लोककलांच्या वस्तूंचे संग्रहालय उभारणार- विनोद तावडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


सांस्कृतिक संचालनालयामार्फत ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान

मुंबई, दि. 28: महाराष्ट्राला समृद्ध लोककलेचा वारसा लाभला आहे. लोककलांमध्ये अनेक वाद्य, पोशाख यांचा समावेश असतो. या लोककलांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे दस्तऐवजीकरण करून या लोककला संबंधित वस्तूंची माहिती भविष्यातील युवा पिढीला करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने लोककला वस्तूंचे संग्रहालय उभारणार असल्याची घोषणा यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली.

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणारा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार सोहळा, राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान सोहळा आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त कलाकारांचा सत्कार सोहळा पु.ल.देशपांडे कला अकादमी येथील कलांगण येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्री. तावडे बोलत होते. कार्यक्रमास महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाच्या संचालिका स्वाती काळे, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आज  आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गेल्या वर्षीचे तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार विजेते मधुकर नेराळे यांच्या हस्ते यावर्षीचा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार लोकशाहीर बशीर कमरोद्दिन मोमीन (कवठेकर) यांना देण्यात आला. तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवेबद्दल श्री. मोमीन यांना राज्य शासनामार्फत जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला असून 5 लाख रुपये रोख, मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी कांताबाई सातारकर, वसंत अवसरीकर, सुलोचना नलावडे, हरिभाऊ बढे, मंगला बनसोडे, साधू रामा पाटसुते, अंकुश खाडे उर्फ बाळू, प्रभा शिवणेकर, भीमाभाऊ सांगवीकर, गंगारामबुवा कवठेकर, राधाबाई खोडे नाशिककर व मधुकर नेराळे यांना प्रदान करण्यात आलेला आहे.

श्री. तावडे यावेळी म्हणाले की, लोककला ही आपल्या राज्याचीच नव्हे तर देशाची श्रीमंती आहे. नवीन पिढीला आपल्या राज्यातील लोककला काय आहेत, त्यांची वाद्य, पोशाख, पटकथा यांच्या संबंधित माहिती मिळावी यासाठी लोककला संग्रहालय हे अतिशय महत्वाचे ठरणार आहे. या लोककला संबंधित वस्तूंच्या संग्रहालयामुळे सांस्कृतिक ऐवजाचे जतन होणार आहे. लवकरच सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने एक समिती गठीत करून या विषयावर अभ्यास करून हे संग्रहालय उभारणार असल्याचे श्री. तावडे म्हणाले. या संग्रहालयामुळे येणाऱ्या वर्षानुवर्षे तरुण पिढीला प्रेरणा मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. आपल्या महाराष्ट्रातील कलाकारांनी आपल्या कलाविष्काराने देशातच नव्हे; तर जागतिक स्तरावरही महाराष्ट्राचे नाव पोहोचवले आहे. यापुढील काळातही या कलाकारांनी आपापल्या क्षेत्रात भरीव योगदान द्यावे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यमंत्री या नात्याने आणि सर्व जनतेच्या वतीने आज पुरस्कृत करण्यात आलेल्या सर्व कलाकारांचे अभिनंदन करतो.

महाराष्ट्रातील लोककलांचे जतन आणि संवर्धन करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असून यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असून यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, अशी भावना श्री. तावडे यांनी व्यक्त केली.

कलाकार हा संस्कृतीच्या संचिताचा वाहक आहे. रंगमंचावर जे घडतं त्या घडविणाऱ्या कलाकाराला प्रकाश झोतात आणणे  आवश्यक आहे. जे कलाकार दुर्लक्षित राहिले आहेत त्यांना प्रकाश झोतात आणून त्या कलाकारांमधील विलक्षण कार्यक्षमतेला वाव देणे ही महाराष्ट्र शासनाची जबाबदारी असल्याचे श्री.तावडे म्हणाले.

सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना करण्यात आले सन्मानित

राज्य सरकारकडून दरवर्षी नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, मराठी चित्रपट, कीर्तन, शाहिरी, नृत्य, आदिवासी गिरीजन, कलादान, वाद्यसंगत, तमाशा, लोककला या क्षेत्रांत विशेष कामगिरी केलेल्या कलाकारांना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

आज  राज्य सरकारतर्फे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 12 जणांना राज्य पुरस्काराने सन्मानित केले गेले.  अभिनेते रवी पटवर्धन (नाटक), माधुरी विश्वनाथ ओक (कंठसंगीत), श्याम देशपांडे (उपशास्त्रीय संगीत), पं. प्रभाकर धाकडे (वाद्यसंगीत), अभिनेत्री उषा नाईक (मराठी चित्रपट), ह.भ.प. विनोदबुवा खोंड (कीर्तन/समाज प्रबोधन), चंद्राबाई अण्णा आवळे (तमाशा), शाहीर विजय जगताप (शाहिरी), माणिकबाई रेंडके (नृत्य), मोहन कदम (लोककला), वेणू बुकले (आदिवासी गिरीजन),  श्रीकांत धोंगडे (कलादान) यांना देण्यात आला. एक लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यांचाही करण्यात आला सत्कार

संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा कला क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मानाला जातो. दरवर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत, नाटक आणि नृत्य या कला क्षेत्रांतील निवडक कलाकारांना प्रदान केला जातो.  2017 च्या संगीत नाटक अकादमी पुरस्कार एकूण 42 कलाकारांना देण्यात आला. यामध्ये  चार कलाकार महाराष्ट्रातील आहेत. या चार जणांचा सत्कार आज करण्यात आला. लेखक, दिग्दर्शक अभिराम भडकमकर, लोककला अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि ज्येष्ठ तबलावादक पंडित योगेश सम्सी यांच्याबरोरबच भरतनाट्यम क्षेत्रातील योगदानासाठी नृत्यांगना संध्या पुरेचा यांचाही सत्कार करण्यात आला.

ओमकार सावंत यांची संकल्पना असलेला आणि अभंग रिपोस्ट यांचा बँड असलेला सुवर्ण संध्या असा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या नारकर आणि तुषार दळवी यांनी केले. तर अर्चना सावंत, निधी प्रभू, शिवशाहीर यशवंत जाधव, राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनिल केंगर, सुकन्या काळण, आशिष पाटील या कलाकारांनी यात सहभाग घेतला होता.

आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवासाठी मुंबई ही रामायण कॅपिटल ठरेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

इंडोनेशियातील कलाकारांनी नृत्य आणि नाट्यातून उलगडले रामायण; आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचा समारोपमुंबई, दि. २८ : पर्यटन विभागाने आयोजित केलेला आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव दरवर्षी आयोजित व्हावा. त्यामध्ये विविध देश आपापले कलाविष्कार घेऊन सहभागी होतील. या महोत्सवासाठी मुंबई  ही रामायण कॅपिटल ठरेल. त्या माध्यमातून रामायण आणि त्यातील मूल्यांचा जगभरात प्रसार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

पर्यटन विभाग आणि एमटीडीसीच्या वतीने बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचा आज समारोप झाला, त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. महोत्सवाला प्रेक्षकांचा चौथ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इंडोनेशियातील संगार परिपूर्णा ग्रुप यांनी आज रामायणाचे अनोख्या स्वरुपात सादरीकरण केले. नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून रामायणातील विविध प्रसंगांचे सादरीकरण करुन त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.


राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पर्यटन विभागाच्या सचिव विनीता सिंगल, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, इंडोनेशियाचे कौन्सिल जनरल आर्यस सीक, संगार परिपूर्णा ग्रुपचे संचालक ई मार्डोस सिडीया आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
रामायण आणि त्यातील मूल्ये जगभरात पोहोचतील - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले, इंडोनेशिया आणि भारत हे देश सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. रामायण हा  विविध देशातील महत्त्वाचा सांस्कृतिक दुवा आहे. रामायणाची कथा ही जीवनाचा मार्ग दाखविणारी आहे. जगातील अनेक देशांमध्ये रामायण हा जीवन अनुसरणाचा भाग आहे. आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचे आयोजन करुन पर्यटन विभागाने रामायण जगापर्यंत पोहोचविले.

मुख्यमंत्री म्हणाले की, अनिष्टावर मात करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी सत्याचा मार्ग दाखविला. समाजातील लहानात लहान घटकांना सोबत घेऊन बलाढ्य शक्तीला पराभूत करता येते हे दाखवून दिले. नैतिकतेचे अधिष्ठान असेल तर विजय मिळविता येतो. विविध देशांमध्ये रामायणाच्या वेगवेगळ्या सादरीकरण पद्धती आहेत. या महोत्सवामुळे त्या अनुभवता आल्या. या अनोख्या महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि पर्यटन विभागाचे अभिनंदन केले.
पंचवटीपासून रामटेकपर्यंतच्या विविध स्थळांचा होणार विकास - मंत्री जयकुमार रावल

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यावेळी म्हणाले, इंडोनेशिया आणि भारताचे संबंध पूर्वीपासूनच अत्यंत चांगले राहिले आहेत. दृढ असे सांस्कृतिक नाते या दोन्ही देशांमध्ये आहे. रामायण महोत्सवातून या दोन्ही देशातील सांस्कृतिक संबंध अधिक वृद्धिंगत होतील. केंद्र शासनाने देशभरातील रामायण सर्किटच्या विकासाचे काम हाती घेतले आहे. रामायणाचा संदर्भ असलेली राज्यातील नाशिकमधील पंचवटीपासून विदर्भातील रामटेकपर्यंतची विविध स्थळे स्वदेश दर्शन योजनेंतर्गत विकसित करण्यात येत आहेत. या स्थळांच्या विकासासासाठी प्राथमिक टप्प्यात १२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व स्थळांचा विकास करुन जगभरातील पर्यटकांना त्याकडे आकर्षित केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

चार दिवस चाललेल्या या महोत्सवात भारतासह कंबोडिया, फिलिपाईन्स आणि इंडोनेशियातील कलाकारांनी सहभाग घेतला. महोत्सवात दररोज एका देशाने अनोख्या पद्धतीने रामायणाचे सादरीकरण केले.

महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्री पदक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हे अन्वेषणातील गुणवत्तेसाठी गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आले आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाने आज २५ राज्य, केंद्रशासित प्रदेश व केंद्रीय तपास यंत्रणेत कार्यरत असणाऱ्या १०१ पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्री पदक जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील ११ पोलिसांचा यात समावेश आहे. मध्य प्रदेशातील ११ पोलीस अधिकारी, सीबीआयचे ९ अधिकारी तसेच राजस्थान व उत्तर प्रदेशातील प्रत्येकी ७ पोलीस अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. देशातील १२ महिला पोलीस अधिकाऱ्यांनाही गृहमंत्री पदक जाहीर झाले आहे.महाराष्ट्रातील खालील पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्री पदक जाहीर झाले आहे -
राज तिलक रोशन (पोलीस उपायुक्त), दीपक पुंडलिक देवराज (पोलीस उपायुक्त), सूरज पांडुरंग गुरव (पोलीस उपअधीक्षक), रमेश नागनाथ चोपडे (सहाय्यक पोलीस आयुक्त), दिनेश विठ्ठलराव आहेर (पोलीस निरीक्षक), शशिराज गुंडोपंत पाटोळे (पोलीस निरीक्षक), चिमाजी जगन्‍नाथ आढाव (पोलीस निरीक्षक), सूरज जयवंत पडावी (पोलीस निरीक्षक), सुनील किसन धनावडे (पोलीस निरीक्षक), सचिन मुरारी कदम (पोलीस निरीक्षक) आणि धनंजय चित्‍तरंजन पोरे (सहाय्यक पोलीस निरीक्षक)

‘डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम’ पुरस्काराने महाराष्ट्रातील ५ अधिकारी सन्मानित

1 टिप्पणीनवी दिल्ली : ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम या प्रतिष्ठित पुरस्काराने महाराष्ट्रातील ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते गौरवविण्यात आले.

येथील प्रवासी भारतीय केंद्रात 'कल्पकता आणि प्रशासन' या विषयावर दीनदयाल संशोधन संस्था आणि युनायटेड नेशन ग्लोबल काम्पेक्टच्या वतीने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम परिषदेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची अध्यक्षता उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी केली. यावेळी देशभरातील विविध विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष के.पी. बक्षी, महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामीण उद्योग बोर्डाचे अध्यक्ष विशाल चोरडिया, महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाचे आयुक्त राजीव जलोटा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन, ठाणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर या पाच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी प्रशासनामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. अब्दुल कलाम या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने २ मार्चला नाशिक येथे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 28 : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळ्याचे शनिवार, दि. 2 मार्च रोजी महाकवी कालिदास कलामंदिर नाशिक येथे आयोजन करण्यात आले आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार  सन 2018 -19, शाहू- फुले - आंबेडकर पुरस्कार सन 2017-18 व संत रविदास पुरस्कार सन 2018-19 हे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते शनिवार, दि. 2 मार्च रोजी महाकवी कालिदास कलामंदिर नाशिक येथे सायंकाळी 5 वाजता प्रदान करण्यात येणार आहेत.


या पुरस्कार वितरण सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, व नाशिकचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले असणार आहेत. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, नाशिकच्या महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे आदी उपस्थित राहणार आहेत.


या पुरस्कार प्रदान सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी 89 व्यक्ती  आणि 10 संस्था तर शाहू- फुले - आंबेडकर पुरस्कारासाठी 24 संस्था आणि  संत रविदास पुरस्कारासाठी 11 व्यक्ती आणि  एका संस्थेचा समावेश आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानभवनात मोफत रक्तचाचणी शिबिर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मंत्री, आमदारांसह 600 जणांनी केल्या चाचण्या

मुंबई, दि. 28 : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानभवनात आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून  मोफत रक्त चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात स्वतः आरोग्यमंत्र्यांसह, मंत्री, राज्यमंत्री, विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य, अधिकारी अशा सुमारे 600 जणांनी  रक्तचाचण्या करून घेतल्या. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री विजय देखमुख यांनी स्वत: रक्तचाचण्या करून शिबिराचा शुभारंभ केला. 


या शिबिरामध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनखुळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनीदेखील चाचण्या करून घेतल्या. त्याचबरोबर आमदार सर्वश्री डॉ. नीलम गोऱ्हे, विद्या चव्हाण, देवयानी  फरांदे, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्यासह 130 आमदारांनी रक्तचाचणी करून घेतली.


सार्वजनिक आरोग्य विभाग व क्रस्ना डायग्नॉस्टिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित करण्यात आले. यामध्ये सीबीसी, आरएफटी, एलएफटी, रक्तातील साखरेचे प्रमाण, एसआर कॅल्शिअम,  व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह, व्हिटॅमिन डी, थायरॉईड अशा महत्त्वपूर्ण आठ चाचण्यांसह महिलांसाठी विशेष थायरॉईड चाचणी  करण्यात आली.  क्रस्ना डायग्नॉस्टिक्सचे व्यवस्थापक कपिल देशमुख, अमित गर्जे, डॉक्टर व तंत्रज्ञ अशा 22 जणांच्या पथकाने या चाचण्या केल्या.

संजय बर्वे यांनी स्वीकारली मुंबई पोलीस आयुक्तपदाची सूत्रे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 28 : राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांनी आज मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. पोलीस आयुक्त सुबोध कुमार जायसवाल यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली.

यावेळी सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त (प्रशासन) संतोष रस्तोगी आदी उपस्थित होते. पोलीस आयुक्त जायसवाल यांची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या पदाची सूत्रे श्री. बर्वे यांच्याकडे देण्यात आली.श्री. बर्वे हे 1987 च्या बॅचचे अधिकारी असून यापूर्वी ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागात महासंचालक पदावर होते. त्यांची पहिली नियुक्ती ही नागपूर पोलीस आयुक्तालयात सहायक पोलीस आयुक्त या पदावर झाली. त्यानंतर त्यांनी मुंबई पोलीस दलात पोलीस उपायुक्त म्हणून तसेच अपर पोलीस महासंचालक प्रशासन, लोहमार्ग, राज्य गुप्तचर विभाग आदी ठिकाणी सेवा बजावली असून राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस महानिरीक्षक पदावर काम केले आहे. तसेच वर्धा येथे पोलीस अधीक्षक व सोलापूर येथे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले आहे.

सुबोध कुमार जायसवाल राज्याचे नवे पोलीस महासंचालक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 28 : राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध कुमार जायसवाल यांची नियुक्ती करण्यात आली असून आज मावळते पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. श्री. जायसवाल हे भारतीय पोलीस सेवेच्या 1985च्या तुकडीचे अधिकारी असून ते या आधी मुंबई पोलीस आयुक्त पदावर कार्यरत होते.


  
पोलीस महासंचालनालयात आयोजित कार्यक्रमात यावेळी राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त श्रीमती रश्मी शुक्ला, अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) परमवीर सिंह, अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) डॉ. प्रज्ञा सरवदे, विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलिंद भारंबे तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य विभाग औरंगाबाद उपसंचालक मंडळात विविध पदांच्या ३१० जागा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

गृहवस्त्रपाल-०३ जागा
शैक्षणिक पात्रता- १० वी पास, हाऊस किपींगचा अनुभव

भांडार नि वस्त्रपाल/ वस्त्रपाल -०५ जागा
शैक्षणिक पात्रता- १० वी, संबंधित विषयाचा अनुभव, मराठी टंकलेखन ३० शब्द प्रती मिनिट

प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी-१६जागा
शैक्षणिक पात्रता- विज्ञान पदवी, हाफकीन संस्था किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदविका किंवा बी.एससी. उपयोजित जैव-वैद्यकीय तंत्रज्ञानमधील पदवी.

प्रयोगशाळा सहायक-०३ जागा
शैक्षणिक पात्रता-१२ वी विज्ञान, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञमधील पदविका

क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी-३० जागा
शैक्षणिक पात्रता- विज्ञान पदवी किंवा क्ष किरण तंत्रज्ञ उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र, क्ष किरण सहायक किंवा तंत्रज्ञ म्हणून कामाचा पाच वर्षांचा अनुभव

रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी-०५ जागा
शैक्षणिक पात्रता- विज्ञान पदवी, हाफकीन संस्था किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदविका किंवा बी.एससी. उपयोजित जैव-वैद्यकीय तंत्रज्ञानमधील पदवी.

औषधनिर्माण अधिकारी-२१ जागा
शैक्षणिक पात्रता-१२ वी आणि डी.फार्मचे प्रमाणपत्र

आहारतज्ज्ञ-०२ जागा
शैक्षणिक पात्रता- बी.एससी. (गृह शास्त्र)

ईसीजी तंत्रज्ञ-०२ जागा
शैक्षणिक पात्रता- विज्ञान शाखेची पदवी किंवा समतूल्य पदवी

दंतयांत्रिकी-०१जागा
शैक्षणिक पात्रता-१० वी, डेंटल मेकॅनिक कोर्स

दंतआरोग्यक-०३ जागा
शैक्षणिक पात्रता- १० वी, डेंटल हायजेनिस्ट परीक्षा उत्तीर्ण.

अधिपरिचारिका-१८५ जागा
शैक्षणिक पात्रता- सामान्य परिचर्या व प्रसविका प्रशिक्षण पदविका किंवा बी.एससी. नर्सिंग

दूरध्वनीचालक-०५ जागा
शैक्षणिक पात्रता- १० वी, मराठी, हिंदी, इंग्रजी बोलता यावे.

वाहनचालक-०२ जागा
शैक्षणिक पात्रता- १० वी, जड वाहन परवाना किंवा कार, जीप परवाना, तीन वर्षांचा अनुभव

शिंपी-०३ जागा
शैक्षणिक पात्रता- १० वी, टेलरिंग आणि कटिंगमधील प्रमाणपत्र.

नळ कारागीर-०२ जागा
शैक्षणिक पात्रता- १० वी, प्लंबर प्रशिक्षण, दोन वर्षांचा अनुभव

सुतार-०२ जागा
शैक्षणिक पात्रता- सुतारकामाचे मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र

अभिलेखापाल-०५ जागा
शैक्षणिक पात्रता- पदवी, लायब्ररी सायन्समधील पदविका, मराठी आणि परदेशीय भाषेचे ज्ञान, ग्रंथालय कामाचा अनुभव.

वीजतंत्री-०४ जागा
शैक्षणिक पात्रता- १० वी, वीजतंत्री प्रशिक्षण पूर्ण.

वरिष्ठ लिपिक-११ जागा
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेची पदवी.


ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : २६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०१९

अधिक माहितीसाठी :  https://bit.ly/2IzcP3

ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2KO6NZw

➖➖

शासकीय नोकरीच्या संधी, भरती प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा आदींची अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहिती जाणून घेण्याकरिता आमचे 'महासंवाद : महाराष्ट्र शासन' हे टेलिग्राम चॅनल JOIN करा.. http://t.me/MahaDGIPR