लोकशाही मूल्ये रुजविण्यात ‘एएम न्यूज’ महत्त्वाची भूमिका निभावेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतएएम न्यूजचॅनलचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ 

मुंबई, दि. 3 : सकारात्मकता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. समाजात जीवनविषयक आशा दृढ करण्यासाठी सकारात्मकता आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांनी त्या दिशेने नेहमी प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळेच नव्याने सुरु झालेल्या 'एएम न्यूज'ने सकारात्मकता रुजविण्याचे ठरविलेले उद्दिष्ट महत्त्वाचे आहे. देशात लोकशाही रुजविण्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची राहिली असून एएम न्यूजही या दिशेने महत्त्वाचे योगदान देईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.


हॉटेल ताज येथे आज या वृत्तवाहिनीचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पदुममंत्री महादेव जानकर, विभानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नवाब मलिक, वृत्तवाहिनीचे संचालक काशिनाथ दरग, संतोष लढ्ढा, परमजितसिंग संधू, प्रविण भूतडा, राजेश शर्मा, संपादक रघुनाथ पांडे, वृत्तसंपादक पंकज दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.    

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, समाजातील जे साधारण लोक असाधारण काम करतात त्यांना एएम न्यूजने समाजासमोर आणावे. यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. माध्यमांसमोर आज खूप आव्हाने आहेत. पण तरीही एएम न्यूजने सॅटेलाइट चॅनल, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि राज्याच्या विविध भागात सुमारे ४०० वार्ताहरांची नेमणूक करुन एक दमदार पाऊल टाकले आहे. या चॅनलच्या माध्यमातून समाज विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री श्री. सुभाष देसाई म्हणाले की, दक्षिण भारतात प्रादेशिक वाहिन्यांचे प्रमाण अधिक आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रातही मराठी वाहिन्यांचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. विविध भाषिक लोकांनी एकत्र येऊन सुरु केलेले एएम न्यूज चॅनल हे वैशिष्ट्यपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा