अनुसूचित जमातीचा बेंचमार्क सर्व्हे करण्याची कार्यवाही करण्याच्या आदिवासी विकास राज्यमंत्र्यांच्या सूचना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 25 : आदिवासी जमातीचा बेंचमार्क सर्व्हे करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांनी आज येथे दिले.

आदिवासी विकास विभागामार्फत करण्यात येणाऱ्या अनुसूचित जमातीचा बेंचमार्क सर्व्हे करण्याच्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक आज मंत्रालयात घेण्यात आली.

डॉ.फुके यावेळी म्हणाले, अनुसूचित जमातीचा विकास ही शासनाची जबाबदारी असून त्याकरिता आदिवासींचा बेंच मार्क सर्व्हे करणे आवश्यक आहे. यापूर्वी असा सर्व्हे सन 1996 साली झाला असून त्यानंतर सर्व्हे घेण्यात आलेला नाही. तरी चालू वर्षी अशा सर्व्हेच्या माध्यमातून आदिवासींची विविध संख्यात्मक माहिती व शासनाच्या विविध योजनांमधून आजतागायत झालेल्या आदिवासींच्या विकासाचा वस्तुनिष्ठ आढावा घेणे गरजेचे आहे. त्याकरिता बेंच मार्क सर्व्हे आवश्यक असल्याचे डॉ. फुके यांनी सांगितले.

या सर्वेक्षणाचा उद्देश आदिवासी जमातींच्या विकासाचे नियोजन करणे, सांख्यिकी माहिती तयार करणे, आदिवासी जमातींच्या आर्थिक आणि सामाजिक सद्य:स्थितीचा अभ्यास करणे, योजनांचे मॅपिंग करणे तसेच आदिवासी गावे आणि पाडे येथील भौतिक सुविधांचा अभ्यास करून संसाधन वितरण करण्यासाठी आदिवासी क्षेत्रे निश्चित करणे आहे. हे सर्वेक्षण सद्य:स्थितीतील अनुसूचित क्षेत्रात केले जाणार असून ते जनगणना स्वरूपाचे असेल. ही संवेदनशील स्वरुपाची प्रक्रिया व्यवस्थितपणे हाताळण्याबाबत तसेच जलद गतीने करण्याबाबत डॉ.फुके यांनी निर्देश दिले.

या बैठकीस आदिवासी विकास आयुक्त नितीन पाटील, आदिवासी विकास विभागाचे उप सचिव श्री. ढोके तसेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने सल्लागार धर्माळे, संशोधन अधिकारी लीन पाटील तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा