विदर्भातील दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देणार - डॉ.सुरेश खाडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 3 : विदर्भातील मूकबधीर, अंध, मतिमंद व अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देत असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिली.


विदर्भातील मूकबधीर, अंध, मतिमंद व अस्थिव्यंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतची आढावा बैठक आज मंत्रालयात झाली, त्यावेळी डॉ.खाडे बोलत होते.


डॉ. खाडे म्हणाले, राज्यात स्वयंसेवी संस्थांमार्फत अपंगांच्या 740 अनुदानित विशेष शाळा व 97 अनुदानित विशेष कार्यशाळा कार्यरत आहेत. विदर्भातील नागपूर व अमरावती विभागातील एकूण 11 जिल्ह्यात मूकबधीर-68, अंध-16, अस्थिव्यंग-45 व मतिमंद-66 अशा एकूण 195 अनुदानित विशेष शाळा कार्यरत आहेत. यापैकी मतिमंद प्रवर्गाच्या 66 शाळा वगळता मूकबधीर, अंध व अस्थिव्यंग प्रवर्गाच्या शाळांमधून शालेय शिक्षण विभागाचा अभ्यासक्रम इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत राबविण्यात येते.


अपंगांच्या विशेष शाळांमध्ये इयत्ता 10 वी पर्यंत विशेष विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याकरिता अनुदानित अंध-4, मूकबधीर-9 व अस्थिव्यंग-1 अशी एकूण 14 माध्यमिक विद्यालये विदर्भात कार्यरत आहेत. विदर्भातील अमरावती येथे बुलीदान राठी मूकबधीर विद्यालय, साईनगर अमरावती व नागपूर येथे मूकबधीर विद्यालय, शंकरनगर, नागपूर या 2 शाळांमध्ये कर्णबधीर विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. या दोन्ही शाळांना सामाजिक न्याय विभाग व शिक्षण विभागाने मान्यता दिलेली आहे. विदर्भात मूकबधीर विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंत एकूण 55 शाळांमधून शिक्षण दिले जाते.


मूकबधीर, अंध व अस्थिव्यंग प्रवर्गातील सक्षम विद्यार्थी शिक्षण विभागांतर्गत असलेल्या सामान्य शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेत असून या शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत विशेष शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे. तसेच शासनाच्या सर्व विभागांनी मागील दोन वर्षात दिव्यांगांसाठी असलेला राखीव 5 टक्के निधी खर्च केलेला असल्याचा आढावा तत्काळ सादर करण्याचे निर्देश डॉ.खाडे यांनी यावेळी दिले.

यावेळी आमदार बच्चू कडू, सुधाकर देखमुख, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा