अहमदनगर, सोलापूर, नाशिक जिल्ह्यात दुष्काळ निवारण उपाययोजना गतीने राबवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासनाला सूचना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. १० : राज्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर टँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना देण्यात आले आहेत. एखाद्या गावाकडून टँकरची मागणी आल्यास आवश्यकतेनुसार प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्यात यावी. तसेच संबंधित गावाला दोन दिवसांत टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज 'ऑडीओ ब्रीज सिस्टम'द्वारे अहमदनगर, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यातील सुमारे सव्वाशे सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. तसेच गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. या संवादात तिन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आदींचाही सहभाग होता.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घ्यावा. प्रशासन आणि लोकांच्या एकत्रित सहभागातून या परिस्थितीवर निश्चित मात केली जाईल. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

शेतकऱ्यांच्या अनुदानातून बॅंकांनी कर्जाचे हप्ते वळते करू नयेत
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेतून कर्जाचे हप्ते वळते करू नयेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांना सक्त सूचना द्याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

रोहयोच्या कामांना तीन दिवसात मंजूरी द्या
दुष्काळी जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत जास्तीत कामे सुरु करा, तीन दिवसात या कामांना मंजूरी द्या, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारच्या माध्यमातून तलावांमधील गाळ काढण्यास तहसीलदारांनी तत्काळ मान्यता द्यावी. चारा छावण्यांच्या अडचणी प्रशासनाने दूर कराव्यात, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी रोहयोअंतर्गत कुशल कामांसाठी लवकरच निधी देण्यात येणार असल्याचे सांगितले. अधिग्रहित करण्यात आलेल्या विहिर मालकाला अधिकचा मोबदला देण्यात येत असल्याची  माहितीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस राज्याचे मुख्य सचिव यु.पी.एस मदान, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, जलसंधारण आणि रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती आणि जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा