महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना दिल्लीकर मराठी-अमराठींचा मदतीचा हात; २५ लाखांची मदत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतनवी दिल्ली, दि. 14 : महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या वेदनांची जाणीव ठेवत दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील 40 संस्थांनी  वस्तू व आर्थिक स्वरुपातील एकूण 25 लाखांची मदत केली आहे.


महाराष्ट्राशी नाळ जोडून असणाऱ्या दिल्लीकर मराठी-अमराठी बंधू-भगिनींनी पुराच्या संकटात सापडलेल्या राज्यातील जनतेला मदतीचा हात पुढे करत वस्तू व आर्थिक स्वरूपाची मदत गोळा केली आहे. दिल्लीतील वेगवेगळ्या 7 केंद्रांवर जमा करण्यात आलेले साहित्य व रोख रक्कम आज 49, लोधी रोड या खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या निवासस्थानी एकत्रित करण्यात आले. वस्तू स्वरूपातील मदत विशेष रेल्वेने रवाना करण्यात येणार असून रोख रक्कम मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करण्यात येणार आहे.

दिल्ली मराठी प्रतिष्ठानसह दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गणेश मंडळ व  संस्थांनी 18 लाख रूपये रोख रक्कम तसेच 7 लाख रूपये हे कपडे औषधी, खाद्य सामुग्री आदिंच्या रूपात  गोळा केले आहे. या संस्थांच्या प्रतिनिधींनी या संदर्भात प्रसार माध्यमांना आज माहिती दिली.


महाराष्ट्रातील कोल्हापूर,सांगली ,सातारा, नाशिक आणि कोकण भागाला पूरपरिस्थितीचा फटका बसला आहे. या भागातील जनतेला मदतीचा हात म्हणून दिल्लीतील संस्थांनी पुढाकार घेऊन मदतीचे आवाहन केले होते. या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देत केवळ दोन दिवसात एकूण 25 लाखांची  मदत गोळा झाली आहे. गुडगाव, आनंदवन-पश्चिम विहार, सह्याद्री पडपडगंज, रेल्वे ऑफीसर्स क्लब-आनंद विहार, बृह्नमहाराष्ट्र भवन -पहाडगंज, विठ्ठल मंदिर संस्थान -आर.के.पुरम आणि लोधीरोड स्थित वनिता समाज येथे ही मदत गोळा करण्यात आली. मराठीसह-अमराठी जनतेने या कार्यात सक्रीय सहभाग घेवून भरघोस मदत करून मानवतेचा संदेश दिला आहे.
000000

रितेश भुयार  /वृत्त वि. क्र.191 / दिनांक  14.08.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा