मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचा कार्यभार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. ७ : राज्याचे पर्यटन आणि रोहयोमंत्री श्री. जयकुमार रावल यांच्याकडे आज अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि अन्न व औषध प्रशासन ही महत्त्वपूर्ण खाती सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या खात्यांचे मंत्री गिरीश बापट हे आता खासदारपदी निवडून आल्याने त्यांचे पद रिक्त झाले आहे. त्यांच्या उपरोक्त विविध खात्यांचा कार्यभार आज मंत्री श्री. रावल यांच्याकडे तर संसदीय कार्य विभागाचा कार्यभार शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 

मंत्री श्री. रावल यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात पर्यटन आणि रोहयो विभागात केलेल्या चांगल्या कामगिरीची दखल घेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांच्याकडे या महत्त्वपूर्ण खात्यांचा कार्यभार सोपविला आहे

मंत्री श्री. रावल हे उच्चशिक्षित असून लंडन येथून त्यांनी बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. मंत्रीपदाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी रोहयो आणि पर्यटन अशा पूर्णतः भिन्न असलेल्या खात्यांमध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या निकटवर्ती वर्तुळातील अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात.

त्यांच्या कार्याची दखल घेत मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी रिक्त झालेली अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि अन्न व औषध प्रशासन ही खाती त्यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय  घेतला आहे.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांची आवडती योजना असलेल्या 'मागेल त्याला शेततळे' योजनेचे काम मंत्री श्री. रावल यांनी मागील तीन वर्षात अभूतपूर्व असे केले आहे. केंद्र शासनानेही या योजनेचे कौतुक केले आहे. राज्यात 'मागेल त्याला शेततळे' तसेच सिंचन विहिर योजनेतून सुमारे 7 लाख हेक्टर शेतजमीन शाश्वत सिंचनाखाली आली आहे. केंद्राची मनरेगा योजनाही राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मनरेगांतर्गत राज्यात "समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना" सुरु करण्यात आली असून मंत्री श्री. रावल हे या योजनेचे जनक ठरले आहेत. शाळा कंपाउंड बांधकामसारखी विविध 28 प्रकारची नवीन कामे आता मनरेगा योजनेतून करता येत आहेत. मनरेगांतर्गत 11 कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागात शाश्वत रोजगार आणि मत्ता निर्मिती करण्यात येत आहे. राज्यात सध्या असलेल्या दुष्काळी परिस्थितीत मनरेगा योजनेने ग्रामीण भागाला मोठा दिलासा दिला आहे. मंत्री श्री. रावल यांच्या कल्पक धोरणांमुळे आता रोहयो मजुरांची मजुरीही वेळेत मिळत असून त्याचे प्रमाण 95 टक्क्यांच्या पुढे गेले आहे.

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठीही मागील तीन वर्षात विविध कल्पक उपक्रम राबविण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव, मुंबई शॉपिंग मेला फेस्टिव्हल, सारंगखेडा चेतक महोत्सव, एलिफंटा महोत्सव यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. राज्यातील पर्यटन वृद्धीसाठी एअर बीएनबी, इतिहाद, जेट एअरवेज, ओला आदी देश- विदेशातील कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले आहेत. रायगड किल्ला व परिसर विकास आराखडा, राजमाता जिजाऊ मातृतीर्थ सिंदखेडराजा पर्यटन विकास आराखडा, लोणार सरोवर पर्यटन विकास आराखडा, घारापुरी पर्यटन विकास आराखडा, वेरूळ, घृष्णेश्वर, खुलताबाद, म्हैसमाळ पर्यटन विकास आराखडा यांचीही राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून या पर्यटनस्थळांना जागतिक स्तरावर लौकीक मिळवून देण्यात येत आहे. सर्वाधिक परदेशी पर्यटक आपल्याकडे आकर्षित करण्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर राहीले आहे. या सर्व कामगिरीची दखल घेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विविध खात्यांचा कार्यभार श्री. रावल यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन प्राप्त झालेली जबाबदारी तितक्याच निष्ठेने पार पाडत जनतेला चांगली सेवा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, अशी प्रतिक्रिया  श्री. रावल यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आभार मानत त्यांनी दाखविलेला विश्वास निश्चित सार्थ ठरवू, असेही त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा