मुंबई शहर जिल्हा वार्षिक योजनेच्या २०१९-२० च्या १२० कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 8 : मुंबई शहरासाठीच्या सन 2019-20च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत एकूण 120 कोटी 61 लाख रूपयांचा प्रारूप आराखड्यास मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. यात सर्वसाधारण योजनेसाठी 101 कोटी 69 लाख, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 18 कोटी 76 लाख, आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजनेसाठी 16 कोटींचा आराखडा समिती समोर मांडण्यात आला होता.

उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला पालक सचिव भूषण गगराणी, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता, मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे उपस्थित होते. तसेच बेस्ट, मुंबई पोर्ट ट्रस्ट, म्हाडा, महानगरपालिकेचे व इतर वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मुंबईतील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी होणार वाहनतळ प्राधिकरण

मुंबई शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामुळे पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. पार्किंगच्या समस्येवर मात करण्यासाठी महापालिकेने नियोजन केले असून लवकरच मुंबईसाठी  वाहनतळ प्राधिकरण (पार्किंग ऑथोरिटी) स्थापन केले जाणार आहे. यासाठी  काही नियोजन अधिकारी नियुक्त करुन ते पार्किंगच्या ठिकाणांची पाहणी करणार आहेत. मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी ही माहिती दिली.

आमदार किरण पावस्कर यांनी रस्त्यावरील वाहने आणि पार्किंगच्या समस्येवर प्रश्न उपस्थित केला. त्यावर आयुक्त मेहता यांनी सांगितले, शहरात वाहनांचे पार्किंग ही गंभीर समस्या आहे. काही इमारतींमध्ये पार्किंसाठी सुविधा आहेत, मात्र त्यांची उंची वाढवण्यास परवानगी मिळत नाही. पार्किंगच्या जागेसाठी उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्याशिवाय पार्किंगच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी पार्किंग ऑथोरिटी नेमली जाणार आहे. हे प्राधिकरण शहरातील पार्किंगच्या समस्येवर काम करेल. ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे, किंवा पार्किंगसाठी अडचणी येत आहेत, त्या ठिकाणचा अभ्यास करण्यासाठी 24 नियोजन अधिकारी नेमले आहेत.


बैठकीतील ठळक सूचना

·       रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत काही ठिकाणी पार्किंग झोन राखीव ठेवण्याची सूचना काही लोकप्रतिनिधींनी केली. तसेच शिवाजी पार्क परिसरात भूमिगत पार्किंग सेंटर सुरू करण्याची सूचना यावेळी केली. परंतु हे मैदान हेरिटज असल्याने या ठिकाणी पार्किंग उभारण्यास नकार देण्यात आला.

·       दादर परिसरात पिंडदानासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. समुद्रात जाताना अनेक अडथळे येतात. त्यामुळे त्या ठिकाणी पर्यायी खोली तयार करण्याची सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी केली.

·       महापालिका इमारतीसमोर असलेल्या सेल्फी पॉइंटसमोर सीएसटी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याची सूचना विशेष निमंत्रित सदस्य अमोल जाधव यांनी केली.

·       माहीम चौपाटीचे सुशोभीकरण करताना त्या ठिकाणी असलेल्या बांबूच्या वखारीमुळे समुद्राचे नयनरम्य दृष्य न्याहाळता येत नाही. येथील अतिक्रमणे काढण्याची कारवाई करण्याची सूचना यावेळी देण्यात आली.

·       दादर परिसरात फेरीवाल्यामुळे सतत वाहतूक कोंडी होत असून ती दूर करण्याची सूचना आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी केली. चोर बाजार परिसरातील नागरिकांना हटवले जात नाही. तरी येथील फेरीवाल्यांना हॉकर्स प्लाझामध्ये हलवण्याची सूचना करण्यात आली.

·       अप्पर पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी चार नवीन पोलिस ठाणे उभारण्यासाठी निधी देण्याची विनंती केली.

·       याशिवाय म्हाडा जुन्या इमारतीची पुनर्विकास करणार का असाही प्रश्न काही नगरसेविकांनी उपस्थित केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा