सांस्कृतिक वारशाच्या जतन आणि संवर्धनासाठी 'अडॉप्ट अ हेरीटेज' उपक्रमात सहभागी होण्याचे केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 7: देशातील नागरिकांना आपल्या संस्कृतीचे महत्त्व आणि अभिमान असून सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी 'अडॉप्ट अ हेरीटेज' या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. राजेश कुमार चतुर्वेदी यांनी केले.

भारत पर्यटन, मुंबई कार्यालयाच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथे अपनी धरोहर, अपनी पेहचानया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पर्यटन मंत्रालयाच्या संचालक अशिमा मेहरोत्रा, भारत पर्यटन, मुंबई पश्चिम क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय संचालक नीला लाड, सहायक संचालक श्रीमती भावना शिंदे, शोभा कुमार, मालती दत्ता, पर्यटन विभागाचे अधिकारी तसेच संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मला मुंबईकरांचे स्पिरिट खूप आवडते असे सांगून, डॉ. चतुर्वेदी यावेळी म्हणाले की, मुंबई हे शहर नागरिकांनी आपल्या घामातून वसवले आहे. त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप मिळण्यात नागरिकांच्या कष्टाचा मोठा वाटा आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय संपूर्ण नागरिकांच्या सहभागातून चालते. अशाच प्रकारच्या सहभागातून इतरही वारसास्थळे पर्यटकस्नेही व्हावीत असा शासनाचा प्रयत्न आहे.

श्रीमती मेहरोत्रा म्हणाल्या की, जागतिक वारसा स्थळे, पुरातत्व स्थळ तसेच 'भारतीय पुरातत्व सर्वेक्षण' (एएसआय) विभागाच्या अधिनस्त वास्तुशिल्पे येथील पर्यटन वृद्धीसाठी शासनाकडून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. वारसास्थळांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी सुविधांचे निर्माण व्हावे म्हणून खासगी कंपन्या, सार्वजनिक उपक्रम किंवा नागरिकांचा व्यक्तिगत सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने हाती घेतलेल्या 'अडॉप्ट अ हेरीटेज' उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा.

देशात 106 वास्तुशिल्पांच्या ठिकाणी पर्यटन सुविधा निर्माण करण्यासाठी 37 संस्था, व्यक्तींबरोबर 'स्वारस्य पत्र' स्वाक्षरीत करण्यात आले आहे. अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

या कार्यक्रमात राजीव महावीर यांच्या वाद्यवृंदाच्या भारतीय तालवाद्य वादनाने आणि शुभदा वराडकर यांच्या पथकाच्या अभिजात नृत्याच्या कार्यक्रमाने संगीत, नृत्यप्रेमींना मंत्रमुग्ध केले.

राजीव महावीर यांच्या वाद्यवृंदामध्ये श्रीधर पार्थसारथी, आनंद पांचाळ, समीर महावीर, निषेध वैद्य, नरेंद्रकृष्ण गंगानी, यश महावीर, मल्हार महावीर, संजीव गंगानी यांचा समावेश होता. त्यांनी आपल्या वादनात तबला, ढोलकी, पखवाज, मृदंग, ड्रम या वाद्यांचा सुरेख संगम केला. देशातील विविध राज्यातील वादन वैशिष्ट्ये यावेळी अनुभवायला मिळाली.

शुभदा वराडकर यांनी आपल्या नृत्यवृंदाच्या माध्यमातून भरतनाट्यम, ओडिसी, कथक, मणिपुरी, कथकली या अभिजात नृत्याचा 'नृत्यरंग' हा नेत्रविभोर कार्यक्रम सादर केला.

देशातील वारसास्थळांच्या गतवर्षीच्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त तयार करण्यात आलेली चित्रफित यावेळी दाखविण्यात आली.

000
सचिन गाढवे/वि.सं.अ./दि. 7.6.2016

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा