'हाफकिन' संग्रहालयाला पर्यटन नकाशावर स्थान - पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची घोषणा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


      
मुंबई, दि. 12 : देशातील पहिल्या जीव-वैद्यकीय संशोधन संस्थेच्या अर्थात हाफकिन संस्थेच्या संग्रहालयाला मुंबई तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर स्थान देण्यात येईल. या संस्थेला मेडिकल सायन्स टुरीजमक्षेत्रातील प्रमुख केंद्र बनविण्यात येईल. यासाठी एमटीडीसी आणि पर्यटन विभागामार्फत मान्यता देण्यात येईल, असे राज्याचे पर्यटन आणि अन्न व औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल यांनी येथे घोषित केले.


हाफकिन संशोधन, प्रशिक्षण व चाचणी संस्थेच्या संग्रहालयाला त्यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेच्या संचालक डॉ. निशिगंधा नाईक यावेळी उपस्थित होत्या.


श्री. रावल म्हणाले, हाफकिन संस्थेला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. देशात प्लेगची साथ आली तेव्हा त्यावर लस तयार करुन या संस्थेने फार मोठे कार्य केले होते. येथील हाफकिन यांची वास्तू, संग्रहालय, जुने राजभवन, दरबार हॉल आदी ठिकाणे पर्यटक, विद्यार्थी, अभ्यासक आदींसाठी आकर्षणाची केंद्रे आहेत. त्यामुळे या सर्व स्थळांना पर्यटन नकाशावर आणून त्याच्या विकासासाठी चालना दिली जाईल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.


हाफकिन संस्थेच्या संग्रहालयाला भेट दिल्यानंतर जगाच्या उद्धारासाठी काम करणाऱ्या या ऐतिहासिक संशोधन केंद्राचे काम बघून थक्क झालो आहे, अशी भावना व्यक्त करुन श्री. रावल यांनी विज्ञानातील ऐतिहासिक व आधुनिक घडामोडींचा सुरेख मेळ संग्रहालयात पाहायला मिळाल्याचे सांगितले. अशा ऐतिहासिक संशोधन संस्थेला सर्वांनीच सहाय्य दिले पाहिजे, असा अभिप्रायही श्री. रावल यांनी संग्रहालयाच्या अभ्यागत पुस्तकात लिहिला.


हाफकिन संस्थेच्या संग्रहालयाला राष्ट्रीय संग्रहालयाचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी अलीकडेच संस्थेने शासनाच्या योजनेंतर्गत टाटा ट्रस्टबरोबर समन्वय करार केला आहे. आता श्री. रावल यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे हाफकिन संग्रहालयाला पर्यटन नकाशात स्थान मिळावे यासाठी संस्था लवकरच औपचारिक विनंती प्रस्ताव देईल, असे संचालक डॉ. निशिगंधा नाईक यांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा