चांदा ते बांदा योजनेला गती देण्याचे वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

राज्यस्तरीय समितीची बैठक संपन्न


मुंबई, दि. 8 : चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध संसाधनांचा नियोजनबद्ध वापर करण्यासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी चांदा ते बांदाही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामांना गती द्यावी, अशा सूचना वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या.

चांदा ते बांदायोजनेंतर्गत सन 2018-19 च्या वार्षिक‍ कृती आराखड्यातील कामांना आणि नाविन्यपूर्ण कामांच्या मार्गदर्शक सूचनांना मंजुरी देण्यासंदर्भात श्री.केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची बैठक आज मंत्रालयात झाली.


या बैठकीला नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. नीलिमा केरकट्टा, चांदा ते बांदा योजनेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


श्री. केसरकर म्हणाले, चांदा ते बांदा योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांना गती देऊन तात्काळ अंमलबजावणी करावी. ज्या योजना जिल्हा स्तरावर मान्यता देऊन राबविणे शक्य आहे, त्यांना जिल्हा स्तरावरच मान्यता द्यावी. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीस विलंब होणार नाही. उद्या मंत्रालयात संबंधित विभागासोबत सविस्तर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात येत आहे. या बैठकीत सर्व विषयांची सविस्तर चर्चा करण्यात येईल.


पशुसंवर्धन विभागांतर्गत कुक्कुटपालन, देशी गायी,  शेती गट वाटप योजनांना मंजुरी, महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत ब्लँकेट व सतरंजी तसेच कापडी पिशव्या तयार करणे या कामांच्या मार्गदर्शक सूचनांना मान्यता, समूह सिंचन विहिरीबाबत नाविन्यपूर्ण योजना म्हणून मंजुरी, भद्रावती येथील डोलारा तलावाचे सौंदर्यीकरण करणे या कामाला प्रशासकीय मान्यता, चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समन्वय कक्षातील रिक्त पद भरणे, चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्न सुरक्षा दल प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता, चांदा ते बांदा योजनेअंतर्गत सन 2018-19 करिता आंतरपीक पद्धतीद्वारा मसाला पिकाच्या नाविन्यपूर्ण प्रस्तावासह वरील विषयांवर सविस्तर चर्चा करुन राज्य समन्वय समितीने मान्यता दिली.


या बैठकीत सामुदायिक सुविधा केंद्र तयार करणे व क्षमता बांधणी करणे, धान्य साठवणुकीकरिता गोडाऊन, वे ब्रिजची स्थापना करणे, शेडनेट हाऊस उभारणी, गोदाम बांधकाम करणे, पोंभुर्णा (जि.चंद्रपूर) येथे साईनेज व माहितीदर्शक फलक तयार करणे, मत्स्यपालन सहकारी संस्थांना मासळीकरिता साधनांचा पुरवठा करणे, बल्लारपूर, पोंभुर्णा, गोंडपिंपरी आणि राजुरा तालुक्यांमध्ये सोलार चरखा क्लस्टर तयार करणे, स्वयं सहाय्य बचत गटातील महिलांना सामूहिक वैयक्तिक योजना निर्मितीकरिता सोलार चरखे आणि कोन वाइंडिंग मशीन वाटप करणे, बांबू हंडी क्राफ्ट अँड आर्ट युनिट या संकल्पनेद्वारे सामूहिक उपयोगिता केंद्राचे विसापूर, बल्लारपूर, पोंभुर्णा, चिचपल्ली, चंद्रपूर, मूल व चिमूरचे विस्तारीकरण अंतर्गत बांबू साठा केंद्रांची निर्मिती करणे, चंद्रपूर अगरबत्ती प्रकल्प, महिला बचत गट बांबू लागवड योजना, चंद्रपूर वन विभागातील संयुक्त वनव्यवस्थापन अंतर्गत मासे उत्पादन प्रकल्प राबविणे, ब्रम्हपुरी वन विभागातील संयुक्त वन व्यवस्थापन अंतर्गत गावातील लोकांचे राहणीमान उंचावण्याकरिता व रोजगार उपलब्धतेकरिता मासे उत्पादन प्रकल्प राबविणे, मत्स्योत्पादन विकास प्रकल्प व कौशल्य प्रशिक्षण, बोटॅनिकल गार्डन विसापूर येथे लेझर शो व्यवस्था करणे, मधुमक्षिका पालन प्रकल्प, विंधन विहीर खोदून विद्युत पंप बसवणे, कूपनलिका खोदून विद्युत पंप बसविणे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा