदैव मदतीला आहोत, असा दिलासा डॉ. पाटील यांनी ग्रामस्थांना दिला. तसेच औषधांसोबतच गावातील लोकांना ब्लँकेट, चादरी देण्यात आल्या.

यावेळी राज्यमंत्री डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अशोक ओळंबे, हरीश चंदानी, डॉ. कैलास अवसरे, डॉ.नरेश बजाज, संजय तिकडे, श्री. आठवले, प्रकाश पवार, दीपक रोहित नलावडे, अनु सौदागर, निलेश जाधव, यांच्यासह अनेक डॉक्टर्स व फार्मासिस्ट मदत कार्यात सहभागी आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा