विश्वस्ताच्या भावनेतूनच सरकारचे काम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतनवी मुंबई उत्सव 2019 चे उद्घाटन

नवी मुंबई, दि.31 - सरकार म्हणजे राज्याचे मालक नसून ते जनतेच्या वतीने राज्याचे विश्वस्त असते, हीच भावना कायम ठेवून आमचे सरकार काम करते , असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.श्री गोवर्धिनी सार्वजनिक सेवा संस्था नवी मुंबई आयोजित नवी मुंबई उत्सव 2019 चे उदघाटन श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी माजी राज्यपाल डॉ.डी वाय पाटील, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सिडको चे अध्यक्ष आ.प्रशांत ठाकूर, विधान परिषदेचे आ.रमेश पाटील, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, विजय चौगुले, आ.मंदा म्हात्रे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त रामस्वामीआदी मान्यवर उपस्थित होते.


कै गणपतशेट तांडेल मैदान, नेरुळ येथे हा शानदार कार्यकम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गोवर्धिनी संस्थेच्या वतीने 11 लाख रुपयांचा निधी दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश प्रदान करण्यात आला.


कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिमोट द्वारे महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.त्यानंतर आ. मंदा म्हात्रे यांच्या कार्य अहवालाचे फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई खाडी पुलावरून खाडीत पडलेल्या लोकांना वाचविणाऱ्या महेश अशोक सुतार यांचा तसेच सुप्रसिद्ध गायक संगीतकार शंकर महादेवन यांचा सत्कार करण्यात आला.


आपल्या मनोगतात श्री. फडणवीस म्हणाले की, कार्य अहवाल म्हणजे निवडून आल्यानंतर लोकांना केलेल्या कामांची दिलेली छापील माहिती, रामभाऊ म्हाळगी यांनी ही परंपरा सुरू केली. ज्या जनतेने आपणाला विश्वासाने निवडून दिले. त्यांच्यासाठी काय केलं याची माहिती त्यांना देणे हे आपले कर्तव्य आहे. आ.मंदाताई म्हात्रे यांनी हा अहवाल प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करून त्यांनी नवी मुंबई महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबई उत्सवाच्या निमित्ताने जनतेचे एकत्रीकरण होणे ही चांगली बाब आहे,असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शंकर महादेवन, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी,अभिषेक कांबळे, युक्ता पाटील, सई जोशी आदी कलाकारांनी आपली कला सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सुबोध भावे यांनी केले. 

केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप : प्रकाश जावडेकर, पियुष गोयल यांनी स्वीकारला पदभार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतनवी दिल्ली, दि. 31 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आले. यापैकी प्रकाश जावडेकर, पियुष गोयल या महाराष्ट्रातील मंत्र्यांसह अन्य मंत्र्यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.


राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात गुरुवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 57 सदस्यीय मंत्रिमंडळास  शपथ दिली.  यात महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री अशा एकूण 7 मंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळातील सदस्यांचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आले.  महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या कॅबिनेट मंत्र्यांपैकी नितीन गडकरी यांना भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास  मंत्रालयासोबतच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे.


पियुष गोयल यांना रेल्वे मंत्रालय आणि उद्योग व वाणिज्य मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रकाश जावडेकर यांना पर्यावरण, वने व हवामान बदल तसेच माहिती व प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.  अरविंद सावंत यांना अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.


महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या तीन राज्यमंत्र्यांचेही खातेवाटप झाले आहे. रावसाहेब दानवे यांना  ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी  पुरवठा मंत्रालयाचा  तसेच  रामदास आठवले यांना सामाजिक न्याय  व अधिकारिता मंत्रालयाचा व संजय धोत्रे यांना  मनुष्यबळ विकास मंत्रालय, दूरसंचार व  इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची जबाबदारी  सोपविण्यात आली आहे.    
      प्रकाश जावडेकर, पियुष गोयल यांनी स्वीकारला पदभार
प्रकाश जावडेकर यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला यावेळी श्री. जावडेकर म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य महत्त्वाचे असते. या खात्याचा मंत्री म्हणून प्रसार माध्यमाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याचा प्रयत्न करेन. तसेच आज  पियुष गोयल यांनी रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारला.

विद्यार्थ्यांना परिपूर्ण पोषक आहाराविषयी अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 31 : आरोग्यपूर्ण जीवनशैलीत आहार हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. संतुलित आहार आणि सुरक्षित आहाराची उपलब्धता याविषयी जागरुकता विद्यार्थ्यांमध्ये कमी झालेली आहे. त्यामुळे आरोग्यविषयक समस्यांमध्ये वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने शालेय मुलांसाठी पोषक, पौष्टिक, स्वच्छ आणि सुरक्षित अन्न कसे देता येईल या उद्देशाने विशेष कार्यक्रम तयार केला आहे. त्याप्रमाणे मार्गदर्शक सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.


उच्च न्यायालय, दिल्ली येथे रिट पिटीशन क्रमांक 8567/2010 मध्ये दिलेल्या मार्गदर्शनपर आदेशानुसार भारतातील सर्व शाळांमधील मुलांना परिपूर्ण आणि पोषक आहार तसेच अन्न सुरक्षितता, स्वच्छता याबाबत अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, दिल्ली यांनी Guidelines for Making Available Wholesome and Nutritious Food to School Children तयार केल्या आहेत. त्याबाबतची माहिती अन्न सुरक्षा आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शाळा व कॉलेज तसेच मुलांचे पालक यांना School & College Food Project पूर्णत्वास नेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


ज्या अन्न पदार्थांमध्ये मेद, मीठ व साखर जास्त प्रमाणात असते अशा अन्न पदार्थांना HFSS (High Fat, Sodium & Sugar) अन्न पदार्थ म्हणतात. जास्त साखर खाल्ल्याने स्थूलपणा, मधुमेह इ. आजार बळावतात. मुलामुलींचे वजन वाढणे (लठ्ठपणा) व अति मीठ सेवनाने हा आजार बळावतो. HFSS (High Fat, Sodium & Sugar) घटक पदार्थ असलेले अन्न पदार्थांचे बाजारात आकर्षक जाहिरातींद्वारे सहजपणे कमी किंमतीत पॅकिंगमध्ये उपलब्ध होत असल्याने मुलांमुलीमधील खाण्याच्या सवयी बदलत आहेत. त्यामुळे कर्बोदके/प्रथिने व इतर आवश्यक घटक पदार्थ जे नैसर्गिकरित्या (फळे/भाजीपाला) व घरी बनविलेले ताजे अन्न पदार्थ मुलामुलींना मिळत होते त्याचे प्रमाण कमी झालेले आहे.


अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे त्याची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय, निमशासकीय व खासगी शाळांमध्ये करण्यासाठी शासनाने दिनांक 3 मे 2019 रोजी मंजुरी दिलेली आहे.


अभ्यासाबरोबरच मुलांना परिपूर्ण आहार मिळणे आवश्यक असल्याने खालील संदेश दिला आहे.

बर्गर, पिझ्झा, चॉकलेट, आईसक्रीम, फ्राईज इ.
थोडक्यात खा
Stringently
खाद्यतेल, फॅट, मिट, फिश, अंडी इ.
साधारणपणे खा
Moderately
फळे भाज्या
जास्त प्रमाणात खा
Liberally
कडधान्ये, तृणधान्ये, दूध
नियमित पुरेशा प्रमाणात खा
Consume Adequately


असा संदेश दिला जाणार असून त्याप्रमाणे शाळांच्या उपाहारगृहामधून पुरविल्या जाणाऱ्या/विक्री केल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांमध्ये आवश्यक ते बदल करण्याचा व लहान मुलांमध्ये दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लठ्ठपणा (Obecity) कमी करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग सचिव डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम महाराष्ट्र राज्यात राबविला जात आहे.

विधानपरिषदेवर पृथ्वीराज देशमुख बिनविरोध

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 31 : शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागेवर पृथ्वीराज सयाजीराव देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबाबत महाराष्ट्र विधिमंडळाचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

मंत्रालयात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई दि. 31 : प्रजाहितदक्ष, सुधारणावादी, कुशल प्रशासक राज्यकर्त्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते मंत्रालयात पुष्पहार व फुले अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.


याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव संजय भोसले, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री महोदय यांचे खासगी सचिव डॉ. धनंजय सावळकर, महसूल विभागाचे उपसचिव सुभाष गावडे, सहसचिव संतोष गावडे, अंकुश शिंगाडे, दे. आ. गावडे, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव दा. सो. गावडे, वनविभागाचे अवर सचिव सुनील पांढरे, चं. द. तरंगे, जलसंपदा विभागाचे अवर सचिव विनायक लवटे, पाणीपुरवठा विभागाचे अवर सचिव अधिकराव बुधे आदींसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000
सचिन गाढवे/ वि.सं.अ./31.5.2019

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 31 : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


यावेळी पदुममंत्री महादेव जानकर, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव संजय भोसले, कक्ष अधिकारी ललित सदाफुले यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची शपथ महाराष्ट्रातून ४ कॅबिनेट व ३ राज्यमंत्री

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतनवी दिल्ली, दि. 30 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 58 सदस्यीय मंत्रिमंडळास आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शपथ दिली.  या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री अशा एकूण 7 मंत्र्यांचा समावेश आहे.
      

राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित शानदार समारंभात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी घटक पक्षांच्या सदस्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये 25 कॅबिनेट मंत्री, 9 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व 24 राज्यमंत्री  यांचा समावेश आहे. यावेळी  ब्रेक्सिस्ट देशाचे प्रमुख, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्यासह विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह  विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.      


महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री

श्री. नरेंद्र मोदी  यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल आणि अरविंद सावंत यांना राष्ट्रपती राम नाथ कोंविद यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ दिली.   तर रामदास आठवले, रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांना राष्ट्रपती राम नाथ कोंविद यांनी राज्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ दिली.


याआधी वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्री, जलसंसाधन मंत्री म्हणून तर पियुष गोयल यांनी उर्जा मंत्रालय व कोळसा मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), रेल्वे मंत्री आणि अर्थमंत्री म्हणून तर प्रकाश जावडेकर यांनी माहिती व प्रसारण मंत्री, पर्यावरणमंत्री आणि मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून मंत्रिपद भूषविले आहे. तर रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाचे राज्यमंत्री म्हणून पद भूषविले आहे. रावसाहेब दानवे यांनीही राज्यमंत्री पद भूषविले होते. अरविंद सावंत आणि संजय धोत्रे यांनी प्रथमच केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली  आहे.   

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्यापासून पोपटराव पवार यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. ३० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलासकार्यक्रमात 'हिवरे बाजार : समृद्ध गाव' या विषयावर हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांची विशेष मुलाखत  घेण्यात आली आहे.


ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि. ३१ मे, शनिवार  दि. १ जून, सोमवार दि. ३, मंगळवार दि. ४ व बुधवार दि. ५ जून रोजी रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे  संचालक अजय अंबेकर यांनी  ही मुलाखत घेतली आहे.   


अहमदनगर जिल्ह्यातील  नगर तालुक्यातील आधीचे आणि आताचे  हिवरेबाजार, गावात गेल्या तीस वर्षात झालेले बदल, ग्रामविकासाचा आराखडा, विकास योजना राबविण्यासाठी गावकऱ्यांचे केलेले मतपरिवर्तन, गावच्या विकासाकरिता मिळालेली प्रेरणा, गावात मे महिन्यातही पाण्याची कमतरता जाणवत नाही त्याची कारणे आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. पवार यांनी दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.

खासदार परिचय पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतसुबक मांडणीसह पुस्तिका तत्परतेने पूर्ण केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली, दि. 30 :  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने तयार करण्यात आलेल्या खासदार परिचय पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज महाराष्ट्र सदनात करण्यात आले.महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने 17व्या लोकसभेत महाराष्ट्रातून नवनिर्वाचित खासदारांची माहिती असलेली पुस्तिका तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पुस्तिकेचे अवलोकन केले. सुबक मांडणी, उपयुक्त माहिती या पुस्तिकेत असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य शपथ घेत असताना अगदी औचित्यपूर्ण समयी तत्परतेने ही पुस्तिका तयार केली आहे, अशा शब्दात श्री. फडणवीस यांनी कौतुक केले.


मुख्यमंत्री कक्षात पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्यात महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा आणि उपसंपादक रितेश भुयार उपस्थित होते.
                           

या खासदार परिचय पुस्तिकेत महाराष्ट्रातील लोकसभेवर निवडून आलेले  48 खासदार, राज्यसभेतील 19 व राष्ट्रपती महोदयांनी मनोनीत केलेले 2 अशा एकूण 69 खासदारांची माहिती देण्यात आलेली आहे. लोकसभेतील खासदारांची माहिती लोकसभा मतदारसंघानुसार देण्यात आली असून खासदार महोदयांचा पत्ता, ईमेल, भ्रमणध्वनी, ट्विटर हँडल व स्वीय सहायकाचा भ्रमणध्वनी देण्यात आला आहे. राज्यसभेच्या खासदार महोदयांची माहिती इंग्रजी वर्णमालेनुसार देण्यात आली आहे. राज्यसभा खासदार महोदयांच्या कालावधीसह उपयुक्त माहिती देण्यात आली आहे. या पुस्तिकेचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात प्रत्येक पानावर संबंधित खासदार महोदयांची माहिती संकलित असलेला क्यूआर कोड देण्यात आला आहे.

एसटी झाली ७१ वर्षांची; एसटी महामंडळाचा १ जून रोजी वर्धापनदिन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. ३० : राज्यातील खेड्यापाड्यांतून, गावागावांतून विहार करणारी लालपरी आता ७१ वर्षांची झाली आहे. या लालपरीचा म्हणजेच एसटीचा ७१ वा वर्धापनदिन येत्या शनिवारी १ जून २०१९ रोजी राज्यात सर्व विभागीय आणि जिल्हापातळीवरील एसटीच्या सर्व ५६८  बसस्थानकांवर  साजरा केला जाणार असल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.


राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची लोकवाहिनी ठरलेल्या लालपरी म्हणजे एसटीने काळानुसार कात टाकली असून अनेक स्वागतार्ह बदलही केले आहेत. एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक करणारी यंत्रणा एवढेच मर्यादित नसून एसटीने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत एसटीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे यासाठी एसटीने पुढाकार घेत प्रवासात सवलती दिल्या आहेत, असेही मंत्री श्री. रावते यांनी सांगितले. एसटीने लालपरीपासून सुरू केलेला प्रवास हिरकणी, शिवनेरी, शिवशाही ते विठाई असा सुखद टप्प्यावर आणला आहे. एसटीचा हा ७१ वा वर्धापनदिन राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवर उत्साहात साजरा करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यातील नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन आणि सत्कार संबंधित ठिकाणी करण्यात येणार असल्याचेही श्री. रावते यांनी सांगितले.


एसटीच्या मुंबईतील प्रमुख कार्यालयातही सोहळा करण्यात येणार असून यानिमित्ताने गोकुळदास तेजपाल सभागृहात एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. परिवहन आणि खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्याला परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख तसेच एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, एसटीचे महाव्यवस्थापक, सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, संघटनांचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


तत्पूर्वी दुपारी दोन वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुरूवातीला ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर आणि रामदास फुटाणे आपल्या सदाबहार काव्यसुमनांची मेजवानी उपस्थित मान्यवर आणि कर्मचारी वर्गाला देणार आहेत. त्यानंतर नवनिर्वाचित खासदार अरविंद सावंत यांचे अभिनंदन आणि सत्कार तसेच सेवाज्येष्ठ एसटी कर्मचारी आणि उल्लेखनीय कामगिरी करीत सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. यावेळी प्रसिद्ध सिनेतारका मेधा दाढे  उपस्थित राहणार आहेत. तसेच एसटीच्या चित्ररथाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.


एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. रावते यांनी राज्यातील सर्व कर्मचारी आणि एसटी प्रवाशांना ७१ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सातव्या आर्थिक गणनेचे राज्यस्तरीय प्रशिक्षण १ जून रोजी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 30 : देशभरात 7 वी आर्थिक गणना सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MoSPI) व कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) e-governance यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होणार आहे. या गणनेत देशातील आर्थिक कार्याची आणि उलाढालींची माहिती घरोघरी जाऊन तसेच विविध आस्थापनांना भेटी देऊन गोळा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने अखिल भारतीय प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण दि. 14 मे 2019 रोजी नवी दिल्ली येथे पार पडले असून आता महाराष्ट्र राज्यात राज्यस्तरीय प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण दि. 1 जून 2019 रोजी सकाळी 9.30 ते 5.30 या वेळेत ग्रामविकास भवन, सेक्टर 21, खारघर, नवी मुंबई येथे आयोजित केले आहे.


राज्यात कार्यरत असलेल्या CSC केंद्रातून नेमलेले प्रगणक घरोघरी तसेच आस्थापना ज्या ठिकाणी असतील तेथे भेटी देऊन मोबाईल ॲपद्वारे माहिती गोळा करणार आहेत. सदर गणनेचे पर्यवेक्षण राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षण कार्यालयाचे (NSSO) अधिकारी व राज्यातील अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे अधिकारी करणार आहेत.     


प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संचालकांसह मुख्यालयातील सह संचालक, सर्व प्रादेशिक कार्यालयाचे सह संचालक, सर्व जिल्हा सांख्यिकी अधिकारी आणि राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षण कार्यालयाचे (NSSO) अधिकारी, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) e-governance चे जिल्हा व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत असे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

शासकीय नोकरीत दिव्यांगांसाठी ४ टक्के आरक्षण - राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 30 : केंद्र शासनाच्या दिव्यांग अधिनियमानुसार दिव्यांगांना सरकारी नोकरभरतीतील 4 टक्के आरक्षणाचा लाभ देण्याच्या निर्णयास राज्य सरकारने मंजुरी दिली असून कालच (बुधवार दि.29 मे 2019)  त्या संबंधीचा शासन निर्णय काढण्यात आला आहे अशी माहिती राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली.

या निर्णयामुळे अंध/अल्पदृष्टी, कर्णबधिरता, अस्थ‍िव्यंग, मेंदूचा पक्षाघात, कुष्ठरोग मुक्त, शारीरिक वाढ खुंटणे, आम्ल हल्लाग्रस्त, स्नायू विकृती, स्वमग्नता, मंदबुध्दी, मानसिक आजार अशा विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या व्यक्तींना सरकारी नोकरीत एक टक्का वाढीव जागा मिळणार आहेत.


श्री. कांबळे पुढे म्हणाले, दिव्यांगाचा लाभ घेऊ इच्छ‍िणाऱ्या व्यक्तीने सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. दिव्यांग व्यक्तींसाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 45 वर्षे निश्च‍ित करण्यात आली आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयाने त्यांच्या आस्थापनेवरील प्रत्येक संवर्गासाठी दिव्यांग व्यक्ती सरळ सेवा भरतीच्या पदासाठी 100 बिंदू नामावलीची स्वतंत्र नोंदवही ठेवावी असा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या वर्षी दिव्यांग उमेदवार न मिळाल्यास  त्या जागेचा अनुशेष पुढील वर्षीच्या नोकर भरतीत ठेवावा असाही निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती श्री. कांबळे यांनी दिली.

ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्स : अर्ज करण्यासाठी १० जूनपर्यंत मुदतवाढ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 30 : शैक्षणिक वर्ष 2018-19 पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्च 2019च्या इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी ट्रान्सफर ऑफ क्रेडिटस् चा लाभ मिळण्याबाबत अर्ज करण्यासाठी दि. 10 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


शाळांनी विद्यार्थ्यांकडून दि. 10 जून 2019 पर्यंत हे अर्ज स्वीकारुन संबंधित विभागीय मंडळात सादर करावेत, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.

व्यावसायिक नाट्यस्पर्धेत ‘सोयरे सकळ’ प्रथम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. ३० : एकतिसाव्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत येथील भद्रकाली प्रॉडक्शन संस्थेच्या ‘सोयरे सकळ’ या नाटकासाठी रु. ७ लाख ५० हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही घोषणा केली आहे.


सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे -

जिगिषा आणि अष्टविनायक, मुंबई या संस्थेच्या हॅम्लेट या नाटकास रु. ४ लाख ५० हजाराचे द्वितीय पारितोषिक आणि अद्वैत थिएटर्स, मुंबई या संस्थेच्या आरण्यक या नाटकास रु. ३ लाखाचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

दिग्दर्शन :-   प्रथम पारितोषिक (रु.१ लाख ५० हजार/-) चंद्रकांत कुळकर्णी (नाटक-हॅम्लेट)
          
द्वितीय पारितोषिक (रु.१ लाख /- आदित्य इंगळे (नाटक-सोयरे सकळ)
          
तृतीय पारितोषिक (रु.५० हजार /-) अद्वैत दादरकर (नाटक-एका लग्नाची पुढची गोष्ट)

नाट्यलेखन : प्रथम पारितोषिक (रु.१ लाख /-) डॉ.समीर कुलकर्णी (नाटक-सोयरे सकळ)
          
द्वितीय पारितोषिक (रु.६० हजार /-) रत्नाकर मतकरी (नाटक-आरण्यक)
          
तृतीय पारितोषिक (रु.४० हजार /-) दिग्पाल लांजेकर (नाटक-ऑपरेशन जटायू)

प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक (रु.४० हजार /-) प्रदिप मुळ्ये (नाटक-हॅम्लेट)
            
द्वितीय पारितोषिक (रु.३० हजार /-) प्रदिप मुळ्ये (नाटक-सोयरे सकळ)
            
तृतीय पारितोषिक (रु.२० हजार /-) शितल तळपदे (नाटक-आरण्यक)

नेपथ्य :       प्रथम पारितोषिक (रु.४० हजार /-) प्रदिप मुळ्ये (नाटक-हॅम्लेट)
             
द्वितीय पारितोषिक (रु.३० हजार /-) प्रदिप मुळ्ये (नाटक-सोयरे सकळ)
             
तृतीय पारितोषिक (रु.२० हजार /-) संदेश बेंद्रे (नाटक-ऑपरेशन जटायू)

संगीत दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक (रु.४० हजार /-) राहूल रानडे (नाटक-हॅम्लेट)
              
द्वितीय पारितोषिक (रु.३० हजार /-) अजित परब (नाटक-सोयरे सकळ)
              
तृतीय पारितोषिक (रु.२० हजार /-) कौशल इनामदार (नाटक-आरण्यक)

वेशभूषा :       प्रथम पारितोषिक (रु.४० हजार /-) गीता गोडबोले (नाटक-सोयरे सकळ)
              
द्वितीय पारितोषिक (रु.३० हजार /-) प्रदिप मुळ्ये (नाटक-हॅम्लेट)
              
तृतीय पारितोषिक (रु.२० हजार /-) मेघा जकाते (नाटक-आरण्यक)

रंगभूषा :        प्रथम पारितोषिक (रु.४० हजार /-) सचिन वारीक (नाटक-सोयरे सकळ)
             
द्वितीय पारितोषिक (रु.३० हजार /-) उल्लेश खंदारे (नाटक-हॅम्लेट)
             
तृतीय पारितोषिक (रु.२० हजार /-) उल्लेश खंदारे (नाटक-आरण्यक)

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक व रु.५० हजार /-

पुरुष कलाकार : भरत जाधव (नाटक-वन्स मोअर), प्रशांत दामले (नाटक-एका लग्नाची पुढची गोष्ट), सुमीत राघवन (नाटक-हॅम्लेट), उमेश कामत (नाटक-दादा एक गुड न्यूज आहे), सतीश राजवाडे (नाटक-अ परफेक्ट मर्डर)

स्त्री कलाकार : ऐश्वर्या नारकर (नाटक-सोयरे सकळ), तेजश्री प्रधान (नाटक-तिला काही सांगायचंय), ऋता दुर्गुळे (नाटक-दादा एक गुड न्यूज आहे), प्रतिभा मतकरी (नाटक-आरण्यक), माधूरी गवळी (नाटक-एपिक गडबड)
     
६ मे ते २० मे या कालावधीत दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले आणि प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरीवली या ठिकाणी अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १० व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले.


स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अरविंद औंधे, विलास उजवणे, देवेंद्र पेम, अमिता खोपकर आणि शीतल क्षीरसागर यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या 'हिवरे बाजार : समृद्ध गाव' या विषयावर मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. ३० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित जय महाराष्ट्र कार्यक्रमात 'हिवरे बाजार : समृद्ध गाव' या विषयावर हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांची विशेष मुलाखत  घेण्यात आली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग शुक्रवार दिनांक ३१ मे रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी ७. ३० वाजता प्रसारित होणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे  संचालक अजय अंबेकर यांनी  ही मुलाखत घेतली आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील आधीचे आणि आताचे  हिवरे बाजार, गावात गेल्या तीस वर्षात झालेले बदल, ग्रामविकासाचा आराखडा, विकास योजना राबविण्यासाठी‍ गावकऱ्यांचे केलेले मतपरिवर्तन, गावच्या विकासाकरिता मिळालेली प्रेरणा, गावात मे  महिन्यातही पाण्याची कमतरता जाणवत नाही त्याची कारणे आदी विषयांची सविस्तर माहिती श्री.पवार यांनी जय महाराष्ट्रकार्यक्रमातून दिली आहे.

तंबाखूमुक्त शाळा अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे राजकुमार बडोले यांचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. ३० : तंबाखू आणि तंबाखूच्या धुरामध्ये निकोटीन सारखी सात हजारहून अधिक विषारी रसायने असतात. त्यामुळे व्यसनाधीन माणसाला कॅन्सरसारखे दुर्धर आजार होतात. व्यसनाधीन व्यक्तीच नाही, तर त्यांची कुटुंबेही तंबाखूच्या व्यसनाचा बळी ठरत आहेत. राज्य शासन आणि सलाम मुंबई फाउंडेशन संयुक्तरित्या सुदृढ महाराष्ट्र बनविण्याचे कार्य करीत आहे. मुंबईसह राज्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठीच्या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि देशाची भावी पिढी निरोगी राहील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी आज केले.


जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी राजकुमार बडोले बोलत होते. शहरात मोठ्या प्रमाणात वितरित होणारा पेन हुक्का प्रतीकात्मक शैक्षणिक पेनने नष्ट करून शाळेत फक्त शिक्षणासाठीचाच पेन राहील असा विश्वास श्री.बडोले यांनी व्यक्त केला. कार्यक्रमस्थळी जनजागृतीपर संदेश देणारे पोस्टर्स लावण्यात आले  तसेच फुफ्फुसाची तपासणी करण्यात आली.


श्री.बडोले म्हणाले, सलाम मुंबई फाउंडेशन तंबाखू विरोधी दिनानिमित्त व्यसनमुक्तीसारखे अभियान राबवित आहेत. त्यांचे हे कार्य हे कौतुकास्पद आहे. शाळांच्या परिसरात मिळणारा पेन हुक्का बंद करण्याचे काम राज्य शासन करीत असून, भविष्यात संपूर्ण शाळा या तंबाखूमुक्त करण्यासाठीचे प्रयत्न शासनाने सुरु केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. फाउंडेशनच्या पुढील कार्यासाठी श्री. बडोले यांनी शुभेच्छा दिल्या.

अहिल्यादेवींना 'पुण्यश्लोक' बनविणारे पाच महान गुण

1 टिप्पणीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याजवळ लोकोत्तर ठरणारे अनेक महान गुण होते. त्या गुणांच्या जोरावर त्यांनी केवळ माळवा प्रांतातीलच नव्हे तर भारतवर्षातील जनतेच्या मनात अमीट ठसा उमटवला. सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, छत्रपती शिवराय यांच्या परंपरेतील लोकराज्याचा वारसा अहिल्यादेवींनी पुढे नेला. अहिल्यादेवींना पुण्यश्लोक बनवणारे पाच महान गुण जागतिक अभ्यासकांनी अधोरेखित केले आहेत. ते महान गुण अहिल्यादेवींच्या चरित्रात दिसून येतात.

१. आपण जे घडविले त्याचे प्राणपणाने रक्षण
अहिल्याबाई होळकरांचा जन्म ३१ ऑगस्ट १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी या खेड्यात झाला. माणकोजी शिंदे-पाटील यांची अहिल्या नावाची ही मुलगी लहानपणापासूनच धाडसी होती. तसेच राज्यकर्त्यांना आवश्यक असणारे सर्व गुण तिच्याजवळ लहानपणापासूनच होते.

एकदा चोंडी गावात थोरले बाजीराव पेशवे यांच्या सैन्याचा तळ पडला होता. सीना नदीच्या काठी असलेल्या एका देवालयात दर्शनासाठी म्हणून छोटी अहिल्या आपल्या आईबरोबर गेली होती. तेथे नदीच्या वाळूत खेळताना अहिल्येने वाळूचे एक शिवलिंग बनविले. तेवढ्यात सैन्यदलातील एकाचा घोडा उधळला. उधळलेला घोडा आपल्याच दिशेने येत असल्याचे पाहून अहिल्याबरोबरच्या मैत्रिणी भिऊन पळून गेल्या. मात्र अहिल्या मुळीच डगमगली नाही. तिने आपण तयार केलेल्या शिवलिंगावर पालथे पडून त्या शिवलिंगाचे रक्षण केले.
तेवढय़ात पाठीमागून आलेल्या श्रीमंतांनी थोड्याशा जरबेच्या आवाजातच अहिल्येला म्हटले, पोरी तुला घोड्याने तुडवले असते तर? त्यावर अहिल्याबाई आपले डोळे श्रीमंतांवर रोखत म्हणाली, हे शिवलिंग मी घडविले आहे व आपण जे घडविले आहे त्याचे प्राणपणाने रक्षण करावे असे थोरली माणसे सांगतात. मी तेच केले आहे. तिचे बाणेदार उत्तर ऐकून श्रीमंत तर खूष झालेच परंतु त्यांच्याबरोबर असलेले सरदार मल्हारराव होळकर यांनी छोट्या अहिल्येला आपली सून करून घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे मल्हाररावांनी तिला आपली सून करून घेतली आणि अहिल्याबाईंनी देखील नंतर मल्हाररावांचा निर्णय सार्थ ठरविला व होळकर घराण्याची कीर्ती सर्वदूर पोहोचविली.

२. प्रजासेवा ती देवपूजा
बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो. अशी  अहिल्यादेवी होळकर यांची धारणा होती. राजाने प्रजासेवा हीच देवपूजा मानावी या उदात्त विचारांनी त्यांनी राज्य केलं. त्यांच्या राज्यकारभारात याचे प्रतिबिंब ठायी ठायी दिसत
 

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या आग्रहावरून सती जाण्यापेक्षा जनहित महत्त्वाचे मानले. अहिल्यादेवी म्हणत ‘‘सती जाणे कोणत्या शास्त्रात नाही आणि सती गेल्याने कोणताही मोक्ष किंवा पुण्य मिळत नाही. अशा परंपरेची पद्धत बंद केली पाहिजे.’’ सती प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.

अहिल्यादेवींनी आपल्या होळकर शाहीत दत्तक वारसा मंजू्र करून लोकांच्या संसारात सुखाची लाट निर्माण केली. अहिल्यादेवींनी आपल्या राज्यातील लोकांना जाती किंवा धर्माच्या नावाखाली अस्पृश्यता पाळण्यावर बंदी घातली आणि सर्वांना समान शिकवण दिली. महात्मा फुले यांनी आपल्या शाळेचे नाव अहिल्या आश्रम ठेवले तर राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठीच्या दवाखान्याला अहिल्या स्मरणार्थ दवाखाना असे नाव दिले.अशी ही थोर समाजसुधारक राणी होती.


३. ममता आणि समता
अहिल्यादेवींनी जंगलतोडीविरुद्ध  कुऱ्हाडबंदी आणली. प्रत्येक घरातील माणसाच्या नावावर पाच झाडे असे गणित देऊन झाडे लावून घेतली.जे झाडे लावत नाहीत त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचा आदेश काढला.


आपल्या स्वतःच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून स्वतःच्या घरापासून सुधारणेची सुरूवात केली.

अहिल्यादेवींनी त्याकाळी हुंडाविरोधी कायदा करून हुंडा देणाऱ्या घेणाऱ्या व मध्यस्ती करणाऱ्यांवर दंड ठोठावला. परराज्याशी सलोख्याचे संबध राहावे म्हणून त्यांनी पंधरा राज्यात आपले वकील नेमले होते. इतर राज्यातील नऊ वकील होळकर राज्याच्या दरबारात होते. मातोश्री अहिल्यादेवींनी निर्माण केलेल्या प्रशासन व्यवस्थेत प्रजेची उन्नती व विकास, सामाजिक शांतता, सुव्यवस्था, समता व ममत्व,न्याय,स्वातंत्र्य या मूलभूत मानवी मूल्यांचा प्रत्यक्ष आस्वाद त्या काळात जनता घेत होती. यापासून आजच्या प्रशासनाला खूप काही शिकण्यासारखे आहे.


४. लोकांची गाऱ्हाणी ऐकावी राजाने
इ.स. १७६५ मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाईदरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्यादेवींच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते. "चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही ४-५ दिवस मुकाम करू शकता.तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा.....कूच करतांना,मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा."


पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्यादेवींनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्यादेवींच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्यादेवी सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत, असे म्हणतात.
पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होता, त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर(मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्यादेवींनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवित असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्यादेवींनीच केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, हिंदू मंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू राहावी म्हणून अनेकवेळा दान दिले, माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या.


५. देव, देश आणि धर्मासाठी सारे काही
भारतीय संस्कृती कोशात अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे-काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे. अहिल्यादेवींस, सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता, असे दिसते.

अहिल्यादेवींनी जनतेच्या/रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्यादेवींच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्यादेवींनी दत्तक विधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी अहिल्यादेवींच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या प्रधानमंत्र्यांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला.


त्यांच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास अहिल्यादेवी होळकर असे नाव दिलेले आहे.

भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवींनी सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा 'कर' घेण्याचा अधिकार दिला. याही बाबतीत, (आंग्ल लेखक) 'माल्कम' यांच्यानुसार, अहिल्यादेवींनी 'त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले'.


महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्यादेवींनी आश्रय दिला. कारागीर, मूर्तिकार व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीपण सुरू केली.


एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील, भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात, अहिल्यादेवी होळकरांस माळवा व महाराष्ट्रात, त्या काळी व आताही, संतांचा सन्मान दिला जातो. इतिहासाच्या कोणाही अभ्यासकास ते मत खोडून काढण्याजोगे आजवर काहीही सापडलेले नाही. या पाच महान गुणांशिवाय अहिल्यादेवी यांच्याजवळ असंख्य गुण होते. त्यामुळे त्यांचं जीवन तत्वज्ञानी राणी म्हणून ख्यातकीर्त झालं. पण ढोबळमानाने पाच महान गुण या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या गुणांचा आजही अभ्यास होत आहे. कोणत्याही काळात राज्यकर्त्यांना या गुणांपासून प्रेरणा मिळेल अशी मला खात्री वाटते.


अहिल्यादेवी यांच्या लोकोत्तर प्रेरणांचा जागर करत त्यांना अभिवादन, वंदन करण्यासाठी ३१ मे रोजी जयंती महोत्सव समिती  सालाबादप्रमाणे लोकोत्सव साजरा करणार आहे. या लोकोत्सवात आपण सर्वजणांनी सहभागी व्हावे असे मी आवाहन करतो.


- प्रा. राम शिंदे
जलसंधारण आणि इतर मागासवर्ग कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य