सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र; जपून वापरण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

राज्यस्तरीय पहिल्या मराठी समाज माध्यम संमेलनाचा समारोप;
सोशल मीडियाशी संबंधित विविध विषयांची उपस्थितांना मेजवानी

मुंबई, दि. १८ - सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र असून तुमची छोटीशी चूकही महागात पडू शकते. केवळ दुसरा करतोय म्हणून कोणतीही गोष्ट करू नका, असे कळकळीचे आवाहन आज सोशल मीडिया संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विविध तज्ज्ञांनी केले. दरम्यान, आज दुसऱ्या दिवशीदेखील या संमेलनाला नेटकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोशल मीडिया, ब्रँड, व्यावसायिक दृष्टिकोन आणि वापर, व्हायरल होणाऱ्या गोष्टी, सोशल मीडियामुळे वाटणाऱ्या चिंता त्यावरील उपाय, टूल्स आणि टेक्निक आदी विविध विषयांची मेजवानी आज या सम्मेलनाद्वारे उपस्थितांना मिळाली.

'व्हायरल होतं, का करता पण येतं?' या परिसंवादात प्रसिद्ध पत्रलेखक अरविंद जगताप, गणेश मतकरी, अमोल देशमुख, संजय श्रीधर, पंकज जैन यांनी सहभाग घेतला. कन्टेन्ट चांगले असेल तर ऑटोमॅटिक व्हायरल होते मात्र नकारात्मक गोष्टी लवकर व्हायरल होतात. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र असून तुमची छोटीशी चूकही महागात पडू शकते असा सूर या परिसंवादात उमटला.

'ब्रँड, व्यावसायिक दृष्टिकोन आणि सोशल मीडिया' यावरील परिसंवादात सेटको इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश मंडलिक, ब्रँड व्यावसायिक सदानंद परूळेकर, रूरल मार्केटिंग तज्ञ प्रदीप लोखंडे आणि इ- लर्निंग, इ- गव्हर्नन्स तज्ञ दिलीप टिकले. विनायक गोडसे यांनी सहभाग घेतला. टार्गेट ऑडियन्स पाहून ब्रँड ठरवला जायचा, मात्र सोशल मीडियामुळे सगळं एकच झालं असे सांगून ग्राहक आणि मालक यांच्यात समाज माध्यमामुळे बॉंडिंग तयार झाल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं.'सोशल मीडियावर व्यावसायिक यश कसं मिळवायचं?' या विषयावरील परिसंवादात इन मराठीचे ओंकार दाभाडकर,  मधुरा रेसिपीजच्या मधुरा बाचल, कोलाज इनचे सचिन परब, भाडीपाच्या संस्थापक अनुषा नंदकुमार यांचा सहभाग होता.
सोशल मीडियावर वापरण्यात येणाऱ्या प्रादेशिक भाषांमध्ये मराठी तिसऱ्या क्रमांकावर आहे, डिजिटल मीडियावर जाहिरातीद्वारे पैसे कमवू शकतो मात्र पैसे कमावण्यापेक्षा प्रामाणिकपणे त्या व्यवसायात टिकून राहण्याची गरज तज्ज्ञांनी यावेळी व्यक्त केली.सोशल मीडियासाठी बोलीभाषा आवश्यक आहेत मात्र शब्दच्छल होऊ नये, नियमांचा भंग होऊ यासाठी प्रमाणभाषेची आवश्यकता आहे असा सूर 'सोशल मीडियाची भाषा : प्रमाण भाषा की....' या परिसंवादात  उमटला. या परिसंवादात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक अजय अंबेकर, बीबीसी मराठीचे मयुरेश कोन्नूर, बोलभिडूचे संस्थापक सौरभ पाटील, राज्य मराठी विकास संस्थेचे आनंद काटीकर यांनी सहभाग घेतला. 

'मला व्यक्त होताना असणाऱ्या चिंता, त्यावरील उपाय आणि माझ्या अपेक्षा' या विषयावरील परिसंवादास उपस्थित प्रसाद शिरगांवकर, मराठी संगीतकार कौशल इनामदार, सेटको इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश मंडलिक, सोशल मीडिया लेखिका गौरी ब्रह्मे,  भाडिपाचे  सारंग साठे यांनी सहभाग घेतला.

 माध्यमांची आचारसंहिता पाळून आपण व्यक्त होणं आवश्यक असून सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या  भाषेबद्दल तारतम्य पाळले गेले पाहिजे अशी अपेक्षा या परिसंवादातून व्यक्त करण्यात आली.

'सोशल मीडियामुळे मिळालेले नाविन्यपूर्ण कलाविष्कार आणि संधी' या परिसंवादात बाबा मिमवाले उर्फ सनत लडकत, बुकलेट गाय अमृत देशमुख आणि रॅप बॉस म्युझिक ग्रुपचे अजित शेळके यांनी सोशल मीडियावरील नावीन्यपूर्ण कलाविष्काराची उपस्थितांना माहिती दिली. अजित शेळके यांनी त्यांच्या रॅप साँगचे सादरीकरणही केले.यावेळी 'गावाकडच्या गोष्टी' या गाजलेल्या वेब सीरीजमधील कलाकारांनी सादरीकरण केले. तसेच 'गुगल विरूद्ध अलेक्सा' या प्रसाद शिरगावकर लिखित लघुनाट्याचे सादरीकरण झाले. व्यक्त होणे अजून सोपे करण्यासाठी टूल्स आणि टेक्निक्स यावर स्वरचक्र टंकलेखन निर्माता अनिरुद्ध जोशी यांनी विविध टेक्निक्स उपस्थितांना समजावून सांगितल्या.

राज्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या समाजमाध्यम संमेलनाच्या अभिनव उपक्रमाला सलग दुसऱ्या दिवशीही उपस्थितांचा तसेच फेसबुक लाईव्हद्वारे नेटकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर १९ कोटी ७८ लाख २० हजार रुपये सानुग्रह वाटप.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


कोल्हापूर, दि. 18 (जि.मा.का.) : ग्रामीण भागातील 34 हजार 964 आणि शहरी भागातील 4 हजार 600 अशा एकूण 39 हजार 564 कुटुंबांना रोख 5 हजार रुपये याप्रमाणे आज अखेर 19 कोटी 78 लाख 20 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. 474 पूरबाधित गावांतील 41 हजार 495 कुटूंबाना प्रत्येकी 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ याप्रमाणे 414.95 टन मोफत गहू आणि तांदूळ वितरीत करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
         सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आलेली तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे - करवीर ग्रामीण 4 हजार 424 शहरी  599 कुटुंब 2 कोटी 51 लाख 15 हजार, कागल ग्रामीण 1 हजार 776 कुटुंब शहरी भागात 61 कुटुंब 91 लाख 85 हजार, पन्हाळा ग्रामीण  866 कुटुंब 43 लाख 30 हजार, शाहुवाडी ग्रामीण 397 शहरी 45 कुटुंब 22 लाख 10 हजार, हातकणंगले ग्रामीण  6 हजार 17 शहरी  1 हजार 103 कुटुंब 3 कोटी 56 लाख, शिरोळ ग्रामीण  19 हजार 905  शहरी  2 हजार 789 कुटुंब  11 कोटी 34 लाख 70 हजार राधानगरी ग्रामीण 747 कुटुंब 37 लाख 35 हजार, भुदरगड ग्रामीण 147 कुटुंब 7 लाख 35 हजार, गगनबावडा ग्रामीण 51 कुटुंब संख्या 2 लाख 55 हजार  व धनादेशाव्दारे 83 कुटुंबाना 4 लाख 15 हजार, गडहिंग्लज ग्रामीण 500 कुटुंब 25 लाख, आजरा ग्रामीण  38 व शहरातील 3 कुटुंब 2 लाख 5 हजार आणि चंदगड ग्रामीण 96 कुटुंबाना  4 लाख 80 हजार असे एकूण 19 कोटी 78 लाख 20 हजार अनुदानाचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रपतींच्या हस्ते राजभवनातील भूमिगत संग्रहालयाचे उद्घाटन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई दि. 18: राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज राजभवन येथील बंकर संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल चे. विद्यासागर राव, राज्यपाल यांच्या पत्नी विनोदा राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. बंकर संग्रहालयाचे उद्घाटन केल्यानंतर राष्ट्रपतींसह मान्यवरांनी बंकर संग्रहालयाची पाहणी केली.

जल भूषण पुर्न:बांधणी कोनशिलेचेही अनावरण
राज्यपालांचे निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या जल भूषणच्या पुनर्बांधणीच्या कोनशिलेचे अनावरणही राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल चे. विद्यासागर राव, राज्यपाल यांच्या पत्नी विनोदा राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.

बंकर संग्रहालयाविषयी :
सन 2016 साली राजभवन येथे आढळून आलेल्या भव्य भूमिगत बंकरमध्ये नव्याने संग्रहालय तयार करण्यात आले आहे. जवळ जवळ 15 हजार चौरस फूट परिसरात असलेल्या राजभवनातील विस्तीर्ण भूमिगत बंकरमध्ये संग्रहालय निर्माण करण्यात आले असून ते लवकरच सामान्य नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन आरक्षण करावे लागणार आहे. भूमिगत बंकरमध्ये आभासी वास्तवतादर्शक (Virtual Reality) संग्रहालय तयार केले गेले असून त्याद्वारे लोकांना गतकाळातील बंकरच्या वापराबाबत माहिती देण्यात येणार आहे. या संग्रहालयातील अन्य कक्षामध्ये राजभवनच्या इतिहासाची झलक देखील दाखविली जाणार आहे.


अनेक दशके या बंकरची वास्तू बंदिस्त असल्यामुळे दुर्लक्षित अवस्थेत होती तसेच सतत झिरपणाऱ्या पाण्यामुळे वास्तू स्थापत्य दृष्टीने कमजोर झाली होती.  ही ऐतिहासिक वास्तू राजभवनाचा वारसा असल्यामुळे तसेच त्याच्या वरील बाजूस राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेली जलभूषणही वास्तू उभी असल्यामुळे राज्यपालांच्या सुरक्षेशी तडजोड न करता बंकरचे संवर्धन करणे तसेच लोकांना वास्तू पाहण्याची संधी देणे आवश्यक होते.या दृष्टीने भूमिगत बंकरच्या वास्तूचे स्ट्रक्चरल ऑडीट केले गेले व नंतर तिचे बळकटीकरण करण्यात आले. त्यानंतर बंकरमध्ये आभासी वास्तवदर्शी संग्रहालय करण्याचे ठरविण्यात आले. या बंकरमध्ये विविध आकारांचे 13 कक्ष असून बंकरच्या सुरुवातीला 20 फूट उंच भव्य प्रवेशद्वार, किल्ल्याप्रमाणे बांधकाम तसेच तोफा आत नेण्यासाठी प्रदीर्घ उतारा (Ramp) आहे.


बंकरचा शोध लागला त्यावेळी त्यातील कक्षांना शेल स्टोअर’, ‘गन शेल’, काडतूस भांडार (Cartridge Store), शेल लिफ्ट, मध्यवर्ती तोफखाना कक्ष, कार्यशाळा इत्यादी नावे दिसून आली होती. बंकरमध्ये पाण्याच्या निचऱ्याची तसेच शुद्ध हवा व नैसर्गिक प्रकाशाची योग्य व्यवस्था असल्याचे आढळले. बंकरमध्ये जागोजागी दिव्यांसाठी जागा (Lamp Recess) ठेवण्यात आल्या होत्या. बंकरचे संवर्धन करताना त्यातील सर्व मूळ वैशिष्टे जतन करण्याची काळजी घेण्यात आली आहे.


बंकरमध्ये आभासी वास्तव दर्शविणारे कक्ष तयार करण्यात आले असून त्यातून अभ्यागतांना तोफ चालविण्याचा आभासी अनुभव घेता येईल. राज्यातील गडकिल्ल्यांचा इतिहास तसेच राजभवनाचा इतिहास देखील या ठिकाणी पाहता येणार आहे. तोफांच्या प्रतिकृती व त्रिमितीय जवानांच्या आकृती देखील याठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. 

जल भूषणबाबत...
राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेल्या जल भूषणया वास्तूला 200 वर्षांचा इतिहास आहे. गव्हर्नर माउंटस्टूअर्ट एलफिन्स्टन यांनी बांधलेली प्रेटी कॉटेजयाच ठिकाणी उभी असल्याचे इतिहासात नमूद करण्यात आले आहे. सन 1885 साली मलबार हिल येथील निवासस्थानाचे ठिकाणी गव्हर्न्मेंट हाउसस्थलांतरित झाल्यापासून या वास्तूमध्ये ब्रिटीश गव्हर्नर यांचे व स्वातंत्र्यानंतर राज्यपालांचे निवासस्थान राहिले आहे. अनेकदा बांधली गेलेली ही वास्तू निवासासाठी असुरक्षित असल्याचे आढळून आल्यामुळे या ठिकाणी नवी वास्तू बांधण्याचे ठरविण्यात आले.प्रस्तावित जल भूषणवास्तूमध्ये जुन्या वास्तूमधील ठळक वैशिष्ट्ये जतन केली जाणार आहेत.

योग्य पद्धतीने पूरग्रस्तांचे पुनर्वसन होण्यासाठी विभागीय स्तरावर सुसूत्रता - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


पुणे,दि.18: सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचा दोन दिवसांचा दौरा करून आपण पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. काही गावांना व शिबीरस्थळांना भेटी दिल्या. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. निधीची अजिबात कमतरता भासणार नाही, तथापि, योग्य पध्दतीने मदत व पुनर्वसन होण्यासाठी विभागीय स्तरावर सुसूत्रता ठेवण्यात येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

अधिक माहिती देताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, विभागस्तरावर विभागीय आयुक्त कार्यालयात आपत्ती निवारण कक्ष कार्यरत आहे. यासाठी विविध अधिकाऱ्यांवर योग्य ती जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते सातत्याने बाधित जिल्ह्याच्या संपर्कात असतात. शुक्रवारी सांगली जिल्ह्यामधील वाळवा तालुक्यातील शिरगांव व पलूस तालुक्यातील बुर्ली येथे भेट दिली. सांगली शहरातील सांगलीवाडी, स्टँड परिसर याभागातील अडचणी समजून घेतल्या.
     
पूरग्रस्तांनी धोकादायक घरात अजिबात राहू नये, त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था प्रशासनातर्फे केली जाईल, अशा सूचना दिल्या आहेत. आता महत्त्वाचा प्रश्न आहे,पाणी व वीज पुरवठा. त्यानंतर जीवनावश्यक वस्तू. या बाबी पुरवण्याच्या दृष्टीने सर्वच पातळीवर प्रयत्न सुरू आहे. रोगराई व साथीच्या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय पथक काम करीत आहे. फाँगीग माशीन, पोर्टेबल जेटींग मशीन, टीसीएल पावडर, डस्टींग पावडरचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

शासकीय इमारती, शाळा, समाज मंदिर, पूल आदींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. शालेय साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून ते म्हणाले, पंचनामे पारदर्शक पध्दतीने होतील. नियमानुसार सर्वांनाच मदत होईल. सानुग्रह अनुदान व धान्य वाटप व्यवस्थित होत आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा काम करीत आहेत.

दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड, टाकळीवाड येथील शिबीरांना भेट दिली, नृसिंहवाडी येथील पूरस्थितीची पाहणी केली. तसेच करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली गावाला भेट दिली. कोल्हापूर शहरातील कुंभारगल्ली, शाहूपुरी, व्हीनस कॉर्नर या भागांची पाहणी करून मुस्लिम बोर्ड शिबिराला भेट दिली. नंतर आढावा बैठक घेऊन माहिती जाणून घेतली. ज्या ठिकाणी त्रुटी आढळून आल्या त्याठिकाणी योग्य त्या सूचना केल्या आहेत. शासन व स्वंयसेवी संस्था व व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात मदत येत आहे. परंतु त्यात सुसूत्रता येण्याच्या दृष्टीने प्रशासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत.

दोन्ही बाधित जिल्ह्यातील शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचेही पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले .

सांगली जिल्ह्यात १८ हजार ९२३ पूरबाधित कुटुंबाना गहू, तांदूळ व केरोसिनचे वितरण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतसांगली दि. 18 : जिल्ह्यात पूरबाधित 18 हजार 923 कुटुंबाना गहू, तांदूळ आणि केरोसीनचे वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली. यामध्ये मिरज तालुक्यातील 6 हजार 152 कुटुंबाना 615.2 क्विटल गहू व तितकेच तांदूळ व 3975 लिटर केरोसिन, महानगरपालिका क्षेत्रात 2971 कुटुंबाना 297.1 क्विटल गहू व तितकेच तांदूळ, वाळवा तालुक्यातील 4297 कुटुंबाना 429.7 क्विंटल गहू व तितकेच तांदूळ, 4390 लिटर केरोसिन, शिराळा तालुक्यातील 575 कुटुंबाना 57.5 क्विंटल गहू व तितकेच तांदूळ, आणि पलूस तालुक्यात 4928 कुटुंबानां 492.2 क्विंटल गहू व तितकेच तांदूळ आणि 90 लिटर केरोसिन वितरित करण्यात आले आहे. 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे दिल्लीला प्रयाण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 18 : दोन दिवसांच्या मुंबई भेटीनंतर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हवाई दलाच्या खास विमानाने दिल्लीला प्रयाण केले.

राष्ट्रपती महोदयांना विमानतळावर निरोप देण्यासाठी राज्यपाल चे. विद्यासागर राव, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार तसेच नौदलाचे व्हाइस अॅडमिरल अजित कुमार, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

माध्यमांमधील बदल लक्षात घेऊन शासन सोशल मीडियावर सक्रिय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


'राज्य शासन आणि सोशल मीडिया' या विषयावरील सादरीकरणात माहिती संचालक अजय अंबेकर यांची माहिती

मुंबई, दि.१८- दिवसेंदिवस माध्यमांमध्ये वेगवेगळे बदल होत असून सोशल मीडियाचा आवाकादेखील वाढला आहे.  शासनाच्या लोककल्याणकारी योजना, उपक्रम, निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी  राज्य शासनाने सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म आणि टूल्सचा अतिशय प्रभावीपणे वापर सुरू केला आहे, अशी माहिती राज्याचे माहिती व जनसंपर्क  संचालक अजय अंबेकर यांनी दिली.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र सायबर, राज्य मराठी विकास संस्था, आणि पुण्यातील डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने  पहिले राज्यस्तरीय मराठी सोशल मीडिया संमेलन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आले. त्यामध्ये 'राज्य शासन आणि सोशल मीडियाचा वापर' या विषयावरील सादरीकरणात श्री. अंबेकर बोलत होते.

शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना, उपक्रम, निर्णय नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय पारंपरिक माध्यमांबरोबरच सोशल मीडियाचाही प्रभावी वापर करीत आहे. यामध्ये ट्विटर, यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, व्हॉट्स अप, एसएमएस. जिओ चॅट चॅनल आदी विविध प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही उत्तम आहे असे श्री. अंबेकर यांनी सांगितले.

सोशल मीडिया व्यतिरिक्त संवादवारी, संवादिनी, माहितीदूत, महामित्रसारख्या उपक्रमांतून चित्ररथ, प्रदर्शन, प्रकाशने, लोककला, पथनाट्य आदींद्वारे लोकांशी थेट संवाद साधला जातो. गणेशोत्सवात 'संवाद पर्व'चे आयोजन केले जाते. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे असेही त्यांनी सांगितले.


सामान्य जनतेच्या परिवर्तनात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या समाज माध्यमांचा सकारात्मक व विधायक कार्यासाठी वापर होणे आवश्यक आहे. या समाज माध्यम वापरकर्त्यांना एकत्र आणून या विषयावर सकारात्मक सर्वांगीण चर्चा घडविण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे शेवटी श्री. अंबेकर यांनी सांगितले.


मुंबई विद्यापीठात प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मूव्हमेंट सेंटरचे उद्या उद्घाटन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई दि. 18 : राज्य शासन आणि मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात साकारत असलेल्या प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मुव्हमेंट सेंटरचे उद्या राज्यपाल सी. विद्यासागर राव  यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. इमारतीचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांच्या हस्ते होणार आहे.

कलिना येथील ग्रीन टेक्नॉलॉजी सभागृहात 19 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 9.30 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील,  उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जगभरातील सामाजिक परिवर्तनाच्या रचनात्मक आणि आंदोलनात्मक बाबींमध्ये विद्यार्थी व युवक चळवळीचे मोठे योगदान  लाभले आहे. भारतातच नव्हे तर जगातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वा आर्थिक परिवर्तनामध्ये युवावर्गाची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. याचाच शास्त्रशुद्ध अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी विद्यापीठात प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मुव्हमेंट सेंटर नव्याने साकार करण्यात येत आहे. या केंद्राच्या माध्यमातून जगभरातील विद्यार्थी व युवा चळवळींचा आंतरविद्याशाखीय तसेच तुलनात्मक अभ्यास करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील तसेच समकालीन विद्यार्थी युवा चळवळींची विचारप्रणाली, कार्यपद्धती, सामाजिक-राजकीय भूमिका व योगदान यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास हे केंद्राचे वैशिष्ट्य असणार आहे.

या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थी व युवा वर्गाला त्यांच्यातील क्षमतांची जाणीव करुन देत त्यांच्या माध्यमातून भारताचे स्थान आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक उंचावत नेणे हे या केंद्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील एनजीओना लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे काम या सेंटरच्या माध्यमातून केले जाणार आहे. या केंद्रातील विद्यार्थी हे राजकीय आणि सामाजिक विश्लेषक म्हणून युनो व त्यांच्याशी संलग्न आंतरराष्ट्रीय संस्थामध्ये विविध पदांवर काम करु शकतील तसेच विविध देशाच्या दूतावासांमध्ये राजकीय सल्लागार या पदावर कामाच्या संधी प्राप्त होऊ शकतील. या केंद्रातील विद्यार्थ्यांमधून आदीवासी विकास, ग्रामविकास, आरोग्य, पाणी, शिक्षण अशा विविध विषयांत काम करणारे सामाजिक नेते तयार होतील.

या केंद्रामध्ये अल्पमुदतीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करून पीएचडी अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या विद्यार्थ्यांसाठी नेतृत्वविकास हा पाच दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षात दोन वर्षाचा पदव्युत्तर पदवी आणि एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाईल.

या केंद्रामधील संशोधनात्मक प्रकल्पाअंतर्गत मायनर आणि मेजर रिसर्च प्रोजेक्टचा समावेश असेल. आयसीएसएसआर, आयसीसीआर आणि आयसीपीआर सारख्या विविध राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या संस्थांशी संलग्न राहून विद्यार्थी व युवक चळवळीशी निगडीत अनेक पैलूंवर सखोल संशोधन करणारे रिसर्च फेलो या सेंटरचा महत्त्वाचा घटक असणार आहे. याचबरोबर पीएचडीसाठीचे संशोधनही या केंद्रामध्ये चालणार आहे. या सातत्यपूर्ण संशोधनाबरोबरीनेच वेळोवेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन दरवर्षी केले जाणार आहे. देश-विदेशातील संशोधकांना आपले संशोधन मांडण्यासाठी व परस्पर चर्चेसाठी हे केंद्र उत्तम व्यासपीठ म्हणून नावारुपाला येणार आहे. याशिवाय एक-दोन महिन्याच्या कालावधीसाठी इंटर्नशिप प्रोग्रामही चालविले जाणार असून समर स्कूल/ विंटर स्कूलच्या माध्यमातून निवडक विद्यार्थ्यांना इंटर्न म्हणून संशोधन तसेच प्रत्यक्ष फिल्डवर्कचा अनुभव घेता येईल. या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी आर्ट गॅलरी, यद्ययावत ग्रंथालय तसेच दृक-श्राव्य माध्यमांचा प्रभावी उपयोग करुन बनविलेले संशोधन साहित्य यांचा समावेश असणार आहे.

या केंद्राच्या उभारणीसाठी राज्य शासनाने 25 कोटी  रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, रिसर्च फेलो, ग्रंथपाल आदी 11 पदांची निर्मिती करण्यात आली असून त्याचा आर्थिक भार राज्य शासन उचलणार आहे. याशिवाय जिल्हा विकास निधीमधून सेंटरच्या बांधकामासाठी 12 कोटी 54 लाख रुपये मुंबई विद्यापीठाला मंजूर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर विविध कंपन्यातील सीएसआर निधीअंतर्गत आर्थिक सहाय्य या केंद्राला लाभणार असून सुरुवातीपासूनच हे केंद्र आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यात आले आहे. या केंद्रातील शैक्षणिक उपक्रमांमधून समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत भरीव योगदान देतील असे सशक्त युवा पदवीधर, संशोधक आणि नेतृत्व तयार होईल असा आशावाद व्यक्त केला जातो आहे.

प्राचीन संत साहित्य, ग्रंथसंपदेचे नवीन तंत्रज्ञानाद्वारे डिजिटलायजेशन आवश्यक - नितीन गडकरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतडॉ. मधुकर रामदास जोशी यांना यंदाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारप्रदान

नागपूर, दि.18 :  प्राचीन इतिहास, संस्कृती वारसा आणि संतांची सांस्कृतिक मूल्याधिष्ठित विचारधारा ही महाराष्ट्राची खरी शक्ती आहे. जुने संत साहित्य आणि त्यांचे निरुपण, भावार्थ नवीन पिढीसाठी सहज उपलब्ध व्हावे, यासाठी या ग्रंथसंपदेला डिजिटलायजेशन सारख्या नवीन तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
     

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सांस्कृतिक संचालनालयातर्फे ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारयंदा ज्येष्ठ साहित्य संशोधक व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. मधुकर रामदास जोशी यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी श्री. गडकरी बोलत होते. खासदार डॉ. विकास महात्मे, महापौर श्रीमती नंदा जिचकार, पुरस्कार निवड समितीचे सदस्य डॉ. गुरूप्रसाद पाखमोडे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


श्री. गडकरी म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथील संत श्री ज्ञानेश्वर, श्री नामदेव, श्री तुकाराम, श्री तुकडोजी महाराज, श्री गाडगेबाबा, श्री गुलाबराव महाराज हे केवळ संतच नव्हते तर खऱ्या अर्थाने समाजसुधारक होते. समाजामध्ये सुसंस्कृती व मूल्याधिष्ठित विचारसरणी जपण्यासाठी त्यांनी समाजाला मोलाची शिकवण दिली. ज्येष्ठ अभ्यासक व साहित्यिक डॉ. मधुकर रामदास जोशी यांना ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारप्रदान करताना मनस्वी आनंद होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
       

महाराष्ट्रातील संत साहित्याला केवळ देशातच नाहीतर जगात मान्यता मिळवून देण्यासाठी संतांनी संग्रहित केलेले प्रेरणादायी कार्य जगापुढे येणे गरजेचे आहे. जुने संत साहित्य, ग्रंथसंपदा नवीन पिढीला उपलब्ध व्हावे तसेच या ग्रंथसंपदेचे जतन व्हावे यासाठी नवीन आयटी तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. यासाठी सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने पुढाकार घेण्यात यावा, असे आवाहनही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.


डॉ. मधुकर रामदास जोशी म्हणाले की, ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराने सन्मानित होणे हा केवळ माझाच नाहीतर संत साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांचा सन्मान असल्याचे मी मानतो. विदर्भ ही सारस्वतांची भूमी आहे. या पवित्र भूमीत महानुभाव पंथाचा विकास झाला. दत्त संप्रदायदेखील येथे उदयास आला. रामदासी व महानुभाव पंथाची शब्दरचना अलौकिक आणि विस्मयकारी आहे. सुफी संप्रदायाचे महत्त्वदेखील विलक्षण आहे. या सर्वांच्या माध्यमातून समाजाला मुल्याधिष्ठित विचारसरणी रुजविण्याचे काम केले गेले आहे. प्राचिन हस्तलिखीतांचे शोध घेण्यासाठी मी तामिळनाडू, आंध्रप्रदेशापर्यंत गेलो. संत साहित्याची ग्रंथसंपदा महाराष्ट्रात विपूल प्रमाणात आहे. सर्व संतांनी जगाला मानवतेचा मंत्र दिला आहे. यासाठी सामान्य नागरिकाला समजेल अशा सोप्या शब्दांमध्ये संतांनी जीवनाचे सार सांगितल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्य संशोधक व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. मधुकर रामदास जोशी यांना ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारप्रदान करण्यात आला. यावेळी शाल, श्रीफळ, मानपत्र तसेच विठ्ठलाची मूर्ती देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांचा शुभेच्छा संदेश दाखविण्यात आला. पंढरपूरचे वारकरी दत्तात्रय बडवे यांनी डॉ. मधुकर जोशी यांना खास पंढरपुरी बुक्का लावून अभिनंदन केले.                  सुप्रसिध्द गायक प्रथमेश लघाटे, शरयू दाते, गुणवंत घटवाई, सोनाली दिक्षीत या गायकांनी भक्तीरंग संगीतमय कार्यक्रम सादर केला.

डॉ. मधुकर रामदास जोशी हे संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आहे. मराठी आणि संस्कृत या दोन भाषांमध्ये पदव्युत्तर आणि नाथ संप्रदायाच्या संशोधनार्थ आचार्य उपाधी त्यांनी प्राप्त केली आहे. नाथ संप्रदाय’, ‘श्री दत्तगुरूचे दोन अवतार’, ‘मनोहर अंबानगरी’, ‘ज्ञानेश्वर चरित्र संशोधन’, ‘ज्ञानेश्वरी संशोधन’, ‘श्री विठ्ठल आणि पंढरपूर’, ‘गुरूचरित्रआदी अनेक पुस्तके प्रकाशित केली आहे. तुकाराम महाराजांच्या एक हजार पृष्ठांच्या गाथेचे त्यांनी संपादन देखील केले आहे.

'सोशल मीडिया मस्त आहे!'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
पहिल्या मराठी समाज माध्यम संमेलनात पहिल्या दिवशीच्या चर्चासत्रातील सूर


मुंबई, दि. 17 : सोशल मीडियावर आजची तरुणाई अधिकाधिक वेळ घालवताना दिसते. त्यामुळे हे माध्यम टाईमपासचे किंवा काम नसलेल्यांसाठी आहे असा सूर असतो. मात्र याच सोशल मीडियाच्या माध्यमातून विधायक कामही करता येऊ शकते.  त्यामुळेच आजचा 'सोशल मीडिया मस्त आहे!' अशी प्रतिक्रिया समाज माध्यम संमेलनाच्या पहिल्या दिवसाच्या वेगवेगळ्या चर्चासत्रात उमटली.  

सामान्य जनतेच्या परिवर्तनात महत्वाचे योगदान देणाऱ्या समाज माध्यमांचा सकारात्मक व विधायक कार्यासाठी वापर होणे आवश्यक आहे. या समाज माध्यम वापरकर्त्यांना एकत्र आणून या विषयावर सकारात्मक सर्वांगीण चर्चा घडविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र सायबर, राज्य मराठी विकास संस्था, आणि पुण्यातील डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पहिले राज्यस्तरीय मराठी समाज माध्यमसंमेलन आज आणि उद्या मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजित करण्यात आले आहे.

"सोशल मीडिया मस्त आहे" अशा शब्दांत लेखक आणि कवी प्रसाद शिरगावकर यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अनुभवांना शब्दबद्ध केले. श्री.शिरगावकर यांनी वीस वर्षांचा समाजमाध्यमांचा प्रवास उलगडताना या काळातील प्रवाह आणि अनुभव यावेळी मांडले.सोशल मीडियावर झालेल्या उल्लेखनीय गोष्टी या अनुभव कथनाच्या कार्यक्रमात आकाश बोकमूरकर यांनी आपत्कालीन परिस्थितीचा सामना करताना सोशल मीडियाचा केलेला वापर सांगितला. पूरग्रस्तांना समाज माध्यमाद्वारे तातडीची मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करतानाच, त्यांना अन्नधान्याबरोबरच आता घरासाठी मदत मिळावी म्हणून समाजमाध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याच कार्यक्रमात मराठी मंडळींना एकत्र येण्यासाठी, मराठीचा वापर वाढून कला-गुणांना वाव मिळावा यासाठी ट्विटरसंमेलन आयोजित केले जाते, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो असे ट्विटरसंमेलनाचे आयोजक स्वप्निल शिंगोटे यांनी सांगितले. यावेळी सातारा हिल मॅरॅथॉनचे आयोजक डॉ.संदीप काटे यांनी आज या मॅरेथॉनला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामध्ये सोशल मीडियाचा किती महत्त्वाचा वाटा आहे, ते उलगडून सांगितले. इंटरनेट आणि सोशल मीडियाचा योग्य वापर आवश्यकच आहे. आपल्याकडे समाज माध्यम वापरण्याचे वय, निकष नाहीत मात्र परदेशात व्हॉटसॲप 16 वर्षांनंतर वापरण्याचा नियम असल्याचे उन्मेश जोशी यांनी सांगितले.

दुपारच्या सत्रात स्टँडअप कॉमेडियन सावनी वझे यांनी ग्लोबलायझेशनची व्याख्या किती विस्तारली आहे, हे आपल्या स्टँडअप कॉमेडीतून उपस्थितांना सांगितले. वेगवेगळ्या समाज माध्यमांचा वापर करताना आजही अनेकांची किती त्रेधातिरपिट होते हे त्यांनी सांगितले.

'नेटवर्किंग ते मीडियम, ऑफलाईन ते ऑनलाईन' या विषयावर बोलताना मटा ऑनलाईनचे संपादक हारिस शेख यांनी नवे काय, वाचकांना नेमके हवे काय आणि वृत्तपत्रांनी नेमके मांडायचे काय या विषयीचा उहापोह केला.

'माझी expression, माझं impression' चर्चासत्रास  महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत तसेच यजुर्वेंद्र महाजन, डॉ.श्रुती पानसे, अमोल देशमुख, श्रीकांत जाधव यांनी सहभाग घेतला.

नकारात्मक पोस्टपासून, खोट्या समाज माध्यम खात्यापासून दूर रहा, आपली फसगत तर होत नाही ना हे तपासून पहा असे बोल भिडू पोर्टलचे संस्थापक श्रीकांत जाधव यांनी सांगितले. समाज माध्यमाबद्दल अनेकजण नकारात्मक असतात पण सकारात्मकतेकडेही तितकेच पाहिले पाहिजे त्यावर विचार करायला हवा. नवीन रचनात्मक कामांना समाज मान्य करतोय. अनेक शोध लागत गेले पण यातील चांगलं-वाईट हे आपण घ्यायला हवे असे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत यांनी सांगितले. डॉ.श्रुती पानसे यांनी लहान मुलांना समाज माध्यमांपासून दूर ठेवणे आवश्यक असल्याचे नमूद केले. तर अमोल देशमुख यांनी कोणत्याही माध्यमांचा आपल्यावर अतिरेक होत नाही ना हे तपासून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.

'समाजाची दशा, दिशा आणि दिशांतरे' या विषयावरील परिसंवादात राजकीय विश्लेषक शेफाली वैद्य, राजू परूळेकर, बीबीसी मराठीचे मुख्य संपादक आशिष दीक्षित, ब्लॉगर आणि इतिहास अभ्यासक सौरभ गणपत्ये सहभागी झाले. प्रदीप लोखंडे यांनी चर्चासत्राचे समन्वयन केले.

समाज माध्यमांमुळे पारंपरिक माध्यमांमधून दिल्या जाणाऱ्या माहितीची पुनर्तपासणी करण्याची संधी सर्वसामान्यांना प्राप्त झाली आहे असे मत शेफाली वैद्य यांनी व्यक्त केले. बीबीसी मराठीच्या आशिष दीक्षित यांनी सांगितले की, बीबीसी या संस्थेने आपली विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे. सौरभ गणपत्ये यांनी सांगितले, पारंपरिक मीडिया आणि सोशल मीडिया एकमेकांना पूरक असून कोणत्याही माध्यमातील बातमी पूर्ण न वाचता त्यावर प्रतिक्रिया देण्याची सवय वाढली आहे. बातमीकडे वाचक आकृष्ट होण्यासाठी नेमक्या शब्दात बातमीच्या मजकुराबरोबरच बातमीचा मथळाही तितकाच आकर्षक असणे गरजेचे आहे, असे राजू परुळेकर यांनी सांगितले.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे जनजीवन पूर्वपदाच्या दिशेने

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

विभागात 23 कोटी 71 लाख 40 हजाराचे सानुग्रह अनुदान वाटप

पुणे, दि. 17 : मदत व पुनर्वसनासाठी सर्वच आघाड्यांवर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचे जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. एकीकडे सानुग्रह अनुदानाचे वाटप जलदगतीने सुरू असतानाच गावातील स्वच्छता, रस्ते-पूल दुरूस्ती, वीज, पाणी पुरवठा, वैद्यकीय सेवा आदी अत्यावश्यक सेवाही पुरविण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला. दोन दिवसांपासून आपण या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे स्पष्ट करून डॉ.म्हैसैकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील तीन गावे वगळता अन्य सर्व गावांचा संपर्क प्रस्थापित झाला आहे.

शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील बाधित कुटुंबांना 10 हजार तर शहरी कुटुंबांना 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. यापैकी 5 हजार रुपये रोख स्वरुपात बाधित कुटुंबाला वाटण्याचे काम सुरु असून उर्वरीत रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. आतापर्यंत पुणे विभागात 47 हजार 428 बाधित कुटुंबांना 23 कोटी 71 लाख 40 हजार रुपयांची रोख रकमेचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 12 कोटी 50 लाख 60 हजार रुपये, सांगली जिल्ह्यात 10 कोटी 54 लाख 75 हजार, सातारा जिल्ह्यात 28 लाख 30 हजार, पुणे जिल्ह्यात 17 लाख 50 हजार तर सोलापूर जिल्ह्यात 20 लाख 25 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
  
तसेच प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू व 10 किलो तांदूळ  याप्रमाणे पुणे विभागातील 36 हजार 53 कुटुंबांना गहू व तांदुळ प्रत्येकी 3605.3 क्विंटल तर 13 हजार 31 लिटर केरोसिनचे वाटप करण्यात आले आहे.

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी कमी झाली असून त्या धोकापातळीच्या खाली वाहत आहेत.

या पुरामुळे सांगली जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 104 गावे बाधीत असून यामधील 47 हजार 475 कुटुंबातील 1लाख 89 हजार 900 व्यक्ती स्थानांतरील असून त्यांची 30 तात्पुरत्या निवारा शिबीरात व्यवस्था करण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 375 गावे बाधीत असून 4 लाख 7 हजार 531 लोकांना स्थानांतरीत करून त्यांची 151 तात्पुरत्या निवारा शिबीरात व्यवस्था करण्यात आली आहे.
  
पुरामुळे संपर्क तुटलेल्या सांगली जिल्ह्यातील सर्व गावांचा संपर्क पूर्ववत झाला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील केवळ तीन गावे अजूनही पुराच्या पाण्याने वेढली असून यामधील 8 हजार 196 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

तसेच रस्त्याच्या बाबतीत सांगायचे झाल्यास सांगली जिल्ह्यातील 41 तर कोल्हापूर जिल्ह्यातील 75 रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले आहेत.

बँकींग सेवाही पूर्वपदावर येत आहे. आतापर्यंत सांगली जिल्ह्यात 253 तर कोल्हापूर जिल्ह्यातील 442 एटीएम सेवा सुरू करण्यात यश आले आहे.

पूरग्रस्तांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळण्याच्या दृष्टीने दोन्ही जिल्ह्यात 478 वैद्यकीय पथके अहोरात्र सेवा देत आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यात 237, कोल्हापूर जिल्ह्यात 169, सातारा जिल्ह्यात 72 वैद्यकीय पथकांचा समावेश आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे पुणे विभागातील एकूण 55 लोकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 27, कोल्हापूर जिल्ह्यातील 10, सातारा जिल्ह्यातील 8, पुणे जिल्ह्यातील 9 तर सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. विभागातील तीन लोक बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे.

पुराच्या तडाख्यात गाय व म्हैसवर्गीय 7 हजार 847 जनावरे, 1 हजार 65 शेळ्या-मेंढ्या तर 166 लहान वासरे व गाढवांचा मृत्यू अथवा बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात 5 बचावपथके तैनात असून 9 बोटी व 82जवानांचा समावेश आहे.

विविध संस्था व व्यक्तींकडून विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधी करिता 6 लाख 61 हजार 311 रुपयांचे धनादेश जमा झाले आहेत. या व्यतिरिक्त वस्तूरूपातील मदतीचाही समावेश आहे. आजपर्यंत सांगली जिल्ह्यासाठी 46 ट्रक तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी 44 ट्रक असे एकूण 90 ट्रकद्वारे मदतीचे साहित्य पाठविण्यात आले आहे.

पुरामुळे खंडीत झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणाच्या माध्यमातून युध्द पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. महावितरणच्या पुणे, बारामती परिमंडळातून 48 पथके कोल्हापूर येथे तर 12 पथके सांगली जिल्ह्यात पाठविण्यात आली असून त्यांचे काम सुरू आहे. या पथकांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील 13 उपकेंद्र, 2 हजार 894 रोहित्र दुरूस्त करण्यात आले असून एकूण 1 लाख 30 हजार 462 ग्राहकांचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील 26 उपकेंद्रे, 3 हजार 818 रोहित्रे दुरूस्त करण्यात आली असून 1 लाख 84 हजार 822 ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरूळीत करण्यात महावितरणला यश आले आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणारे पुरेशा साहित्याची उपलब्धता करण्यात आली आहे.

तसेच पूरस्थितीमध्ये बंद झालेल्या सांगली जिल्ह्यातील 45 मार्गापैकी 39 मार्गावरील एसटीची वाहतूक पुर्ववत सुरु करण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील बंद असलेल्या 31 मार्गापैकी 26 मार्गावरील एसटीची वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

त्याचबरोबर शेतीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.