मुंबादेवी आणि परिसराच्या विकासासाठी आवश्यक निधी देणार - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



वित्तमंत्र्यांची मुंबादेवी येथील दागिना बाजाराला भेट; मुंबादेवी उद्यानाचे उद्घाटन

मुंबई, दि. 10 : मुंबादेवी आणि परिसराचा विकास करण्यासाठी शासनाच्या वास्तु विशारदामार्फत विकास आराखडा तयार करून त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.


श्री. मुनगंटीवार यांनी काल मुंबादेवीचे दर्शन घेऊन तेथील दागिना बाजारला भेट दिली. तेथील उद्योजक-व्यापारी यांच्याशी चर्चा केली तसेच मुंबादेवी उद्यानाचेही त्यांनी उद्घाटन केले. यावेळी आमदार राज पुरोहित आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक विकासाचे इंजिन असून त्यातही मुंबईचे योगदान सर्वाधिक आहे असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पपूर्तीमध्ये महाराष्ट्र भरीव योगदान देणार असून यातील २० टक्क्यांचा हिस्सा उचलणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राचा विकास दर वाढणेही अगत्याचे आहे. राज्याच्या क्षमता लक्षात घेता ही साध्य होणारी बाब आहे असेही ते म्हणाले.


राज्याच्या विकासात कररूपी योगदान देणारे व्यापारी-उद्योजक हे अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहेत. ते आपल्या उद्योग-व्यवसायाच्या भरभराटीतून मोठ्या प्रमाणात शासनाकडे कर भरतात, देशाला मजबूत करतात. त्यातूनच राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, वंचितांच्या विकासासाठी शासन योजना आखतं, असेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


मुंबादेवी येथील चौकाचे सौंदर्यीकरण करण्याचा आराखडा व्यापारी वर्गाने यावेळी सादर केला. त्यावर केवळ चौकाचाच नाही तर मुंबादेवी मंदिरासह परिसराचा विकास करण्यासाठी, लोकांच्या आवश्यक त्या सोयी-सुविधा येथे उपलब्ध करून देण्यासाठी चांगला, सर्वंकष आराखडा बनवला जाईल आणि त्यासाठी आवश्यक तो सर्व निधी  उपलब्ध करून दिला जाईल. जीएसटीच्या अंमलबजावणीत राज्यातील सर्व उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी खूप चांगले सहकार्य केल्याचेही श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले.


श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी पालिकेच्या मुंबादेवी उद्यानाचे उद्घाटन करुन येथे वृक्षारोपणही केले.

मुनगंटीवार आव्हान स्वीकारणारे मंत्री- राज पुरोहित

जागतिक स्तरावर पर्यावरणीय बदलांचे आव्हान उभे राहिले असताना ५० कोटी वृक्ष लागवडीतून त्यावर मात करण्याचा प्रयत्न वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. ते आव्हान स्वीकारणारे मंत्री आहेत, असे आमदार राज पुरोहित यांनी सांगितले.


मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून आपला मतदारसंघ या राजधानीला सक्षम बनवण्यामध्ये सर्वाधिक योगदान देतो. साधारणत: दीड कोटी लोक या भागात नोकरी-उद्योग-व्यवसायासाठी येतात. इथला व्यापारी वर्ग प्रामाणिक आणि कष्टाळू आहे. सर्वात विश्वासार्ह बाजार म्हणून या दागिना बाजारची ओळख आहे असेही ते म्हणाले.


राज्यात वस्तू आणि सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी करताना व्यापारी वर्गाला विश्वासात घेऊन ती केल्याबद्दल मुंबादेवी दागिना बाजार असोसिएशनच्या वतीने श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा