केंद्र व राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी - सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतकोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे  यांच्या हस्ते ध्वजारोहण 


कोल्हापूर, दि. 15  :  पंधरा दिवस जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय दु:मय आणि खडतर गेले. प्रलयकारी महापुरात जनतेची आणि एकूणच जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे. महापुराच्या रुद्रावतारातही आपत्ती नियंत्रण यंत्रणा, एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, नौदल, वायुदल, तटरक्षक दलाबरोबरच जिल्ह्यातील स्वयंसेवी सेवाभावी संस्था, संघटनांबरोबरच हजारो कोल्हापूरकर पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले. कोल्हापूरकरांच्या या माणुसकी आणि साहसी वृत्तीला सलाम! केंद्र आणि राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा पूरग्रस्तांच्या पाठीशी उभी आहे, असा विश्वास सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केला.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सामाजिक न्यायमंत्री डॉ. खाडे  यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा संपन्न झाला. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, दिवंगत अभिमन्यू अर्जुन कदम यांच्या पत्नी शांताबाई अभिमन्यू कदम, स्वातंत्र सैनिक दिवंगत रंगराव कृष्णाजी गुरव यांच्या पत्नी गिताबाई रंगराव गुरव आणि ज्येष्ठ नागरिक यांना डॉ. खाडे यांनी गुलाबपुष्प देवून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे त्यांनी केलेल्या कामाबद्दल कौतुक केले.


सामाजिक न्यायमंत्री डॉ. खाडे आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा आज 72 वर्धापन दिन ! हा मंगलमय दिवस आज देशभर उत्साहन साजरा होत असताना आपणाला शुभेच्छा देणं हे मी माझं अहोभाग्य समजतो. भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या राष्ट्रपित्यांसह सर्व स्वातंत्र्यसेनानी आणि क्रांतीकारक यांच्या बरोबरीनेच स्वातंत्र्यासाठी झगडलेल्या तत्कालीन सर्व सामान्य भारतीयांच्या त्यागाचे व बलिदानाचे स्मरण नेहमीच ठेवले पाहिजे.
गेले 15 दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टिने अतिशय दुख:मय आणि खडतर गेले. इतिहासात कधी नव्हे इतका प्रलयकारी महापूर जिल्ह्यात आल्याने जिल्ह्यातील जनतेची आणि एकूणच जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे. या प्रलयकारी महापुरात ज्यांना जीव गमवावे लागले त्यांना आजच्या दिनी श्रध्दांजली अपर्ण करुया. अभूतपूर्व महापुरानं जिल्हयाला घेरलं असतानाही जिल्ह्यातील जनतेने संयम आणि धैर्याने महापुराचा सामना केला. त्याबद्दल जनतेचे मी आभार मानतो.
      
महापुराची तीव्रता ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कोल्हापुरातील पूर परिस्थितीची पाहणी केली. पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी देशाच्या विविध राज्यातून बोटी, विमाने तसेच जवान मागवून पूरपरिस्थिती हाताळण्यास प्राधान्य दिले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क करुन अलमट्टीचा विसर्ग वाढविला. केंद्र आणि राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा आणि ताकद पूरग्रस्तांच्या पाठिशी उभी केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे तर जिल्ह्यात तळ ठोकून पूरग्रस्तांच्या बचाव व मदत कार्यात अग्रभागी राहिले.


हेलिकॉप्टर्समधून 38 टनापेक्षा जास्त मदत
पूरबाधित 321 गावांमधून 90 हजार 368  कुटुंबातील 3 लाख 58 हजार 91 इतक्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले. यामध्ये एकट्या शिरोळ तालुक्यातील दीड लाखाहून अधिक लोकांचा समावेश आहे. पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी बोटी मदतीने जवानांनी धैर्य आणि हिमतीने कित्येकांचे प्राण वाचविले. पूरग्रस्तांसाठी जिल्हयात 224 संक्रमण शिबिरे सुरु करून त्यामध्ये 75 हजार 958 लोकांची सोय केली. संक्रमण शिबिरातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याबरोबरच पाणी, आरोग्य अशा पायाभूत सुविधा उपलब्ध  करुन दिल्या. शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना वायुदलाच्या हेलिकॉप्टर्समधून 38 टनापेक्षा जास्त मदत साहित्य व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात आला.


3 कोटीहून अधिक रोख रक्कमेचे पूरग्रस्तांना वाटप
प्रशासनाच्या वतीने शहरातील पूरग्रस्तांना प्रती कुटुंब 15 हजार रूपयांची मदत तर ग्रामीण भागातील पूरग्रस्तांना प्रती कुटुंब 10 हजार रूपयांची मदत देण्यात येत आहे. यापैकी रोख 5 हजार रूपयांची मदत तात्काळ देण्यात आली आहे. आजअखेर ग्रामीण आणि शहरी भागातील कुटुंबांना एकूण 3 कोटीहून अधिक रुपयांची मदत देण्यात आली आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये मदत निधी  दिला आहे. पूरग्रस्तांच्या जनावरांचीही सोय छावण्यांमध्ये  करण्यात आली, त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. पशुधनाच्या जोपासणेसाठी लसीकरण आणि औषधोपचारावर विशेष भर दिला. त्यासाठी पुण्याहूनही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पथके तैनात केली.


ध्या पूर ओसरु लागला आहे. पूरग्रस्तांच्या घरांचे, जनावरांचे तसेच शेतीपीकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी गावनिहाय पथके तैनात केली आहेत. जिल्हयात 1 लाख 5 हजार हेक्टर  शेती पीकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  तसेच पूरग्रस्त भागातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यास प्राधान्य दिले असून पुरामुळे बंद पडलेल्या   359 पाणी पुरवठा योजना सुरु करण्याचे काम गतीने सुरू आहे. आता सर्वार्थाने महत्त्वाची बाब म्हणजे पूरग्रस्त भागातील साचलेला गाळ आणि कचरा काढण्याबरोबरच आरोग्य आणि स्वच्छतेचे काम युध्दपातळीवर सुरू असून औषध फवारणी, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता यावर अधिक लक्ष  केंद्रीत केले आहे.


जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये जिल्हास्तरीय पूरग्रस्त मदत सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी या कक्षाकडे पूरग्रस्तांसाठी मदत करावी, या कक्षामार्फत पूरग्रस्त गावांची माहिती घेऊन त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्याचे वितरण करण्याबाबत सनियंत्रणाचे काम सुरू आहे.


जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यंदा जिल्ह्यास सर्वसाधारण वार्षिक योजनेसाठी 271 कोटीची तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 113 कोटी 41 लाखाची तरतूद करण्यात आली  आहे. गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील विकास कामांकरिता शासनाने सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना आराखड्यात 50 कोटीची वाढ केली आहे.


छ. शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, म. फुले, डॉ. आंबेडकर यांच्या विचारावर शासनाची वाटचाल

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, म. जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर शासनाची वाटचाल सुरू आहे.  मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजालाही न्याय देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. जिल्ह्या-जिल्ह्यात आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी वसतिगृह सुरु करण्यात येत असून मराठा समाजातील विद्यार्थ्यांची ईबीसी सवलतीसाठीची उत्पन्न मर्यादा 1 लाखावरुन 8 लाख केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची निम्मी फी शासन भरत आहे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडील 10 लाखापर्यंतच्या कर्जाची हमी राज्य शासनाने घेतली आहे. या कर्जावरील व्याज शासन भरणार आहे.


राज्याचे वनक्षेत्र 33 टक्यापर्यंत वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र-समृध्द महाराष्ट्र हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी गतीमान केला आहे. वृक्षारोपणाची परंपरा कोलहापूर जिल्ह्यानेही जोपासून जिल्हयात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली आहेत. यावर्षी 1 कोटी 15 लाख झाडे लावण्याचे नियोजन केले असून झाडांच्या जोपासनेसाठी लोकचळवळीबरोबरच 3 लाख 72 हजार  हरित सेना सदस्य कार्यरत आहेत.


शेतकऱ्यांना कृषी विभागाकडील सर्व सेवा-सुविधा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात यासाठी कोल्हापुरात  तीन एकर क्षेत्रावर 29 कोटी 80 लाख खर्चाचे शेतकरी सन्मान भवन उभारण्यात येणार आहे. हे शेतकरी सन्मान भवन येत्या वर्ष-दीड वर्षात पूर्ण होईल. या भवनमध्ये शेतकऱ्यांसाठी ट्रेनिंग सेंटर असेल. यामध्ये नव नवीन बियाणांचे संशोधन, खते, बियाणे यांची माहिती मिळेल व विक्रीही होईल. शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतकरी सन्मान भवन अत्यंत उपयुक्त ठरेल. 


स्वच्छ महाराष्ट्र अभियानातून शहरे आणि गावे स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यसंपन्न बनू लागली आहेत. राज्यात स्वच्छता अभियान ही लोकचळवळ बनली आहे. या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हयात हागणदारीमुक्तीचं भरीव काम झाले आहे. यापुढेही स्वच्छतेत सातत्य राखण्यासाठी शाश्वत स्वच्छतेचा कार्यक्रम निर्धारपूर्वक राबवूया, असे आवाहनही डॉ. खाडे यांनी केले.कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, पोलीस, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा