नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

नाशिक मास रॅपिड ट्रान्सिट सिस्टिमचा आराखडा तयार करण्याचे महामेट्रोला निर्देश
मुंबई, दि. 1 : नागपूर शहराचा मध्य भाग व उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजुरी दिली.


मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज महामेट्रोच्या वतीने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासमोर नागपूर मेट्रो टप्पा चे सादरीकरण करण्यात आले. यावेळी ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सुधीर पारवे आदी उपस्थित होते.


नागपूर शहरामध्ये मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात नागपूर शहराचा मध्यभाग व उपनगर जोडले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी सुमारे 11 हजार 216 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा हिस्साही असणार आहे.नागपूर मेट्रो टप्पा 2 ची वैशिष्ट्ये
नागपूर मेट्रो टप्पा 2 हा 48.3 किमीचा आहे.
यामध्ये एकूण 35 स्थानिकांचा समावेश
मेट्रो 1 ए मिहान ते औद्योगिक विकास महामंडळ ईएसआर (18.7 किमी)
मेट्रो 2 ए ऑटोमोटिव्ह स्क्वेअर ते कन्हान नदी (13 किमी)
मेट्रो 3 ए लोकमान्य नगर ते हिंगणा (6.6 किमी)
मेट्रो 4 ए पार्डी ते ट्रान्सपोर्ट नगर (5.5 किमी)
मेट्रो 5   - वासुदेव नगर ते वाडी (4.5 किमी)       
टप्पा 2 मुळे 2024 मध्ये 2.9 लाख  प्रवाशी प्रतिदिवस वाहतूक क्षमता निर्माण होणार आहे.
टप्पा 1 व 2 मुळे एकूण 5.5 लाख प्रवाशी प्रतिदिवस वाहतूक क्षमता निर्माण होणार आहे.


नाशिकमधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमआरटी यंत्रणा
नाशिक शहरामधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मास रॅपिड ट्रान्सिट सिस्टिमचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यावेळी महामेट्रोला दिले.


नाशिक शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी वेगळा आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. वाहतूक कोंडी टाळून सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढावा, यासाठी मास रॅपिड ट्रान्सिट सिस्टिमचा वापर नाशिकमध्ये होणार आहे.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात संपन्न झाली.


प्रारंभी नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्त शीतल उगले यांनी सादरीकरणातून सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली. प्राधिकरणाच्या नव्या लोगोबाबतही यावेळी चर्चा झाली. तसेच मागील बैठकीच्या इतिवृत्तास आणि अनुपालन अहवालासही मान्यता देण्यात आली.


वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यू. पी. एस. मदान, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, नागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, एमआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पी. अन्बलगन, नागपूर मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आदी यावेळी उपस्थित होते.
०००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/1.1.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा