राज्यातील शाळा, शासकीय इमारतीत ९० हजाराहून अधिक मतदान केंद्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदान केंद्र


मुंबई, दि. 31 : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सुमारे 95 हजाराहून अधिक असलेल्या मतदान केंद्रांपैकी सुमारे 61 हजार मतदान केंद्र ग्रामीण तर 34 हजाराहून अधिक शहरी भागात आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 7 हजार 600 हून अधिक मतदान केंद्र आहेत. त्यापाठोपाठ मुंबई उपनगर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्रांची संख्या जास्त आहे. शहरी भागात मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान केंद्र असून पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील मतदान केंद्रांची संख्या जास्त आहे. राज्यात सुमारे 1300 पेक्षा जास्त मतदान केंद्र वन आणि अर्ध वन भागातील असून 90 हजार पेक्षा जास्त मतदान केंद्र शाळा, महाविद्यालये आणि शासकीय इमारतींमध्ये आहे.

निवडणूक प्रक्रियेतील अविभाज्य घटक म्हणून मतदान केंद्र ओळखले जाते. मतदाराला मतदानाचा हक्क बजावण्याकरिता मतदान केंद्र महत्त्वाची भूमिका बजावतात. बहुतांश मतदान केंद्र शासकीय इमारत अथवा शाळा, महाविद्यालयांमध्ये असतात. काही वेळेला तात्पुरत्या स्वरुपात मतदान केंद्र देखील उभारले जातात. यावर्षीच्या निवडणुकांसाठी सुमारे 1100 मतदान केंद्र तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात आले आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने विविध अत्यावश्यक सुविधा मतदान केंद्रांवर उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. राज्यात शहरी आणि ग्रामीण मतदान केंद्रांवर सारख्याच सुविधा दिल्या जातात. मात्र स्थानिक परिस्थितीनुसार निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर त्यामध्ये बदल केला जातो. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 95 हजार 473 एकूण मतदान केंद्र आहेत. त्यामध्ये वाढ होऊ शकते.


जिल्हानिहाय मतदान केंद्रांची अनुक्रमे ग्रामीण व शहरी भागातील संख्या (सुमारे) अशी (कंसांत एकूण संख्या) :नंदूरबार-1100, 190 (1300) ; धुळे-1300, 300 (1600) ; जळगाव-3000,500 (3500) ; बुलढाणा-1800,400 (2200) ;अकोला-1100,500 (1600) ; वाशिम-900, 80 (980) ; अमरावती-1900, 617 (2600); वर्धा-1076, 238 (1300) ; नागपूर-2100, 2200 (4300) ; भंडारा-1165, 40 (1205); गोंदिया-1153, 128 (1280) ;गडचिरोली-929, 01 (930) ; चंद्रपूर-1170, 890 (2070) ; यवतमाळ-2280, 200 (2491) ; नांदेड-2495, 460 (2950) ;हिंगोली-866, 135 (1000) ; परभणी-1040, 450 (1500) ; जालना-1390, 240 (1633); औरंगाबाद-1950, 1000 (2957) ;नाशिक-2980, 1450 (4440) ; ठाणे-1273, 5215 (6488) ; मुंबई उपनगर-286, 7011 (7297) ; मुंबई शहर-0, 2592 (2592) ;रायगड-2470, 220 (2693) ; पुणे-3287, 4379 (7666) ; अहमदनगर-2922, 800 (3722) ; बीड-1785, 526 (2310) ;लातूर-1925, 70 (1995) ;उस्मानाबाद-1322, 160 (1490) ;सोलापूर-2580, 890 (3480) ;सातारा-2738, 230 (2970) ;रत्नागिरी-1673, 26 (2699) ; सिंधुदुर्ग-890, 21 (915) ; कोल्हापूर-2490, 820 (3321) ;सांगली-1890, 500 (2400) ;पालघर-1800, 310 (2120). राज्यात सहाय्यकारी मतदान (ऑक्झिलरी) केंद्रांची संख्या निश्चितीनंतर एकूण मतदान केंद्रांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

निवडणूक चिन्हांवर डिजिटल साधनांचा प्रभाव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
१९८ मुक्त चिन्हं उमेदवारांना उपलब्ध




मुंबई, दि. ३१ :  लोकसभा निवडणुका लढविणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षातील उमेदवार वगळता अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी वाटप करण्यात येणाऱ्या चिन्हांमध्ये (निशाणी) यंदा दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे. १९८ निवडणूक चिन्हे मुक्त चिन्हे’ (फ्री निशाणी) घोषित करण्यात आली असून त्यावर डिजिटल साधनांचा प्रभाव दिसून येतो.

राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांची चिन्हे राखीव आहेत. २०१४ च्या निवडणुकांमध्ये ८७ मुक्त चिन्हे होती. त्यापैकी काही चिन्हे वगळून आणि नव्याने समावेश करुन यावर्षी १९८ मुक्त चिन्हे निवडण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध करुन दिली आहेत. यामधून उमेदवारांना चिन्हाची मागणी करता येणार आहे. निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) आदेश, १९६८ नुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना विहीत पद्धतीने चिन्हांचे वाटप केले जाते.

दैनंदिन वापरातील वस्तू, व्यक्तिगत साधने, दळणवळणाची साधने, फळे, भाज्या, स्वयंपाकघरातील वस्तू, खेळ, कृषी क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, अत्याधुनिक संगणक युगातील साधने आदी विविध क्षेत्रातील साधनांचा मुक्त चिन्हांमध्ये समावेश करुन आयोगाने सर्वसमावेशकता जपली आहे.

मुक्त चिन्हांमध्ये नव्या- जुन्याचा मिलाफ
जुन्या काळातील वाळूचे घड्याळ, दळणाचे जाते, उखळ, नरसाळे, धान्य पाखडण्याचे सूप, ग्रामोफोन, टाईपरायटर, डिझेल पंप ते आधुनिक काळातील लॅपटॉप, कॉम्प्युटरचा माऊस, सीसीटीव्ही कॅमेरा, पेनड्राईव्ह, रोबोट, हेडफोन अशा नव्या-जुन्याचा संगम या मुक्त चिन्हांमध्ये करण्यात आला आहे.

व्यक्तिगत वापराच्या वस्तूंना स्थान
आपल्याला सकाळी उठल्यापर्यंत लागणाऱ्या टूथब्रश, टूथपेस्ट पासून ते रेझर, साबणदानी, चप्पल, बूट, मोजे, उशी आदी व्यक्तिगत वापराच्या वस्तूंनाही चिन्हांमध्ये स्थान मिळाले आहे.

हेल्मेटद्वारे सुरक्षेचा संदेश
मुक्त चिन्हांमध्ये हेल्मेटचा समावेश करुन आयोगाने एक प्रकारे दुचाकी चालकाच्या जीविताच्या रक्षणासाठी संदेशच दिला आहे.

शेती आणि शेतकऱ्याला मान देणारी चिन्हे
या चिन्हांमध्ये ऊस शेतकरी (गन्ना किसान), नारळाची बाग, डिजेल पंप, ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी, शेतीच्या मशागतीसाठीचे टीलर, विहीर अशा चिन्हांचा समावेश करुन असून एकप्रकारे शेतीचे महत्त्व लक्षात घेतले आहे.

स्वयंपाकघरच अवतरले
गॅस सिलेंडर, गॅस शेगडी, रेफ्रिजरेटर, मिक्सर, प्रेशर कुकर, हंडी, कढई, तळण्याची कढई (फ्राईंग पॅन), काचेचा ग्लास, ट्रे, कपबशी, चहाची गाळणी, उखळ आणि खलबत्ता, शिमला मिर्ची, फूलकोबी, हिरवी मिरची, भेंडी, आले,मटार, फळांची टोपली, सफरचंद, द्राक्षे, नासपती (पीअर्स), फणस, अननस, अक्रोड, बिस्कीट, ब्रेड, केक आदींच्या रुपात मुक्त चिन्हे ठरविताना आयोगाने स्वयंपाकघराला मान दिला आहे.

यासोबत रिक्षा, ट्रक, हेलिकॉप्टर, जहाज अशी रस्ते तसेच जलवाहतुकीची साधने, विटा, थापी, करवत, कडी, कुलपाची चावी असे बांधकाम साहित्य, बॅट, बुद्धीबळ पट, कॅरम बोर्ड, फूटबॉल, ल्युडो, स्टम्प, हॉकी स्टीक आणि बॉल,टेनिस रॅकेट आणि बॉल अशी खेळांची साधने तसेच क्रिकेट फलंदाज, फूटबॉल खेळाडू, मोत्यांचा हार, हिरा, अंगठी असे मौल्यवान दागिने, हार्मोनियम, सितार, व्हायोलीन अशी संगीताची साधने यांच्यासोबतच अनेक विविध क्षेत्रातील चिन्हेही मुक्त चिन्हांमध्ये समाविष्ट आहेत.

जाहीर सभेतील भाषणप्रकरणी पृथ्वीराज देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत






मुंबई, दि. 30 : सांगली लोकसभा मतदारसंघात पृथ्वीराज (बाबा) सयाजीराव देशमुख यांनी जाहीर सभेत केलेल्या भाषणाच्या अनुषंगाने दाखल तक्रारीची शहानिशा करून त्यांच्याविरुद्ध भा.दं.वि.1860 चे कलम 171 आणि 171 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघांतर्गत मिरज विधानसभा मतदार संघात दि. 27 मार्च रोजी आणि पलूस-कडेगाव मतदार संघात 28 मार्च 2019 रोजी पृथ्वीराज देशमुख यांनी केलेल्या भाषणाच्या अनुषंगाने आयोगाकडे तक्रार केली गेली होती. तक्रारीची शहानिशा करून त्यांच्याविरुद्ध मिरज पोलीस ठाणे आणि भिलवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचेही कार्यालयाने कळविले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी सुट्टी जाहीर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत






मुंबई, दि.30 :  लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी कामासाठी आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्राबाहेर असतील अशा कर्मचाऱ्यांनाही लागू असेल. राज्य व केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम तसेच अकृषी, कृषी आणि अन्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, शिक्षण संस्था आदींनाही ही अधिसूचना लागू राहील.

पहिल्या टप्प्यात गुरुवार दि. 11 एप्रिल 2019 रोजी वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार असून त्यादिवशी संबंधित मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी राहील. बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या दुसऱ्या टप्प्यातील दहा मतदारसंघांसाठी गुरुवार दि. 18 एप्रिल या मतदानाच्या दिवशी सुट्टी राहील.



तिसऱ्या टप्प्यातील जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या 14 मतदारसंघांमध्ये मंगळवार दि. 23 एप्रिल या मतदानाच्या दिवशी सुट्टी राहील. राज्यातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर आणि शिर्डी या 17 मतदार संघात सोमवार दि. 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार असून या‍ दिवशी सार्वजनिक सुट्टी राहील.

केंद्र शासनाच्या अखत्यारितीतील स्वायत्त महामंडळे, प्रतिष्ठाने आदींनाही या अधिसूचनेनुसार सुट्टी लागू राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
00000
सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.30.3.2019

दुसऱ्या टप्प्यातील १० मतदारसंघात १७९ उमेदवार निवडणूक रिंगणात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत






मुंबई, दि. 29 : लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील दुसऱ्या टप्प्याअंतर्गत दहा मतदारसंघात नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या 278 पैकी 99 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली असून, 179 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील नामनिर्देशनपत्रांच्या छाननीअंती 278 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. या टप्प्यासाठी नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी 3 वाजेपर्यंत होती. या मुदतीत 278 पैकी 99 उमेदवारांनी माघार घेतली. मतदारसंघनिहाय निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 12, अकोला 11, अमरावती 24, हिंगोली 28, नांदेड 14, परभणी 17, बीड 36, उस्मानाबाद 14, लातूर 10 आणि सोलापूर  मतदारसंघातून 13 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

तिसऱ्या टप्प्याअंतर्गत आज 11 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील 14 मतदारसंघात कालपासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येत आहेत. आज सहा मतदारसंघात 11 तर आजपर्यंत 9 मतदार संघात 20 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. मतदारसंघनिहाय आज दाखल आणि कंसात आजपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. जळगाव मतदार संघात आज 1 (आजपर्यंत 2 उमेदवार), औरंगाबाद 3 (4), रायगड 2 (4), सातारा 1 (1), कोल्हापूर 2 (2) आणि हातकणंगले मतदारसंघात आज 2 उमेदवारांनी तर आजपर्यंत 4 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

तीन मतदारसंघात आज एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही मात्र आजपर्यंत 3 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. त्यामध्ये रावेर, जालना आणि सांगली मतदारसंघात प्रत्येकी एका उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात आतापर्यंत एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही.

0000

सचिन गाढवे/ वि.सं.अ./ दि. 29 मार्च 2019

मतदानाची वेळ संपण्याच्या ४८ तास आधी, मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत




मुंबई, दि. 29 : लोकसभा निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मतदानाची वेळ संपण्याच्या 48 तास आधीपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री करण्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 च्या कलम 135(सी) नुसार मनाई करण्यात आली आहे. हे दिवस 'कोरडा दिवस' म्हणून संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जाहीर करावे, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहेत.


निवडणुका खुल्या, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात येते. तसेच मतदानापूर्वीचे 48 तास आणि मतमोजणीच्या दिवसाचे 24 तास मद्यविक्री करण्यात येणारी दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विदेशी मद्य, देशी दारू, ताडी दुकाने यांना हा आदेश लागू असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांची अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल. आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल.


तीन दिवस कोरडा दिवस म्हणून जाहीर करण्याबाबत लोकप्रतिनिधी अधिनियम, 1951 च्या कलम 135(सी) अन्वये तरतूद करण्यात आली आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी 48 मतदारसंघामध्ये एकूण 4 टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी 7 मतदारसंघांसाठी, दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी 10 मतदारसंघांसाठी, दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी 14 मतदारसंघांसाठी आणि 29 एप्रिल 2019 रोजी 17 मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. मतमोजणी 23 मे 2019 रोजी होणार आहे.

मतदान सामग्री सीलबंद करण्यासाठी लाखेच्या सहा लाख कांड्‌या, चार लाख मेणबत्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत





मुंबई, दि. 29 : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर विविध उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात सील होईल. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, त्याचे कंट्रोल युनिट आणि यंदा वापरण्यात येणारे व्हीव्हीपॅट यंत्रासह इतर सामग्री सीलबंद ठेवण्याची लाखमोलाची कामगिरी बजावायला लाखेचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रासाठी 6 नग या प्रमाणे लाखेचे 6 लाख 81 हजार नग कांडी लागणार आहेत. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात लाख वापरण्याची निवडणूक काळातील ही पहिलीच वेळ असावी.


जप्ती असो अथवा कागदपत्रे, पुरावे सीलबंद करायचे असो शासकीय कारवाईत लाखेची लालभडक मोहोर महत्त्वाची ठरते. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानानंतर मतदान यंत्रे व त्याच्याशी निगडित साहित्य मतमोजणीपर्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी ती सीलबंद केली जातात. त्यासाठी मोलाची कामगिरी लाखेकडून बजावण्यात येते. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबरोबरच त्याचे कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्र, मतदारांची नावे व स्वाक्षरी असलेली यादी आदी साहित्य मतदानाची वेळ संपल्यानंतर सीलबंद केली जाते. मतमोजणीच्या दिवशी हे सील काढले जाते.


यापूर्वी कागदी मतपत्रिकेद्वारे मतदान होत असल्यामुळे मतपेटी व इतर साहित्य सीलबंद केली जात. मात्र, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आल्यानंतर या यंत्राबरोबरच त्याचे कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्र यांनाही सील केले जाते. मतदान यंत्रे व इतर अनुषंगिक साहित्य सीलबंद करण्याची कामगिरी ही मतदान प्रक्रियेतील ही सर्वात मोठी जबाबदारी असते.  हे सर्व साहित्य ठेवण्यासाठी आऊटर पेपर, ग्रीन पेपर व व्हीव्हीपॅटसाठी पिंक पेपरचा वापर केला जातो. त्यावर लाख लावून सीलबंद केले जाते. यासाठी यंदा प्रत्येक मतदान केंद्रासाठी 6 नग या प्रमाणे राज्यासाठी 6 लाख 81 हजार 800 नग लाख  मागविण्यात आले आहेत. भारतीय सुरक्षा मुद्रणालयाकडून ही लाख केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत राज्याकडे पाठविण्यात येते.


ही लाख वितळवून मतदान यंत्रे सीलबंद केली जातात. ती वितळविण्यासाठीची मेणबत्ती निवडणूक आयोगाकडून पुरविली जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाख वितळविण्यासाठी सुमारे 4 लाख 55 हजार मेणबत्त्यांची मागणी राज्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. याबरोबर कागदे, पेन्सिल, खोडरबर, शाई आदी साहित्य मोठ्या प्रमाणात मागविण्यात आले आहेत.


पुढील लोकप्रतिनिधी कोण होणार याचे भवितव्य या मतदान यंत्रात सुरक्षितपणे ठेवण्यासाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत या लाखेला मोठे मोल आहे.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/29.3.2019

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी १२ सदिच्छादूतांचे आवाहन

1 टिप्पणी






मुंबई, दि. 29 :  यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, मतदान हक्काचे महत्त्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार जागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना आता कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील विविध 12 मान्यवरांची सदिच्छादूतम्हणून साथ लाभली आहे. समाज माध्यमे, मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरात फलक, भित्तीपत्रकाद्वारे हे सदिच्छादूत  लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.



या सदिच्छादूतांमध्ये पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण सन्मानित अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ. निशिगंधा वाड, राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित अभिनेत्री उषा जाधव, महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, अर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, कॉमनवेल्थ गेम्समधील सुवर्णपदक विजेत्या नेमबाज राही सरनोबत, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत यांचा समावेश आहे.



2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेते पद्माकर कांबळे, खेळाडू राही सरनोबत, वीरधवल खाडे, नेत्रशल्यचिकित्सक डॉ.तात्याराव लहाने, डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे, माजी सनदी अधिकारी ए.एम. खान यांनी सदिच्छादूतम्हणून काम करुन मतदान जागृतीचे आवाहन केले होते. 

मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांची अपर मुख्य सचिव पदावर पदोन्नती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत






मुंबई, दि. 28: राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांची आज अपर मुख्य सचिव पदावर पदोन्नती झाली.

आज अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांच्यासह सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, उपमुख्य निवडणूक अधिकारी श्रीमती शुभा बोरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. कुमार यांचे अभिनंदन केले.

अश्वनी कुमार हे भारतीय प्रशासन सेवेतील 1987 च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते ऑगस्ट 2016 पासून प्रधान सचिव व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. तत्पूर्वी ते महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे सचिव म्हणून कार्यरत होते. आज श्री. कुमार यांची प्रधान सचिव पदावरून अपर मुख्य सचिव पदावर पदोन्नती झाली. त्यांना प्रशासकीय सेवेचा 32 वर्षांचा दीर्घ अनुभव आहे.

पहिल्या टप्प्यातील ७ मतदारसंघात ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत




मुंबई, दि. 28 : लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याअंतर्गत सात मतदारसंघात नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या 147 पैकी 31 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली असून, 116 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्रांच्या छाननीअंती 147 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी 3 वाजेपर्यंत होती. या मुदतीत 147 पैकी 31 उमेदवारांनी माघार घेतली. मतदारसंघनिहाय निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : वर्धा लोकसभा मतदार संघ - 14, रामटेक मतदारसंघ - 16, नागपूर मतदारसंघ - 30, भंडारा-गोंदिया मतदारसंघ - 14, गडचिरोली-चिमूर मतदारसंघ - 5, चंद्रपूर मतदारसंघ - 13 आणि यवतमाळ-वाशिम मतदारसंघात 24 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

दुसऱ्या टप्प्याअंतर्गत 278 उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 10 मतदारसंघात छाननीअंती 278 उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली असून उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार आहेत. त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.


दुसऱ्या टप्प्यातील नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या उमेदवारांची मतदारसंघनिहाय संख्या पुढीलप्रमाणे : बुलढाणा- 13, अकोला -12, अमरावती -34, हिंगोली -34, नांदेड-55, परभणी-21, बीड-53, उस्मानाबाद-20, लातूर-12 आणि सोलापूर -24.

0000

सचिन गाढवे/ वि.सं.अ./ दि. 28 मार्च 2019

कर्करोगाचा मुकाबला करण्यासाठी विशेष योजना तयार करण्याची राज्यपालांची सूचना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत




मुंबई, दि. 28 : कर्करोगाच्या आव्हानाचा सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी सर्व संबंधितांनी विशेष योजना तयार करावी, अशी सूचना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केली. कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन या कर्करुग्णांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते भारतीय पोस्टाचे एक विशेष आवरण जारी करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.


देशात मृत्यूला कारणीभूत असलेल्या प्रमुख कारणांमध्ये कर्करोगाचा दुसरा क्रमांक लागतो. गेल्या तीन दशकांमध्ये कर्करोगाचे प्रमाण दुपटीने वाढले आहे आणि ते सातत्याने वाढत आहे. शासकीय संस्था, खासगी संस्था तसेच अशासकीय संस्थांनी एकत्रितपणे काम करून कर्करोगाचे निदान करण्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा सामान्य लोकांना परवडेल अशा किंमतीत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.




पुरुषांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे तर स्त्रियांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. राज्यातील ग्रामीण भागांमध्ये, विशेषतः गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात गुटखा खाण्याचे प्रमाण लहान मुलांमध्येदेखील वाढले असल्याचे नमूद करून तंबाखूचे सेवन कमी करण्यासाठी नव्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे राज्यपालांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी संस्थेला कर्करुग्ण सेवाकार्यासाठी एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली.


कार्यक्रमाला कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनचे अध्यक्ष वाय. के. सप्रू, मुंबई विभागाच्या प्रधान पोस्ट मास्टर स्वाती पांडे तसेच उभय संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (राष्ट्रीयस्तर) १२ मेऐवजी १६ जूनला होणार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत






मुंबई, दि. २८ : राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ. १० वी राज्यस्तर परीक्षेत निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांची राष्ट्रीयस्तर परीक्षा लोकसभा निवडणूक कामकाजामुळे रविवार दिनांक १२ मेऐवजी रविवार दि. १६ जून २०१९ रोजी होणार आहे. संबंधित निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे एप्रिल २०१९ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात एनसीईआरटी (NCERT) नवी दिल्ली यांच्या www.ncert.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा इ. १० वी साठी राज्यस्तर परीक्षा ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत ०४ नोव्हेंबर २०१८ रोजी घेण्यात आली होती. एनटीएस इ. १०वी परीक्षेसाठी राज्यातून ८६ हजार २८१ विद्यार्थी नोंदवण्यात आले होते. एनसीईआरटी नवी दिल्लीकडून राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यातून ३८७ विद्यार्थी कोटा ठरवण्यात आला होता. त्यानुसार राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून निवडण्यात आलेल्या ३८७ विद्यार्थ्यांची निवड यादी १ मार्च रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती. तथापि एनसीईआरटी नवी दिल्ली यांचेकडून महाराष्ट्रासाठी सन २०१८-१९ व सन २०१९-२० साठी सुधारित कोटा ७७४ विद्यार्थी इतका देण्यात आलेला आहे. त्यामध्ये सर्वसाधारण गटातील(General) ३९१, इतर मागास वर्गीय संवर्गातील २०९, अनुसूचित जाती (SC) ११६ व अनुसूचित जमाती (ST) ५८ अशा एकूण ७७४ विद्यार्थ्यांचा कोटा देण्यात आलेला आहे. संबंधित संवर्गातील समान गुणांचे विद्यार्थी समाविष्ट करून ७७५ विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच संबंधित संवर्गात अपंगांसाठीचे ४% आरक्षण समाविष्ट आहे. ही सुधारित निवडयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in http://nts.mscescholarshipexam.in या वेबसाईटवर १९ मार्च रोजी सायं. ५.०० वाजता जाहीर करण्यात आली आहे. 


ज्या विद्यार्थ्यांची निवड जात/अपंगत्व आरक्षणातून झालेली आहे, त्यांनी सदर प्रमाणपत्राची सत्य प्रत प्रवेशपत्रासोबत एनसीईआरटी नवी दिल्ली यांना सादर केल्याशिवाय त्यांची निवड कायम समजण्यात येणार नाही.

मुंबईसह १७ मतदारसंघातील मतदार नाव नोंदणीसाठी ३० मार्चपर्यंत शेवटची संधी

1 टिप्पणी




मुंबई, दि. 28 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 17 मतदारसंघांमध्ये मतदार नाव नोंदणीची अंतिम संधी 30 मार्च 2019 पर्यंत आहे. यामध्ये मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील मतदार संघांबरोबरच राज्यातील इतर अकरा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून ज्या नागरिकांनी अद्याप मतदार यादीत नाव नोंदवलेले नाही त्यांना ते नोंदविण्याची अखेरची संधी मिळणार आहे.


लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत पहिल्या तीन टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. चौथ्या टप्प्यातील अधिसूचना 2 एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार आहे. तर नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल आहे. या टप्प्यात मुंबईमधील मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी या मतदारसंघातील मतदानाचा समावेश आहे.


नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम तारखेपूर्वी दहा दिवस अगोदरपर्यंत नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदणी करता येते. त्यानुसार चौथ्या टप्प्यातील मतदार संघातील नागरिकांना यादीत नाव नोंदणीसाठी 30 मार्च ही अंतिम तारीख आहे. मतदार छायाचित्र ओळखपत्र असले तरी मतदान करण्यासाठी मतदान यादीत नाव असणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मतदार यादीत नाव असल्याची खात्री करावी. तसेच 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती घ्यावी.


चौथ्या टप्प्यातील मतदान होणाऱ्या मतदारसंघातील मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी नाव नोंदणी करण्यासाठी 30 मार्च पर्यंत www.nvsp.in किंवा संबंधित जिल्ह्यातील निवडणूक मध्यवर्ती कार्यालयात नमुना क्र. 6 भरून द्यावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
०००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/28.3.2019  

मतदान केंद्रांवर यंदा ‘अत्यावश्यक सुविधांची’ संख्या दुप्पट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत




मेडिकल किट, सावलीची व्यवस्था, स्वयंसेवकांची मदत, लहान मुलांसाठी पाळणाघराची सुविधा


मुंबई, दि. 28 : लोकसभा निवडणुकांकरिता मतदान केंद्रांवर ‘अत्यावश्यक किमान सुविधांची’ संख्या यावर्षी दुप्पट करण्यात आली आहे. मेडिकल किट, मतदान केंद्रांवर सावलीची व्यवस्था, दिव्यांग  तसेच गर्भवती महिला मतदारांसाठी स्वयंसेवकांची मदत, लहान मुलांसाठी पाळणाघर, अंध आणि दिव्यांग मतदारांच्या वाहतुकीची व्यवस्था, रांगेचे व्यवस्थापन या सुविधा यावर्षी नव्याने करण्यात येणार आहेत.


मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी निवडणूक आयोगामार्फत विविध उपाययोजना केल्या जातात. गेल्या निवडणुकीत मतदान केंद्रांवर सुमारे सात प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये रॅम्पची व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीजेची उपलब्धता, मदत कक्ष, स्वच्छतागृहांची सुविधा या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. यावर्षी त्यामध्ये दुपटीने वाढ करुन 15 प्रकारच्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.


नव्याने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधेतील मेडिकल किटमध्ये वेदनाशामक औषध, बॅण्डेज, ओआरएस पावडर, जखमेवर लावण्यासाठी पट्टी आदी साहित्याबरोबरच प्रत्येक मतदान केंद्रावर एक वैद्यकीय सहाय्यक उपलब्ध असणार आहे. वाढत्या तापमानाची दखल घेताना मतदान केंद्रांवर महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार आणि महिलांसोबत असलेल्या लहान मुलांचा उन्हापासून बचावाकरिता, सावलीसाठी मंडप टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


मतदारांच्या सहाय्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक केली जाणार आहे. त्यामध्ये राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट आणि गाइड विद्यार्थ्यांची मदत घेतली जाईल. हे विद्यार्थी मतदार रांगेचे व्यवस्थापन करण्याबरोबरच दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी सहाय्य करतील. या स्वयंसेवकांसाठी पाणी आणि खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


महिला मतदारांसोबत आलेल्या लहान मुलांकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघराची व्यवस्था केली जाणार आहे. या ठिकाणी एक प्रशिक्षित सहायक या मुलांची काळजी घेण्यासाठी नेमण्यात येणार आहे. ज्या अंध आणि दिव्यांग मतदारांनी निवडणूक यंत्रणेकडे माहिती देऊन मतदानासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्याची मागणी केली असेल अशा मतदारांसाठी घर ते मतदान केंद्र वाहनाची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसेल तेथे खासगी वाहन भाड्याने घेऊन या मतदारांची ने-आण करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.


प्रत्येक मतदान केंद्रावर तीन रांगा असतील. त्यामध्ये एक रांग पुरुषांसाठी, दुसरी महिलांसाठी आणि तिसरी ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांसाठी असणार आहे. रांगेतील दोन महिला मतदारांनी मतदान केल्यानंतर एका पुरुष मतदाराला मतदानासाठी आत सोडले जाईल. मात्र ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना प्राधान्य देण्यात येईल.


या सोबतच मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदारांना माहिती देण्याकरिता पोस्टर्स लावणे, स्वच्छतागृहाची सुविधा, वीजेची उपलब्धता आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील.