महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘विशेष पोलीस पदक’पुरस्कार जाहीर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



नवी दिल्ली, दि.13 : केंद्रीय गृहमंत्रालयाने उत्कृष्ट तपासकार्यासाठी देशातील 96 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना विशेष पोलीस पदक देऊन सन्मानित केले असून महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.

पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा तसेच उत्तम तपासकार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने गेल्या वर्षीपासून उत्कृष्ट  तपासकार्यासाठी विशेष पोलीस पदकपुरस्कार सुरु केला आहे. यावर्षी  उत्कृष्ट तपासकार्यासाठी  देशभरातील 96 पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना पोलीस पदक देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह अन्य राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए), केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) आणि  अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी)च्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.

महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना विशेष पोलीस पदक

महाराष्ट्र पोलीस विभागाने केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन राज्यातील 11 पोलीस अधिकाऱ्यांना विशेष पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. यात, पोलीस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर,   पोलीस निरीक्षक सर्वश्री अविनाश आघाव, सुरेश रोकडे, प्रदीप भानुशाली, हेमंत पाटील, सागर शिवलकर,संजय निकुंबे,सुधाकर देशमुख आणि सहायक पोलीस निरीक्षक सचिन माने यांच्यासह  श्रध्दा वायदांडे आणि  प्रियंका शेळके या महिला सहायक पोलीस निरीक्षकांचाही समावेश आहे.  

000000
रितेश भुयार  /वृत्त वि. क्र.187/  दिनांक  13.08.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा