विधानसभा लक्षवेधी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


जळगाव आरोग्य विभागातील गैरप्रकाराबाबत मंत्रालयस्तरावर चौकशी करणार - आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. 26 : जळगाव येथे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान तसेच अन्य वैद्यकीय देयकांच्या प्रतिपपूर्तीबाबात तसेच साहित्य खरेदीसंदर्भात झालेल्या गैरप्रकाराबाबत मंत्रालयस्तरावरून या प्रकरणाची चौकशी करण्यात येवून संबंधितावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

विधानसभेत जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याविरोधात साहित्य खरेदीबाबत गैरप्रकार झाला असल्यासंदर्भातील लक्षवेधी सदस्य एकनाथ खडसे यांनी मांडली होती. त्यास उत्तर देताना श्री. शिंदे म्हणाले.

श्री. शिंदे म्हणाले, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरेाग्य अभियान तसेच अन्य वैद्यकीय देयकांच्या प्रतिपूर्तीसाठी लोकांची अडवणूक करण्यात येत असल्याची तसेच कार्यालयात साहित्य खरेदी, औषध खरेदी व अन्य खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गैरप्रकाराबाबत तातडीने जिल्हा परिषद अध्यक्षांनी दखल घेऊन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या चौकशीचे निर्देश दिले. संबंधित अधिकाऱ्यांची मंत्रालयस्तरावर चौकशीचे निर्देश देऊन तातडीने बदली करण्यात येईल, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

०००

म्हाडाच्या जागेवर वसाहतींच्या विकासासंदर्भात अनियमितता केलेल्यांवर कारवाई करणार - गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
म्हाडाच्या जागेवर वसाहतीचा विकास करण्यासंदर्भात अंधेरी येथील डी.एन.नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आठ इमारतीमधील 480 सदनिकांसंदर्भात्‍ अनियमितता झाली आहे. या संबंधित रूस्तमजी रियॅलटी प्रा. लिमिटेड या विकासकावर तसेच संबंधित म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

विधानसभेत अंधेरी येथील म्हाडाच्या जमिनीवर गृहसंस्थांचा विकास करण्यासंदर्भात अनियमितता झाल्याबाबतची लक्षवेधी सदस्य मो. अरिफ नसीम खान यांनी मांडली होती. त्यास उत्तर देताना श्री.विखे पाटील बोलत होते.

श्री. विखे-पाटील म्हणाले, डी.एन.नगर सहकारी गृहनिर्माण संस्था आणि वैदही आकाश हाऊसिंग प्रा. लि. यांच्यात 2005 साली विकास करार करण्यात आला. सदर विकासकाने करारानाम्यातील अटींचे उल्लंघन केल्याने सदर विकासाचे काम रूस्तमजी रिअेल्टर्स प्रा.लि. यांना देण्यात आले. मात्र, यातही अनियमितता झाल्याने, या बांधकामास स्थगिती देण्यात येणार असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, 480 सदनिकांच्या रहिवाशांसोबत अन्याय होऊ देणार नाही तसेच शासन या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना संरक्षण देणार नाही. त्याचबरोबर जे म्हाडा अधिकारी दोषी असतील त्यांना निलंबित करण्यात येईल. रूस्तम बिलर्डच्या संचालकांवरही चौकशीअंती कारवाईचे निर्देश देण्यात येतील, असेही श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.

यावेळी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, सदस्य सर्वश्री जयंत पाटील, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा