२ लाख ७३ हजार पूरग्रस्त ग्राहकांना वीजपुरवठा-महावितरणची प्रभावी, नियोजनबद्ध अंमलबजावणी - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 14 : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच कोकणातील महापुरामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणने प्रभावी व नियोजनबद्ध अंमलबजावणी केली असल्याने या भागातील म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील 24 व सांगली जिल्ह्यातील 10 अशी 34 उपकेंद्रे 13 ऑगस्टपर्यंत सुरु करण्यात आली आहेत. तर उर्वरित भागातील वीजपुरवठा 15 ऑगस्टपर्यंत सुरळीत केला जाईल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मंत्रालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे संचालक विश्वास पाठक, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, तसेच संचालक (संचालन)  दिनेश साबू उपस्थित होते.

कोल्हापुरातील 2884 व सांगलीतील 923 अशा एकूण 3807 रोहित्रांचा व 2 लाख 73 हजार 817 वीज ग्राहकांचा वीजपुरवठा आतापर्यंत सुरु केला आहे. स्वातंत्र्यदिनापर्यंत शेतीपंप वगळता पूर ओसरलेल्या भागातील वीजपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी कोल्हापूर-सांगलीतील 4 हजार महावितरणचे, दीड हजार कंत्राटी व शेजारच्या जिल्ह्यातून आलेल्या 40 पथकातील 500 हून अधिक कर्मचाऱ्यांची टीम अहोरात्र झटत आहे. या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेण्यात आली असल्याचे श्री.बावनकुळे यांनी सांगितले.


कोल्हापूर व सांगली या दोन्ही जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील कृष्णा पंचगंगा, वारणा, भोगावती, कुंभी, कासारी, दुधगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, तांब्रपर्णी या नद्या आपल्या धोक्याच्या पातळीपेक्षा वर वाहू लागल्या.

महावितरणने सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतलेले निर्णय
त्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या परिसरातील पाणीपुरवठा योजना व शेतीपंप, वीज वितरण यंत्रणा व ग्राहकांच्या उपकरणांचे नुकसान होवू नये यासाठी वीजपुरवठा बंद करण्यात आला. कोल्हापूर व सांगली जिल्हयातील 42 उपकेंद्रे, वितरण रोहित्र  6,177, वाहिन्या 132 तसेच 3 लाख 90 हजार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरता बंद करण्यात आला. यामध्ये शहरातील 1 लाख 19 हजार ग्राहकांचा समावेश होता. हजारो रोहित्र व शेकडो वाहिन्या पुरात जाऊनही जेथे शक्य आहे त्या भागाला पर्यायी मार्गाने वीजपुरवठा देण्याचे काम दोन्ही जिल्ह्यातील वीज कर्मचाऱ्यांनी केले आहे. त्यासाठी अनेकांनी पोहत जाऊन महापुरात कामे केलेली आहेत. पूर परिस्थिती लक्षात घेता बंद करण्यात आलेला वीजपुरवठा ग्राहकांना एसएमएस, ट्विटर, व्हॉटसअप, आणि वृत्तपत्रात बातम्या देऊन वेळोवेळी वीज ग्राहकांना अवगत करण्यात आले. महावितरणने केलेल्या पूरग्रस्त क्षेत्रातील कामाबद्दल महावितरणच्या सर्व टीमचे अभिनंदनही श्री.बावनकुळे यांनी यावेळी केले. 

विशेष दैनंदिन सनियंत्रण कक्ष
या महापुराचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरणच्या मुख्यालयात विशेष दैनंदिन सनियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले. तसेच स्थानिक पातळीवर कोल्हापूर व सांगली 24 x 7 सनियंत्रण कक्ष वरिष्ठ अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आले. पुराच्या पाण्यात महावितरणची किती यंत्रणा पाण्याखाली आहे याचा अंदाज घेवून ऊर्जा रोहित्र, वितरण रोहित्र, रिले व  इतर साहित्य तातडीने उपलब्ध करण्यासाठी इतर परिमंडलाकडून मागविण्यात आले तसेच 315 केव्हीचे रोहित्र, लोखंडी पोल, केबल्स आदी तातडीने खरेदी करुन पूर ओसरण्यापूर्वी  कोल्हापूर व सांगलीकडे पाठविण्यात आले. पूर ओसरल्यानंतर विद्युत पुरवठा सुरु करण्यासाठी बारामती व पुणे परिमंडलातील कुशल मनुष्यबळ या दोन्ही जिल्ह्यांकडे पाठविण्यात आले. याकरिता 40 पथके तयार करण्यात आले. या एका पथकामध्ये एका वाहनासह 1 अभियंता, 3 तांत्रिक कर्मचारी  व कंत्राटदारांची 8 कामगार यांचा समावेश होता. याशिवाय प्रकल्पातील मोठया एजन्सींना विदयुत साहित्य व उपकरणे व मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचे आदेश देण्यात आले. पुरामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण होऊ नये व त्यांनी संयम ठेवावा याकरिता समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.यामध्ये प्रत्येक ग्राहकांना मोठया प्रमाणात मोबाईलद्वारे एसएमएस पाठवून महावितरणची यंत्रणा वीज पुरवठा सुरु करण्यासाठी सज्ज असल्याची जाणीव करुन देण्यात आली. तसेच स्थानिक पथकातील कर्मचाऱ्यांनी पुराच्या ठिकाणी जाऊन ग्राहकांना धीर देण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती मंत्री श्री.बावनकुळे यांनी यावेळी दिली. एकूणच राज्यातील पूरपरिस्थितीमुळे महावितरणचे 523 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे ते म्हणाले.


ज्या  ठिकाणी पर्यायी व्यवस्थेद्वारे वीज पुरवठा देणे शक्य आहे व तसेच जे उपकेंद्रे सुस्थितीत होते तिथून वीज पुरवठा वळवून सुरु करण्यात आला तसेच पुनर्वसन केंद्रानांही वीजपुरवठा देण्यात आला. तसेच ज्याठिकाणी शक्य आहे त्याठिकाणी जनरेटरर्सची  व्यवस्था करुन ग्राहकांना वीजपुरवठा देण्यात आला. जसजशी पाण्याची पातळी ओसरु लागली तशी महावितरणची यंत्रणा पुन्हा जोमाने कामाला लागली. 9 ऑगस्ट पासून पहिल्यांदा पाणीपुरवठा योजना, प्राथमिक आरोग्य केंद्र, बसस्थानक, अग्निशमन दल व घरगुती ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यास सुरुवात करण्यात आला. 13 ऑगस्टपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील 24 व सांगली जिल्हयातील 10 अशी एकूण 34 उपकेंद्रे सुरु करण्यात आली. कोल्हापूर जिल्हायातील 2884 व सांगली जिल्ह्यातील 923 अशा एकूण 3807  रोहित्रांचा वीजपुरवठा  सुरु करण्यात येवुन 2 लाख 74 हजार ग्राहकाचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला.

सद्यस्थितीत कोल्हापूर मंडलामध्ये गांधीनगर व आवाडेमळा अशी दोन उपकेंद्रे व सांगली मंडलामध्ये शेरीनाला, बालाजी मंदीर, दुधगाव, कवठेपिरान, पनुद्रे व ब्रह्यनाळ अशी 8 उपकेंद्रे सध्या बंद आहेत.

15 ऑगस्टपर्यंत शेतीपंपाचा वीज पुरवठा वगळून दोन्ही जिल्ह्यातील ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा