उपक्रमशीलतेला वाव देणाऱ्या शिक्षणाची गरज - राज्यपाल चे. विद्यासागर राव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


शाळांना आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलग्नतेचे प्रमाणपत्र प्रदान

मुंबई, दि. 9: शैक्षणिक यश हा एकमेव मापदंड न मानता उपक्रमशीलतेला वाव देणाऱ्या शिक्षणाची गरज असून महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातून उपक्रमशील विद्यार्थी घडतील असा विश्वास राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज व्यक्त केला.

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातर्फे शाळांना अस्थायी संलग्नतेच्या प्रमाणपत्रांचे वितरण राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलार, ज्येष्ठ संगणक शास्रज्ञ डॉ. विजय भटकर, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. सुनील मगर आदी यावेळी उपस्थित होते.
       
मातृभाषेतून देण्यात येणारे शिक्षण अधिक शाश्वत असते, असे सांगून राज्यपाल म्हणाले, राज्य शासनाने मराठीतून शिक्षण देणारे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (एमआयईबी) स्थापन करुन एक अनोखे पाऊल उचलले आहे. राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात या मंडळाच्या शाळा सुरू करुन आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन देणारे शिक्षण मराठीतून देण्याचा निर्णय शैक्षणिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
     
ते पुढे म्हणाले, राज्यात आयआयटीसारखी प्रौद्योगिकी संस्था, विविध तंत्रज्ञान शिक्षण संस्थांबरोबरच उच्च दर्जाची विद्यापीठे, दर्जेदार खासगी शिक्षण संस्था असून राज्याला शिक्षण, नवनिर्मिती आणि स्टार्ट-अप क्रांतीचे हबबनविण्यासाठी शासन आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत आहे. यासाठी नवनिर्मिती, संशोधन, उद्योजकता आणि नाविण्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देणारे शैक्षणिक वातावरण निर्माण करावे लागेल. एमआयईबीच्या शाळांतून त्याची चांगल्या प्रकारे सुरुवात होईल, अशी अपेक्षा राज्यपाल श्री. राव यांनी व्यक्त केली.

राज्यपाल श्री. राव म्हणाले, शिक्षण आनंददायी आणि तणावमुक्त वातावरणात व्हावे यासाठी विविध देशात अनेक प्रयोग होत असून तशा प्रकारचे प्रयोग आपणही अंगिकारले पाहिजेत. शिक्षणाच्या माध्यमातून समतेच्या तत्त्वावर विश्वास असणारा समाज निर्माण करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. तसेच आपली गौरवशाली संस्कृती, सभ्यता आणि भाषिक वैविध्याविषयी अभिमान विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचाही प्रयत्न झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

श्री. तावडे म्हणाले, सर्वच स्तरातील तसेच शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन देणारे शिक्षण देण्याचा उद्देश समोर ठेऊन गतवर्षी या मंडळाची स्थापना करण्यात आली. मुलांना त्या-त्या वयातील गोष्टींचा आनंद घेत शिक्षण दिले जात असल्याने त्यांचा सर्वांगीण विकास होत आहे. देशाच्या येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणातील 14 मुद्यांपैकी 9 मुद्दे या मंडळाच्या स्थापनेप्रसंगीच विचारात घेण्यात आलेले असल्याने हे मंडळ कालसुसंगतच नव्हे तर दूरदृष्टीकोन बाळगून अभ्यासक्रम राबविणारे आहे.

श्री. शेलार म्हणाले की, मातृभाषेतून शिक्षण देणारे हे बहुदा एकमेव आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ  असावे. डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. काकोडकर या नामवंत शास्रज्ञांचा या मंडळाच्या रचनेमध्ये महत्त्वपूर्ण सहभाग राहिला असून देशातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञांचे मार्गदर्शन मंडळाला मिळत आहे. मंडळाशी गतवर्षी 13 आणि यावर्षी 68 शाळांना संलग्नता देण्यात आली आहे. यामध्ये सर्वसमावेशकता जपण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या 47 शाळा, 12 खासगी अनुदानित, 8 स्वयंअर्थसहाय्यित आणि एक नगरपालिकेच्या शाळेतून या मंडळाचे शिक्षण देण्यास सुरूवात झाली आहे.

ते पुढे म्हणाले, मंडळाशी संलग्नतेसाठी 4 हजार 132 शाळांनी अर्ज केला असून यातच मंडळाचे यश दिसून येत आहे. अनुभवाधारित शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षणाची सुविधा यामुळे या शाळांचा लाभ राज्यातील विद्यार्थ्यांना उज्ज्वल यश मिळण्यासाठी होणार आहे.

प्रास्ताविक डॉ. मगर यांनी केले. प्रारंभी मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेणारी चित्रफीत दाखविण्यात आली. 81 शाळांच्या मुख्याध्यापकांना राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते अस्थायी संलग्नतेचे  प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.         
0000
सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.9.8.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा