दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी दिव्यांग विकास प्रतिष्ठानची स्थापना - राजकुमार बडोले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 13 : दिव्यांग व्यक्तींकरिता सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, शारीरिक पुनर्वसन, प्रशिक्षण, संशोधन आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास प्रतिष्ठान स्थापन करणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी केली.

यावेळी श्री. बडोले म्हणाले, दिव्यांग विकास प्रतिष्ठानमार्फत दिव्यांग हक्क अधिनियम सन 2016 व दिव्यांग सक्षमीकरण धोरण सन 2018 मधील तरतुदींचा लाभ दिव्यांग व्यक्तींस मिळवून देणे. दिव्यांग व्यक्तींसंबंधी विविध जनजागृती कार्यक्रम राबविणे. दिव्यांग क्षेत्रासंबंधित संशोधन करणे. दिव्यांग व्यक्तींमधील कौशल्यांचा विकास करण्याकरिता विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करणे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे. दिव्यांगासंबंधित विविध साहित्याचे प्रकाशन करणे.


दिव्यांग व्यक्ती व संबंधित संस्थेमधील कर्मचाऱ्यांकरिता विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे. दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वस्तूंचे विक्री केंद्र, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, व्यवसाय मार्गदर्शन केंद्र व व्यवसाय पुनर्वसन केंद्र सुरु करणे. दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना व संबंधित संस्थांना पुरस्कार देणे. दिव्यांग खेळाडूंसाठी दिव्यांग क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करणे. दिव्यांग साहित्य, कला व उद्योजकता संमेलनाचे आयोजन करणे.


दिव्यांगांकरिता विवाह मंडळ कार्यान्वित करुन सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणे. विशेष शाळा/प्रशिक्षण केंद्र/बालगृह/शीघ्र हस्तक्षेप केंद्र व इतर दिव्यांगांच्या उपक्रमाबाबत शासन आदेशानुसार कामकाज करणे. दिव्यांग व्यक्तींकरिता विविध मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणे. दिव्यांग व्यक्तींकरिता कायदेशीर सल्ला, समुपदेशन व मार्गदर्शन केंद्र सुरु करणे. दिव्यांग व्यक्तींना उपयोगी असे साहित्यांचे प्रकाशन करणे, दिव्यांग व्यक्तींचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता विविध योजना व उपक्रम राबविणे.


दिव्यांग विकास प्रतिष्ठानचे कार्यालय महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, विभागीय कार्यालय, नागपूर हे राहणार असल्याचेही श्री. बडोले यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा