दादर येथील बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतनोकरी मिळण्यासाठी प्रत्येक पात्र उमेदवाराला सहकार्य करणार - उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आश्वासन

मुंबई, दि. 9; इच्छुक आणि पात्र अशा प्रत्येक उमेदवाराला नोकरी मिळण्यासाठी सहकार्य करू, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. राज्य शासनाच्या उद्योग विभाग व सीआयआयच्या वतीने दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या बाराव्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत  होते. या मेळाव्याला युवा उमेदवारांनी उत्साही प्रतिसाद दिला.

यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, आमदार श्रीमती मनिषा कायंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
       
श्री. देसाई म्हणाले, जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न होत आहेत. मेळाव्यात सहभागी झालेल्या प्रत्येक तरुण-तरुणीला नोकरी मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल. राज्यात उभ्या होणाऱ्या उद्योगांमध्ये 80 टक्के  नोकऱ्या  या स्थानिक उमेदवारांना देण्यात याव्या याबाबतही शासन आग्रही असल्याचे श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले

दादर येथील बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यासाठी परिसरातील सुमारे साडेतीन हजार इच्छुकांनी ऑनलाइन तर अडीच हजार उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने नोंदणी केली होती. इथे आलेल्या 67 कंपन्यांनी सुमारे बारा हजार जागांसाठी उमेदवारांच्या   मुलाखती घेतल्या.

2700 मुलांनी प्रत्यक्षात सहभाग नोंदवून मुलाखती दिल्या. त्यापैकी 1882 जणांची प्राथमिक फेरीत निवड करण्यात आली. 110 जणांना जागेवर नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

उद्योग विभाग, सीआयआय आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी या मेळाव्याचे आयोजक होते. या मेळाव्याला केवळ दादरच नव्हे तर राज्यभरातून उमेदवार आले होते. सर्वसाधारण पदवीधर, आयटीआय, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, या विषयात उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनीही हजेरी लावली होती. महिला उमेदवारांनीही या मेळाव्याला बहुसंख्येने प्रतिसाद दिला. दादरचे आमदार सदा सरवणकर यांच्या पुढाकाराने या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित उमेदवारांची चोख व्यवस्था करण्यात आली होती. 
नोकरी मिळालेल्या उमेदवारांनी वाटले लाडू
यापूर्वी झालेल्या रोजगार मेळाव्यातून ज्या उमेदवारांना नोकरी मिळाली आहे त्या उमेदवारांनी आज उद्योगमंत्री व मंचावर उपस्थित मान्यवरांना लाडू  वाटले. या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करताना श्री. देसाई म्हणाले, खरं तर लग्न ठरल्यावर लाडू वाटतात, मात्र आता तुम्हाला नोकरी लागली आहे तर लग्नही लवकर होईल, असे सांगताच उपस्थित उमेदवारांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा