सुरक्षा रक्षकांचे वेतन नियमितपणे अदा करण्याचे कामगारमंत्री डॉ.संजय कुटे यांचे निर्देश

1 टिप्पणी

मुंबई, दि. 23 : सुरक्षा रक्षकांचे वेतन नियमितपणे आणि वेळेत  अदा  करावे. त्यासाठी आवश्यकता भासल्यास सुरक्षा रक्षक गार्ड मंडळाकडे जमा असलेल्या निधीतून सुरक्षा रक्षकाच्या वेतनाच्या 80 टक्के वेतन त्यांना दरमहा अदा करावे, असे निर्देश कामगार मंत्री डॉ.संजय कुटे यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक सल्लागार समितीची बैठक आज मंत्रालयात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.


डॉ. कुटे यांनी सांगितले, सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी ऑनलाईन भरतीस मोठ्या प्रमाणात चालना देण्यात आली आहे. राज्यातील पुणे, रायगड, बृहन्मुंबई-ठाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरती सुरू झाली आहे. सुमारे तीन हजार सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया जुलै अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचेही श्री. कुटे यांनी यावेळी सांगितले.


सर्व आस्थापनांवरच्या सुरक्षा रक्षकांना आकर्षक व प्रभावी असा गणवेश देण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या. त्याचबरोबर, सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देणे, त्यांना आवश्यक ती साधने उपलब्ध करुन देणे. दरवर्षी त्यांची शारीरिक क्षमता चाचणी घेणे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.


यावेळी कामगार विभागाचे राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक सल्लागार समितीचे सदस्य पराग अळवणी,  प्रधान सचिव राजेश कुमार, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, उपसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, कामगार प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
0000
विसअ/अर्चना शंभरकर/संगिता बिसांद्रे/ 23-7-19

1 टिप्पणी