पूरबाधित घरांच्या परीक्षण, पंचनाम्यांसाठी निवृत्त अभियंते, अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्याचे आयुक्त प्रवीण परदेशी यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतसांगली, दि. 13 : पूरबाधित घरांचे परीक्षण व पंचनामे करण्यासाठी  सेवानिवृत्त अभियंते व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मदत घ्या, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आज येथे दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित पूरबाधित घरांचे  पंचनामे प्रशिक्षणात ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम आदी उपस्थित होते.


श्री. परदेशी म्हणाले, सद्यस्थितीत पुराचे पाणी ओसरत आहे. नागरिक पुन्हा आपल्या घराकडे राहण्यास परतत आहेत. या परिस्थितीत घराची इमारत धोकादायक स्थितीत आहे किंवा कसे, याचे परीक्षण होणे गरजेचे आहे. पूरबाधित घरांच्या परीक्षणासाठी आणि पंचनाम्यासाठी बांधकाम अभियांत्रिकी क्षेत्रातील माहितगार व्यक्तींची गरज आहे. त्यामुळे निवृत्त अभियंते, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, कराडच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकाची भूमिकेतून सेवा द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कोणताही पूरबाधित मदतीपासून वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी. त्यासाठी मालमत्ता नोंदवही किंवा 8 अ उताऱ्यावरील नोंदीसमवेत खातरजमा करून घ्यावी. तसेच, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे या धोरणानुसार अनधिकृत घरांच्या पूरबाधितांनाही समाविष्ट करून घ्यावे. हे काम जास्तीत जास्त 3 आठवड्यात पूर्ण करावे. पंचनामे करताना संबंधित घरमालकासह घराचे छायाचित्र घ्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.


पूरबाधित लोकांना पुन्हा निवारा प्राप्त करून देण्यासाठी काही पर्याय ठेवण्यात आले आहेत. यामध्ये ज्यांची घरे वारंवार पूरबाधित होतात, त्यांना अन्यत्र निवारा उपलब्ध करून देणे, पक्क्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी निधी देणे आणि ज्यांची घरे कच्ची आहेत, त्यांना नवीन घरांसाठी निधी देणे आदींचा त्यात समावेश आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेतून 5 ब्रास मोफत वाळू पूरबाधितांसाठी देण्याबरोबरच त्यात मुरूमाचाही समावेश करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.


सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी कोणताही पूरबाधित मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे सांगितले.


यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांनी उपस्थितांना पंचनामा कार्यवाहीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.        
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा