यवतमाळ नगरपरिषदेला व्यापारी संकुलासाठी जागा देण्याच्या कार्यवाहीला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 8 : यवतमाळ नगरपरिषदेला व्यापारी संकुलासाठी टी.बी. हॉस्पिटल जवळची जागा देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.


यवतमाळ नगर परिषदेला टी.बी. हॉस्पिटलजवळील जागा महसूल विभागाकडून व्यापारी केंद्रासाठी देण्यासंदर्भात आज मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी यवतमाळचे पालकमंत्री तथा सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, नगर परिषद संचालनालयाचे संचालक एम. संकरनारायणन, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा आदी यावेळी उपस्थित होते. राज्यमंत्री श्री. येरावार यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.


मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नगर परिषदेला महसूल विभागाकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नगरविकास विभागाने ही जागा नगर परिषदेच्या ताब्यात देण्याची कार्यवाही करावी. तसेच नगर परिषदेकडून सविस्तर प्रस्ताव आल्यानंतर व्यापारी संकुलाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी मंजुरी देण्याची कार्यवाही करावी.


श्री. येरावार म्हणाले, नगरपरिषदेने जागा ताब्यात घेऊन इमारत बांधकामासाठी निविदा प्रक्रियेसंबंधीचा प्रस्ताव येत्या आठ दिवसांत नगरविकास विभागाकडे द्यावा.
०००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/8.1.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा