विधानसभा प्रश्नोत्तरे :

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


जि.प.अंतर्गत रस्ते सुधारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे प्रस्ताव पाठविणार- ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि. २७ : जिल्हा परिषदेच्या मालकीचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांना सुधारित करण्यासाठीचा ठराव प्राप्त झाल्यास त्याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्यास प्रस्ताव पाठविण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत दिली.

देवगड तालुक्यातील देवगड-गढीताम्हाणे रस्त्याच्या समस्येसंदर्भात सदस्य नितेश राणे यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यास उत्तर देताना श्रीमती मुंडे बोलत होत्या.

श्रीमती मुंडे म्हणाल्या, जिल्हा परिषद अखत्यारित जे रस्ते आहेत त्यांच्या अपग्रेडेशचा प्रस्ताव दिल्यास शासन सकारात्मक निर्णय घेईल. देवगड येथील जिल्हा मार्ग क्र. १५ ची प्रत्यक्ष लांबी २६ कि.मी. आहे. सदर रस्ता नगरपंचायत देवगड जामसंडे यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आला असून त्यातला काही भाग हा खाजगी शेतकऱ्यांचा असल्याने त्यांनी तो दिल्यास नगरविकास विभागाकडून हस्तांतरीत करण्यात येईल आणि नगरपंचायतीस हस्तांतरीत करण्यात येईल, अशी माहिती श्रीमती मुंडे यांनी दिली.

यावेळी सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, बच्चू कडू यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

०००


कुपोषणाने एकही मृत्यू नाही; पालघर जिल्ह्यात बालमृत्यूदरात घटमहिला व बालकल्याण मंत्री


अब्दुल कलाम आहार योजनेअंतर्गत गर्भदा व स्तनदा मातांना उच्च प्रतीचा पोषण आहार मिळावा यासाठी बालआरोग्य केंद्रे सुरू करण्यात आले आहेत. आरोग्य विभाग व महिला व बाल विकास विभागाने संयुक्त‍िकरित्या काम करून बालमृत्यूदरात घट आणली आहे. पालघर जिल्ह्यात विविध आजारांनी बालकांचे मृत्यू झाले असले तरी कुपोषणाने एकाही बालकाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली.

पालघर जिल्ह्यातील महिलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराबाबत सदस्य अबू आझमी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना श्रीमती मुंडे बोलत होत्या.

श्रीमती मुंडे म्हणाल्या, पोषण आहारासाठी राज्यात स्वतंत्र निधी असून बालमृत्यूचे प्रमाण कमी असण्यामध्ये शासन पहिल्या क्रमांकावर आहे. कुपोषण पूर्णत: संपविण्यासाठी शासन विशेष मोहीम राबविणार आहे. पालघर जिल्ह्यात मुदतपूर्व प्रसूती झाल्याने १५ बालके दगावली तर विविध आजारांमुळे बालके दगावल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र कुपोषणाने बालमृत्यू झाले नाहीत.

केंद्र शासनाकडे अतिरिक्त धान्याची मागणी करण्यात आली असून, एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीसाठी आवश्यक तेवढे नियतन प्राप्त झाले असल्याची माहितीही श्रीमती मुंडे यांनी दिली.

या चर्चेत सदस्य सर्वश्री दिलीप वळसे-पाटील, अमिन पटेल, राजेंद्र पाटणी, वैभव पिचड यांनी सहभाग घेतला.

०००

मंगळवेढा तालुक्यातील पाच गावांचे उपसा सिंचन
योजनेसाठी सर्वेक्षण करणार- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील सात गावांपैकी सलगरे बुद्रुक आणि सलगरे खुर्द ही दोन गावे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समाविष्ठ करण्यात आली आहेत. उर्वरित पाच गावांचा समावेश करण्यासंदर्भात पुढील तीन महिन्यात सर्वेक्षण करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

विधानसभेत मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसंदर्भात सदस्य भारत भालके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना श्री. महाजन बोलत होते.

श्री. महाजन म्हणाले, मंगळवेढा येथील लवंगी, आसबेवाडी, शिवनगी, सोड्डी आणि येळगी या पाच गावांचे अडीज हजारांचे क्षेत्रफळ असल्याने पुढील तीन महिन्यात त्याचे सर्वेक्षण करून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समाविष्ट करण्याबाबत कारवाई करण्यात येईल. तसेच कालवा सल्लागार समितीच्या सल्ल्यानुसार जेथे जेथे दुष्काळजन्य परिस्थिती होती आणि पाण्याची गरज होती तेथे नियोजनात नसतानाही पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती श्री. महाजन यांनी दिली.

यावेळी सदस्य सर्वश्री जयकुमार गोरे, भीमराव धोंडे, गणपतराव देशमुख आदींनी सहभाग घेतला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा