आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवासाठी मुंबई ही रामायण कॅपिटल ठरेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

इंडोनेशियातील कलाकारांनी नृत्य आणि नाट्यातून उलगडले रामायण; आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचा समारोपमुंबई, दि. २८ : पर्यटन विभागाने आयोजित केलेला आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव दरवर्षी आयोजित व्हावा. त्यामध्ये विविध देश आपापले कलाविष्कार घेऊन सहभागी होतील. या महोत्सवासाठी मुंबई  ही रामायण कॅपिटल ठरेल. त्या माध्यमातून रामायण आणि त्यातील मूल्यांचा जगभरात प्रसार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

पर्यटन विभाग आणि एमटीडीसीच्या वतीने बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचा आज समारोप झाला, त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. महोत्सवाला प्रेक्षकांचा चौथ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इंडोनेशियातील संगार परिपूर्णा ग्रुप यांनी आज रामायणाचे अनोख्या स्वरुपात सादरीकरण केले. नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून रामायणातील विविध प्रसंगांचे सादरीकरण करुन त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.


राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पर्यटन विभागाच्या सचिव विनीता सिंगल, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, इंडोनेशियाचे कौन्सिल जनरल आर्यस सीक, संगार परिपूर्णा ग्रुपचे संचालक ई मार्डोस सिडीया आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
रामायण आणि त्यातील मूल्ये जगभरात पोहोचतील - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले, इंडोनेशिया आणि भारत हे देश सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. रामायण हा  विविध देशातील महत्त्वाचा सांस्कृतिक दुवा आहे. रामायणाची कथा ही जीवनाचा मार्ग दाखविणारी आहे. जगातील अनेक देशांमध्ये रामायण हा जीवन अनुसरणाचा भाग आहे. आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचे आयोजन करुन पर्यटन विभागाने रामायण जगापर्यंत पोहोचविले.

मुख्यमंत्री म्हणाले की, अनिष्टावर मात करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी सत्याचा मार्ग दाखविला. समाजातील लहानात लहान घटकांना सोबत घेऊन बलाढ्य शक्तीला पराभूत करता येते हे दाखवून दिले. नैतिकतेचे अधिष्ठान असेल तर विजय मिळविता येतो. विविध देशांमध्ये रामायणाच्या वेगवेगळ्या सादरीकरण पद्धती आहेत. या महोत्सवामुळे त्या अनुभवता आल्या. या अनोख्या महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि पर्यटन विभागाचे अभिनंदन केले.
पंचवटीपासून रामटेकपर्यंतच्या विविध स्थळांचा होणार विकास - मंत्री जयकुमार रावल

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यावेळी म्हणाले, इंडोनेशिया आणि भारताचे संबंध पूर्वीपासूनच अत्यंत चांगले राहिले आहेत. दृढ असे सांस्कृतिक नाते या दोन्ही देशांमध्ये आहे. रामायण महोत्सवातून या दोन्ही देशातील सांस्कृतिक संबंध अधिक वृद्धिंगत होतील. केंद्र शासनाने देशभरातील रामायण सर्किटच्या विकासाचे काम हाती घेतले आहे. रामायणाचा संदर्भ असलेली राज्यातील नाशिकमधील पंचवटीपासून विदर्भातील रामटेकपर्यंतची विविध स्थळे स्वदेश दर्शन योजनेंतर्गत विकसित करण्यात येत आहेत. या स्थळांच्या विकासासासाठी प्राथमिक टप्प्यात १२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व स्थळांचा विकास करुन जगभरातील पर्यटकांना त्याकडे आकर्षित केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

चार दिवस चाललेल्या या महोत्सवात भारतासह कंबोडिया, फिलिपाईन्स आणि इंडोनेशियातील कलाकारांनी सहभाग घेतला. महोत्सवात दररोज एका देशाने अनोख्या पद्धतीने रामायणाचे सादरीकरण केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा