देशाला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेणारा अर्थसंकल्प - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई दि. ५ : शेतकरी, महिला आणि गाव- शहरांचा सर्वांगीण विकास याला केंद्रस्थानी ठेवून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आजच्या अर्थसंकल्पात देशाला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्याचा प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

देश महात्मा गांधीजी यांची १५० वी जयंती साजरी करत असताना त्यांना अभिप्रेत असलेला सक्षम गाव-सक्षम देश घडविण्याला या अर्थसंकल्पातून खऱ्या अर्थाने बळ मिळाले आहे.

देशाची अर्थव्यवस्था जी २०१३-१४ ला ११ व्या स्थानावर होती ती केवळ पाच वर्षात सहाव्या स्थानावर पोहोचली आहे. हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वातील केंद्र सरकारचे ठळक यश आहे. आर्थिक प्रगतीचा हा वेग पाहता येत्‍या काळात 5 ट्रिलियन डॉलरचे लक्ष्‍य निश्‍चितपणे पूर्ण होईल यात मुळीच दुमत नाही. 2022 पर्यंत शेतकऱ्यांच्‍या उत्‍पन्‍नात दुप्‍पट वाढ करण्‍याचा संकल्‍प असो की 2022 पर्यंत प्रत्‍येक घरात वीज आणि एलपीजी गॅस पोहोचविण्‍याचा संकल्‍प असो या माध्‍यमातून सरकारची गरिबांच्‍या व शेतकऱ्यांच्या कल्‍याणाविषयीची सजगता स्‍पष्‍ट होते.

भारताला रोजगार प्रधान देश म्‍हणून मान्‍यता मिळवून  देताना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करण्याचा संकल्प हा  देशातील युवकांचे मनोबल उंचावणारा आहे. युवकांसाठी नॅशनल रिसर्च फाऊंडेशनची स्‍थापना हे युवाशक्‍तीच्‍या सशक्‍तीकरणाच्‍या प्रक्रियेतील महत्त्‍वपूर्ण पाऊल ठरणार आहे. नवीन उद्योग कॉरीडोरच्‍या माध्‍यमातून उद्योग क्षेत्राला सरकारने प्रोत्‍साहन दिले आहे. रोजगार, उद्योग व पायाभूत सुविधांसाठी करण्‍यात आलेली लक्षणीय तरतूद देशाच्‍या प्रगतीचा आलेख वाढत असल्‍याचे द्योतक आहे. अन्‍नदात्‍याला ऊर्जादाता करण्‍यासाठी विविध योजना राबवून त्‍याचे सशक्‍तीकरण करण्‍याचा सरकारचा मनोदय शेतकरी आणि गरीबों के सन्‍मान में, मोदी सरकार मैदान में हे स्‍पष्‍ट करणारा आहे, असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

भारताला उच्‍च शिक्षणाचा हब बनविण्‍याचा संकल्‍प, खेळाडूंसाठी राष्‍ट्रीय शिक्षा बोर्ड स्‍थापन करण्‍याचा मनोदय, पायाभूत सुविधांच्या जोडणीवर दिलेला भर, हर घर जल सारखा नाविन्यपूर्ण कार्यक्रम, विदेशी विद्यार्थ्‍यांसाठी स्‍टडी इन इंडिया कार्यक्रम, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कराबाबतची सुलभता आदींच्‍या माध्‍यमातून देशाच्या सामाजिक, आर्थिक क्षेत्राचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाने भरीव प्रयत्न केल्याचे दृष्टीपथात येते. सर्वच क्षेत्रांना न्‍याय देणारा सर्वस्‍पर्शी, सर्वसमावेशक व देशाला प्रगतीपथावर नेणारा हा अर्थसंकल्‍प आहे. या अर्थसंकल्‍पाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन करतो असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
00000

विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प - उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे

मुंबई, दि. 5 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे.

श्री. तावडे यांनी अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, सर्वसामान्यांचा विकास हाच केंद्रबिंदू ठेवून आजच्या अर्थसंकल्पात विविध योजना आहेत. गाव, गरीब आणि शेतकऱ्यांना विकासाचा केंद्रबिंदू मानून रोजगारासाठी अर्थसंकल्पात मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. तसेच हा युवकांचे मनोबल वाढविणारा अर्थसंकल्प आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ सबका विकास व सबका विश्वास' सार्थ ठरविणारा व श्री. मोदी यांच्या नवभारताची संकल्पना पूर्णत्वास नेणारा आणि उच्च शिक्षणाचा दर्जा सर्वोत्तम बनविण्याचा संकल्प मांडण्यात आला आहे.
0000

स्टार्टअपला मिळणार गती - कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर

मुंबई दि. 5 :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात स्टार्टअपला गती मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी व्यक्त केली आहे.

उच्च शिक्षणाला चालना मिळण्याबरोबरच स्टार्टअप सुरू करणाऱ्यांना केंद्र शासनाकडून प्रोत्साहन मिळणार आहे. स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी दूरदर्शनवरून विशेष कार्यक्रम सुरू करण्यात येणार असल्याने ग्रामीण भागात राहणारे तरुणही स्टार्टअपकडे वळतील. डिजिटल शिक्षण देण्यास प्राधान्य मिळेल, अशी प्रतिक्रिया श्री. पाटील-निलंगेकर यांनी दिली.
0000शिक्षणाबाबत संशोधनावर भर देण्यात येणार याचा आनंद
- शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. 5 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात शिक्षणासंदर्भातील संशोधनावर भर देण्यात येणार असून उच्च शिक्षणासाठी वेगळी तरतूद करण्यात आली आहे याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली.

ॲड. शेलार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत सांगितले, आजच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शिक्षण धोरण, शिक्षणासंदर्भात संशोधनावर भर, उच्च शिक्षणासाठी तरतूद या समाधानकारक बाबी आहेत. 'भारत में अध्ययन' यामध्ये परदेशातील अधिकाधिक विद्यार्थी भारतात उच्च शिक्षणासाठी येतील असा विश्वास वाटतो. खेळाडूंच्या विकासासाठी राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण बोर्ड स्थापन करण्यात येणार असल्याने याचा फायदा अधिकाधिक खेळाडूंना होणार आहे.
००००भारतीय अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल आणणारा अर्थसंकल्प - पदुम राज्यमंत्री अर्जुन खोतकर

मुंबई, दि. 5 : केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा भारतीय अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया पदुम आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली.

देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देणारा हा अर्थसंकल्प आहे कृषी क्षेत्र, गृहनिर्माण क्षेत्र, पायाभूत सुविधा क्षेत्र, सेवा क्षेत्र इत्यादी क्षेत्रातील भरीव गुंतवणुकीमुळे देशांतर्गत रोजगारास मोठ्या संधीची दालने खुली होणार आहेत. त्यामुळे कुशल तसेच अकुशल या दोन्ही क्षेत्रात संधी निर्माण होणार आहेत, असेही श्री.खोतकर म्हणाले.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सरकारी माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या मदतीमुळे तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या धोरणामुळे आगामी आर्थिक वर्षात कर्ज वितरण मोठ्या प्रमाणावर होऊन कृषी क्षेत्रातील नव उद्योजक,शेती उत्पादक कंपन्या याद्वारे शेतकऱ्यांच्या मालाची उत्पादकता,साठवणूक,विक्री यामध्ये दर्जात्मक वृद्धी होईल. सर्व ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राचा हातभार लागणार आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. याद्वारे देशभरात 1,25,000 कि.मी. पेक्षा जास्त रस्त्यांची निर्मिती होणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा