तंबाखूमुक्त शाळा अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे राजकुमार बडोले यांचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. ३० : तंबाखू आणि तंबाखूच्या धुरामध्ये निकोटीन सारखी सात हजारहून अधिक विषारी रसायने असतात. त्यामुळे व्यसनाधीन माणसाला कॅन्सरसारखे दुर्धर आजार होतात. व्यसनाधीन व्यक्तीच नाही, तर त्यांची कुटुंबेही तंबाखूच्या व्यसनाचा बळी ठरत आहेत. राज्य शासन आणि सलाम मुंबई फाउंडेशन संयुक्तरित्या सुदृढ महाराष्ट्र बनविण्याचे कार्य करीत आहे. मुंबईसह राज्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठीच्या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि देशाची भावी पिढी निरोगी राहील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी आज केले.


जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी राजकुमार बडोले बोलत होते. शहरात मोठ्या प्रमाणात वितरित होणारा पेन हुक्का प्रतीकात्मक शैक्षणिक पेनने नष्ट करून शाळेत फक्त शिक्षणासाठीचाच पेन राहील असा विश्वास श्री.बडोले यांनी व्यक्त केला. कार्यक्रमस्थळी जनजागृतीपर संदेश देणारे पोस्टर्स लावण्यात आले  तसेच फुफ्फुसाची तपासणी करण्यात आली.


श्री.बडोले म्हणाले, सलाम मुंबई फाउंडेशन तंबाखू विरोधी दिनानिमित्त व्यसनमुक्तीसारखे अभियान राबवित आहेत. त्यांचे हे कार्य हे कौतुकास्पद आहे. शाळांच्या परिसरात मिळणारा पेन हुक्का बंद करण्याचे काम राज्य शासन करीत असून, भविष्यात संपूर्ण शाळा या तंबाखूमुक्त करण्यासाठीचे प्रयत्न शासनाने सुरु केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. फाउंडेशनच्या पुढील कार्यासाठी श्री. बडोले यांनी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा