पूरबाधितांना पुन्हा उभारी देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध - पालकमंत्री सुभाष देशमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


स्वातंत्र्य दिनानिमित्त सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण संपन्न  


सांगली, दि. 15 : महापुराच्या आपत्तीत शासन संवेदनशीलपणे पूरबाधितांच्या पाठिशी आहे. राज्य शासनाने पूरबाधित क्षेत्रासाठी 153 कोटी रुपयांचा निधी दिला असून, त्यातील 25 कोटी रुपये सांगली जिल्ह्यासाठी दिलेत. त्याबरोबरच अन्नधान्य वाटपही करण्यात येत आहे. पूरबाधितांचे जीवनमान पूर्ववत सुरळीत करण्यासाठी, त्यांना दिलासा देऊन पुन्हा उभे करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत शासन करेल. पूरबाधितांना उभारी देण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही. ही मदत पूरबाधितांचे जीवनमान पूर्वपदावर येण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरेल, असा विश्वास सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे व्यक्त केला.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी महापौर संगीता खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, प्रशिक्षणार्थी आय. ए. एस. आशिष येरेकर, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, मिरज पोलीस उपविभागीय अधिकारी संदीपसिंह गिल, उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली अशोक वीरकर, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी चंद्रकांत कोरे, पद्मश्री विजयकुमार शहा, चित्रा वाघ यांच्यासह अन्य पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली व राष्ट्रगीत झाले. इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी संचलनाचे नेतृत्त्व केले.

पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, पूरबाधितांना तात्काळ दिलासा देण्यासाठी शासनाकडून घोषित शहरी भागात 15 हजार तर ग्रामीण भागात 10 हजार रुपये सानुग्रह अनुदान वाटप सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 25 कोटी रुपयांची रक्कम वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापुढेही आवश्यक ती रक्कम शासनाकडून देण्यात येईल. ब्रह्मनाळ घटनेतील मृतांच्या वारसांना व उर्वरित ठिकाणच्या मृतांच्या वारसांना सानुग्रह अनुदान, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील मदत वितरीत करण्यात आलेली आहे. ही रक्कम जवळपास 95 लाख रुपयांच्या आसपास आहे. पूरबाधितांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 30 लाखांहून अधिक रक्कम जमा झाली आहे.


महापुराच्या आपत्तीत हातपाय गाळून न बसता, आता फिनिक्स पक्षाप्रमाणे यातून पुन्हा उभे राहण्याची वेळ आलीय. सांगलीकरांनी मानसिकदृष्ट्या न खचता नवी उभारी घेण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट करून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सांगली शहर व जिल्ह्याचे नवे रूप उदयास यावे, यासाठी नियोजनात्मक आराखडा करण्याची गरज आहे. नुकसानग्रस्तांना अधिकाधिक बळ देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची गरज व्यक्त करून सांगलीचे एक नवे रूप निर्माण होईल, या दृष्टीने राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


महापुराच्या काळात 95 बोटीं व 500 हून अधिक जवानांमार्फत बचाव कार्य करण्यात आले. आलमट्टी धरणातून विसर्गाबाबत कर्नाटक सरकारशी सातत्याने शासन समन्वय ठेवून होते, असे स्पष्ट करून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, महापुराच्या काळात लोकांना पाण्याच्या वेढ्यातून बाहेर काढण्यासाठी बचावकार्यात सहभागी असणाऱ्या सेना, नौदल आणि आपत्ती निवारण पथके, अनेक राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्था यांनी युद्धपातळीवर काम केले. तसेच, त्यांना जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील स्वयंसेवी संस्थांनी मदत केली. याबद्दल त्यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले.


पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, भौगोलिक परिस्थिती पाहता कृष्णा - वारणा नद्यांचा संगम, धरणातून होणारा विसर्ग, पर्जन्यमान लक्षात घेता पाण्याचे सुयोग्य नियोजन करणे गरजेचे आहे. पूररेषेतील अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम या पार्श्वभूमिवर भविष्यात पूररेषेचे उल्लंघन होणार नाही, अनधिकृत बांधकाम फोफावणार नाही, या दृष्टीकोनातून प्रशासनाने अधिक कडक भूमिका घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम न करणे हे कर्तव्य जनतेनेही पार पाडावे. पर्यावरणाला धक्का लागेल असे कृत्य केले नाही तरच भविष्यातील नैसर्गिक आपत्तींची आव्हाने कमी होवून पुढच्या पिढ्यांना एक चांगला वारसा मिळेल, असे ते म्हणाले.


पूरपश्चात व्यवस्थापनासाठी यंत्रणा गतिमान केल्या असल्याच्या सांगून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, पूरग्रस्तांच्या घरांचे, नुकसानीचे पंचनामे, सर्वेक्षण गतीने करण्याचे, संकलित झालेला कचरा, मैला यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत. पूरबाधितांना वैद्यकीय उपचाराच्या सुविधा, स्वच्छ पाणीपुरवठा, सुरळीत वीजपुरवठा, घरांची व परिसरांची स्वच्छता याबाबत यंत्रणा गतिमान केल्या आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बाधित झालेल्या गावांतील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी स्वच्छता व आरोग्य विषयक समुचित उपाययोजना तातडीने करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.


पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, राज्य शासनाच्या ध्येयधोरणानुसार कृषि, औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात सांगली जिल्हा विकासाच्या सर्व टप्प्यांवर अग्रेसर ठेवण्यास शासन व प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर बळीराजा आणि सामान्य नागरिकाच्या अन्न, वस्त्र, निवारा आदि मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी, त्यांना आरोग्यसंपन्न ठेवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगलीकरांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.


यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सहायक पोलीस उप निरीक्षक मारूती कल्लापा सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक धनंजय सुगंध विटेकरी, पोलीस उप निरीक्षक समाधान शिवाजी लवटे व पोलीस उप निरीक्षक विश्राम जालिंदर मदने यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार  प्राप्त क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि. कुंडल यांचा सन्मान करण्यात आला. संत तुकाराम  वनग्राम पुरस्काराचे वितरण तासगाव तालुक्यातील हातनोली व सिध्देवाडी व शिराळा तालुक्यातील आंबेवाडी यांना करण्यात आले. कलर्स मराठी वाहिनीवररील सूर नवा ध्यास नवा या गाण्याच्या स्पर्धेमध्ये उपविजेतेपद मिळविल्याबाबत  मीरा राहुल निलाखे हिचा सत्कार करण्यात आला.


सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा