सांगलीत पूरग्रस्तांसाठी मोफत औषधांचे वाटप; अन्न व औषध प्रशासन व जिल्हा केमिस्ट असोसिएशनचा उपक्रम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


सांगली, दि. 12: पूराच्या आपत्तीमुळे दूषित पाण्याच्या संपर्कामुळे लेप्टोस्पायरोसीस या रोगाची लागण होण्याची अधिक शक्यता असते. यासाठी डॉक्सिसायक्लीन (Doxycycline) 100 एम.जी. या औषधाची तसेच ॲन्टी फंगल (Anti fungal) क्रीमची आवश्यकता असते. सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनमार्फत अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या केमिस्ट भवन, रिलायन्स मार्केटजवळ सिव्हील हॉस्पीटलच्या मागे, सांगली येथे औषधांचे मोफत वाटप केले जात आहे.

याठिकाणी पूरग्रस्त जनतेसाठी मोफत वैद्यकीय सेवा डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपलब्ध आहे. औषधासाठी गरजूंनी संपर्क साधावा. गर्भवती महिलांनी डॉक्सिसायक्लीन घेऊ नये. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


सांगली जिल्ह्यामध्ये पूरस्थितीमुळे प्रचंड हानीकारक परिस्थिती उद्भवली आहे. सांगली व मिरज तसेच संलग्न पूरग्रस्त तालुक्यामधील पूरग्रस्त झालेल्या जनतेसाठी आपत्ती निवारण केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयाने उभारली आहेत. डॉक्सिसायक्लीन या औषधाची मात्रा वेगवेगळ्या प्रमाणात दिली जाते. यांचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण अन्न व औषध प्रशासन व सांगली केमिस्ट असोसिएशनमार्फत फार्मासिस्ट यांना देण्यात आले असून पूरग्रस्त तालुक्यामधील पूरग्रस्त जनतेसाठी आपत्ती निवारण केंद्रावर उपस्थित राहून रूग्णांना औषधे दिली जात आहेत.

अन्न व औषध प्रशासन व सांगली केमिस्ट असोसिएशनच्या सहकार्याने पूरग्रस्त विभागातील जनतेस 3000 पाकिटे मिलिटरीच्या रेस्क्यू टीमसोबत बोटीव्दारे वाटप केली आहेत. याचप्रमाणे 5000 पाकिटे ही पुढील कालावधीत वाटपासाठी तयार केली आहेत. दिनांक 10 ऑगस्ट रोजी सर्व केंद्रामध्ये सांगली, मिरज डॉक्टर संघटनेच्या डॉक्टरासमवेत व सांगली केमिस्ट असोसिएशनमार्फत फार्मासिस्टची नेमणूक केली असून औषधांची मात्रा समजावून सांगून मोफत औषधे दिली आहेत. पूरग्रस्त भागातील महिलांची अडचण लक्षात घेवून केमिस्ट संघटनेतील फार्मासिस्ट महिलांची टीम तयार करण्यात आली असून त्यांच्यामार्फत सॅनिटरी पॅडचे महिलांना वाटप करण्यात आले आहे. सर्व ठिकाणी औषधांचे तसेच सॅनिटरी पॅडसचे वाटप हे पूर्णपणे केमिस्ट असोसिएशनच्या प्रशिक्षीत फार्मासिस्ट यांच्या देखरेखीखालीच करण्यात आले आहे.

दिनांक 11 ऑगस्ट रोजी शिराळा, वाळवा व पलूस या तालुक्यामधील पूरग्रस्त भागामध्ये औषधे देण्यासाठी सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे फार्मासिस्टमार्फत औषधांची मात्रा समजावून सांगून औषधे दिली जात आहेत. सांगली केमिस्ट असोसिएशनमार्फत मिरज व सांगली शासकीय रूग्णालय, महानगरपालिका रूग्णालय, भारती विद्यापीठ हॉस्पिटल व इतर सामाजिक संस्थांना मोफत औषधे पुरवठा करीत आहेत.

आजपर्यंत अन्न व औषध प्रशासन, सांगली केमिस्ट असोसिएशनच्या फार्मासिस्ट मार्फत अंदाजे 20 लाखांची औषधे पूरग्रस्तांसाठी मोफत वाटप करण्यात आली आहेत. पुढील कालावधीमध्ये अंदाजे सुमारे 50 लाखांची औषधे उपलब्ध करण्यात येत आहेत. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त धनंजय जाधव, औषध निरीक्षक विकास पाटील व महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सीलचे अध्यक्ष विजय पाटील, सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विशाल दुर्गाडे व सर्व सभासद यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा