महाराष्ट्र दिनापर्यंत पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याची पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची ग्वाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 3 : येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत कोल्हापूर-इचलकरंजी भागातील पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करावी यासाठी सर्व संबंधित विभागांना पर्यावरण विभागाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज येथे सांगितले. मंत्रालयात यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

पंचगंगा नदीमध्ये एकही प्रदूषित पाण्याचा थेंब जाणार नाही हे महत्त्वाचे असून यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे श्री. कदम यांनी सांगितले. सर्वच प्रकारची प्लास्टिक बंदी आहे. तिचे कोटकोरपणे पालन होणे महत्त्वाचे असून कोल्हापूर शहराच्या जनतेला याची माहिती व्हावी, याकरिता होर्डिंगद्वारे जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरण्याबाबतही त्यांनी आवाहन केले.

मनपा आयुक्त मलिन्नाथ कलशेट्टी यांनी यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असणाऱ्या उपाययोजनांची व स्वच्छता मोहिमेची माहिती दिली. मागील दहा रविवारी करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत 500 टन कचरा जमा झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, सदस्य सचिव ई.रविंद्रन, कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सहसचिव वाय.बी.सोनटक्के, श्री.अफरोज व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.उल्हास नदीचा प्रश्न सुटणार
विधिमंडळात दिलेल्या आश्वासनानूसार उल्हासनगर येथील उल्हास नदीच्या प्रश्नाबाबत आमदार ज्योती कलानी यांच्या समवेत बैठक संपन्न झाली. या बैठकीस महापौर पंचम ओमी कलानी, ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे व प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जलपर्णी प्रश्न तसेच औद्योगिक वसाहतीतून  नदीत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. आठ दिवसांत तातडीने प्रस्ताव देऊन ही कामे मार्गी लावण्याचे निर्देशही श्री. कदम यांनी दिले. तसेच वालधुनी नदीबाबतही वेगळी बैठक घ्यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा