राज्यातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे पूरग्रस्तांसाठी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मानले कर्मचाऱ्यांचे आभार
मुंबई, दि. 13 : राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासनाच्या गट ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांना राज्य सरकारी गट ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी यासंबंधीचे निवेदन आज दिले.
          
राज्यात अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर, सातारासह विविध जिल्ह्यात झालेल्या पूरपरिस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी सुमारे सव्वातीन लाख राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी ऑगस्ट महिन्याचे आपले एक दिवसाचे वेतन सुमारे 30 ते 32 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचे निवेदन महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, कार्याध्यक्ष भिकू साळुंखे, कोषाध्यक्ष मार्तंड राक्षे, सरचिटणीस प्रकाश बने, मुंबई जिल्हाध्यक्ष गजानन म्हामुणकर व कार्याध्यक्ष अनंत जाधव यांनी श्री. केसरकर यांना दिले.

राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी व त्यांच्या मध्यवर्ती संघटनेने पूरग्रस्तांना मदतीसाठी घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वाचा असून पूरग्रस्तांसाठीचे हे योगदान मोलाचे आहे, असे सांगून पूरग्रस्तांबद्दल दाखविलेल्या या संवेदनशीलतेबद्दल संघटनेचे व सर्व कर्मचारी वर्गाचे श्री. केसरकर यांनी अभिनंदन करून आभार मानले.

यावेळी मंत्रालय उपाहारगृह सचिव शिवाजी आव्हाड, सहसचिव वरेश कमाने, मंत्रालय उपहारगृह संघटनेचे अध्यक्ष संतोष अमृतकर, सरचिटणीस नामदेव कदम, सचिन मयेकर, शासकीय महिला मंचच्या शांता वाघेला, मनोहर दिवेकर, उपाध्यक्षा सुरेखा चव्हाण, सुरेश आहेरकर, रामदास शिराळे, प्रकाश घाडगे आदी यावेळी उपस्थित होते.
०००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/13.8.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा