सर्व क्रीडा संकुलांचा आढावा घेऊन त्यांच्या विकासाचा सर्वंकष अहवाल सादर करण्याच्या वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. ८ :  राज्यात क्रीडा कौशल्ये असलेल्या युवक- युवतींची कमी नाही. गरज आहे त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची. त्याकडे शासन गांभीर्याने लक्ष देत असून क्रीडा विभागाने राज्यातील सर्व क्रीडा संकुलांचा आढावा घेऊन त्यांच्या सर्वंकष विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा आणि निधीची माहिती देणारा अहवाल सादर करावा, अशा सूचना वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या

श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, असा अहवाल प्राप्त झाल्यानंतर साधारणत: तीन ते चार वर्षात आपण ही सर्व क्रीडा संकुले टप्प्याटप्प्याने अद्ययावत करू.  सर्वांसाठी खेळाद्वारे सुदृढता आणणे, आरोग्यसंपन्न जीवनाला चालना देणे अत्यंत गरजेचे आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी जास्तीत जास्त पदके प्राप्त करावीत, यासाठी आठ खेळांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याकरिता विशेष धोरण राबविण्याचा शासनाचा मानस आहे. यासाठी ३०० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असून १५० कोटी रुपये चालू वर्षात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात करोडी येथे राज्यस्तरीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करणे, वाळुज, ता. गंगापूर जि. औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण तयार करण्याचाही शासनाचा मानस आहे.  त्यादृष्टीने विभागाने पावले उचलावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.

क्रीडा संकुलाचे काम देताना वर्क ऑर्डरमध्येच त्या कामाच्या पूर्ततेचा दिनांक टाकला जावा, दिलेल्या मर्यादेत काम पूर्ण होत आहे की नाही याकडे लक्ष दिले जावे असेही  ते म्हणाले.


यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी मिशन शौर्य आणि मिशन शक्तीचा आवर्जून उल्लेख केला. आदिवासी विद्यार्थ्यांनी जे कधी विमानात देखील बसले नव्हते त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर कठोर परिश्रमातून एव्हरेस्ट सर केला, भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने  तिथे फडकवला. असे अनेक गुणवत्ताधारक खेळाडू आपल्याकडे आहेत. विविध क्षेत्रातील या खेळांडूसाठी सोयी-सुविधा आणि प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्यास २०२४ च्या आलिंपिकमध्ये भारत नक्कीच चांगली कामगिरी करून दाखवू शकेल. त्या दृष्टीने विभागाने परिपूर्ण नियोजन करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा