यवतमाळ पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने मार्गी लावण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

यवतमाळ शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अमृत योजनेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. 8 : यवतमाळ शहराला पाणीपुरवठा प्रकल्पासाठी अमृत योजनेतून करण्यात येत असलेल्या जलवाहिनीचे काम येत्या मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी कामांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.


यवतमाळ शहराच्या पाणीपुरवठा योजनेला अमृत योजनेतून मान्यता देण्यात आली आहे. या योजनेची आढावा बैठक आज मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी यवतमाळचे पालकमंत्री तथा सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी. वेलरासू आदी यावेळी उपस्थित होते.


मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, यवतमाळ शहराला व समाविष्ट आठ गावांना बेंबळा धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेतून मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेतून आतापर्यंत 52 टक्के काम पूर्ण झाले आहे. यवतमाळमधील टंचाई परिस्थिती पाहता शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी जलवाहिनीची कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी नियोजन करण्यात यावे.


श्री. येरावार म्हणाले, पाणीपुरवठा योजनेचे काम जलवाहिनीअभावी रखडले आहे. त्यामुळे पाईप पुरवठा करणाऱ्या संबंधित कंपनीने तातडीने पाईप पुरवठा करावा, जेणेकरून काम लवकर पूर्ण करता येईल.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/8.1.2019
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा