लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी सुट्टी जाहीर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि.30 :  लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी कामासाठी आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्राबाहेर असतील अशा कर्मचाऱ्यांनाही लागू असेल. राज्य व केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम तसेच अकृषी, कृषी आणि अन्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, शिक्षण संस्था आदींनाही ही अधिसूचना लागू राहील.

पहिल्या टप्प्यात गुरुवार दि. 11 एप्रिल 2019 रोजी वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार असून त्यादिवशी संबंधित मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी राहील. बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या दुसऱ्या टप्प्यातील दहा मतदारसंघांसाठी गुरुवार दि. 18 एप्रिल या मतदानाच्या दिवशी सुट्टी राहील.तिसऱ्या टप्प्यातील जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या 14 मतदारसंघांमध्ये मंगळवार दि. 23 एप्रिल या मतदानाच्या दिवशी सुट्टी राहील. राज्यातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर आणि शिर्डी या 17 मतदार संघात सोमवार दि. 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार असून या‍ दिवशी सार्वजनिक सुट्टी राहील.

केंद्र शासनाच्या अखत्यारितीतील स्वायत्त महामंडळे, प्रतिष्ठाने आदींनाही या अधिसूचनेनुसार सुट्टी लागू राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
00000
सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.30.3.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा