दोन दिवसीय एलिफंटा महोत्सवाचा शुभारंभ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
एलिफंटाला जागतिक पर्यटन नकाशावर झळाळी मिळवून देणार
                                    - पर्यटनमंत्री जयकुमार रावलमुंबई, दि. 1: जागतिक वारसा स्थळ एलिफंटाला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर अधिकची झळाळी मिळावी यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. एलिफंटा महोत्सव हा त्याचाच एक भाग असून पर्यटकांनी त्याला भरभरुन प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज केले.


राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय एलिफंटा महोत्सवाचे उद्घाटन 'गेट वे ऑफ इंडिया' येथे आज झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव श्रीमती विनिता वेद सिंगल, जपानचे महा वाणिज्यदूत मिचीऊ हाराडा सान, युनियन बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष केवल हांडा, व्यवस्थापकीय संचालक राजकिरण राय, पर्यटन संचालक दिलीप गावडे आदी उपस्थित होते.
         

राज्यात पर्यटन विकासासाठी गत चार वर्षात मोठ्या प्रमाणात उपक्रम राबविण्यात येत आहेत, असे सांगून श्री. रावल म्हणाले की, 70 वर्षात पहिल्यांदाच घारापुरी बेटावर या शासनाने वीज पोहोचविली. त्यामुळे एलिफंटा लेण्या आणि घारापुरी बेटाची वाटचाल अंधाराकडून प्रकाशाकडे झाली आहे. घारापुरी बेटाचा विकास तेथील स्थानिक कोळी, मच्छीमार आणि मूळच्या रहिवाशांच्या संस्कृती आणि परंपरांचे जतन करुन करण्यात येईल.
          

घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध सारंगखेडा येथे महोत्सव, नागपूरला संत्रा महोत्सव, कोकण महोत्सव, वेरुळ महोत्सव आदींच्या आयोजनातून राज्यातील पर्यटनस्थळांकडे परदेशी पर्यटकांना आकर्षून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर पर्यटकांसाठी  आकर्षणाचे ठिकाण आहे. येथील हिंदी चित्रपटसृष्टी अर्थात बॉलिवूड पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. या आकर्षणाचा उपयोग राज्यातील अन्य ठिकाणांच्या पर्यटनविकासासाठीही करण्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

कैलाश खेर यांच्या स्वरधारा बरसल्या
                 उद्घाटन कार्यक्रमानंतर सुप्रसिद्ध गायक कैला खेर यांच्या गायनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. शिवाची आणि पावसाची आराधना,  मै तो तेरे प्यार मे दिवाना हो गया..’, ‘आओ जी..आदी त्यांच्या एकाहून एक सरस गाण्यांनी कार्यक्रमात  बहार आणली.

         

कार्यक्रमास महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, माजी आमदार अतुल शहा, मंत्री श्री. रावल यांच्या आई आणि दोंडाईचा’च्या नगराध्यक्षा नयनकुंवर रावल, पत्नी सुभद्रा रावल, घारापुरी गावचे सरपंच बळीराम ठाकूर आदी उपस्थित होते.
000
सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.1.6.2019    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा