गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करण्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. १७ : गोसेखुर्द प्रकल्पामुळे सुरबोडी आणि सौंदळ गावातील अंशत: बाधित प्रकल्पग्रस्तांचे तसेच मौजे तिड्डी गावठाणातील नऊ कुटुंबाचे ऐच्छिक पुनर्वसन करण्यात यावे. त्याचबरोबर धारगाव उपसा सिंचन योजनेतील भंडारा टप्पा एक ही योजना पुढील एक महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिले.

मंत्रालयात आज भंडारा जिल्ह्याच्या गोसेखुर्द प्रकल्पामुळे अंशत: बाधितांचे पुनर्वसन, ऐच्छिक पुनर्वसन व भूसंपादन यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ.फुके म्हणाले, गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत विशेष बाब म्हणून मौजे तिड्डी या गावठाणच्या कुटुंबियांचे ऐच्छिक पुनर्वसनाअंतर्गत पुनर्वसन करण्यात यावे. धारगाव उपसा सिचन भंडारा टप्पा एक ही योजना गोसेखुर्द प्रकल्पामध्ये अंतर्भूत केल्यास नजीकच्या गावांना त्याचा फायदा होणार आहे. टप्पा एक अंतर्गत ३ हजार २०० हेक्टर वरील एकूण ६९ गावांना त्याचा फायदा होणार आहे. यामुळे टप्पा एक तातडीने पूर्ण करण्यात यावा असे निर्देश राज्यमंत्री डॉ.फुके यांनी दिले. तसेच, बेळघाट आणि शेळीघाट संदर्भातील कामाची सुरवातही तातडीने करावी असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत आमदार रामचंद्र अवसरे, महसूल व वन विभागाचे अवर सचिव शहाजदान मुलानी, जलसंपदा विभागाचे उपसचिव म.ई. धरणे, गोसेखुर्द प्रकल्प पुनर्वसन विभाग पथक चे कार्यकारी अभियंता विजयश्री बुराडे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा