राजभवनावर अवतरली आदिवासींची वारली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
वारली म्हटले की आठवते आदिवासींची कलाकृती. देश-विदेशातील लोकांच्या मनात भरलेली ही कला. आपल्या विशिष्ट शैलीने तयार झालेले हे पेंटींग्ज पाहणे म्हणजे मनमोहकच. या वारली कलाकृतींना राजभवनच्या संरक्षण भिंतीवर अवतरण्याचे भाग्य लाभले आहे.


मलबार हिल सारख्या उच्चभ्रू वस्तीत असलेले राजभवन, मा.राज्यपाल महोदयांचे निवासस्थान, ही एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वास्तू. मलबार हिलकडे जाताना वाळकेश्वर रोडवर राजभवनचे एक प्रवेशद्वार आहे. आणि त्यानंतर सुरु होते राजभवनची संरक्षक भिंत. महत्त्वाची शासकीय इमारत म्हणून या संरक्षण भिंतीवर कोठेही पोस्टरबाजी न झाल्याने ही पांढरी शुभ्र भिंत राजभवनच्या भव्य-दिव्यतेत भर टाकायची. पण आता या संरक्षक भिंतीवर पांढऱ्या रंगाऐवजी आदिवासींच्या वारलीचे आच्छादन झाल्याने या भिंतीचे सौंदर्य व राजभवनच्या भव्यदिव्यतेत अधिक भर पडली. आर्टदेश या संस्थेच्या माध्यमातून जे.जे. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या भिंतीवर संपूर्ण मुंबानगरीचे दर्शन घडविल्याचे आपणास दिसते. आपल्या वारली चित्रकलेद्वारे या चित्रकारांनी संपूर्ण भिंतीवर मुंबईच्या ऐतिहासिक स्थळांना वारली कलाप्रकारात चितारले आहे.


यात त्यांनी गेट वे ऑफ इंडिया, मुंबईचा डबेवाला, क्रॉफर्ड मार्केट, मुंबईची ट्रेन, घारापुरी लेणी, वर्ल्ड ट्रेड सेंटर, नरिमन पॉईंट, महानगरपालिका, फाऊंटन, काळा घोडा, म्युझियम, टाऊन हॉल, हॉर्निमन सर्कल, दलाल स्ट्रीट, ससून डॉक, मुंबई उच्च न्यायालय, चर्चगेट, ब्रेबॉर्न स्टेडियम, फॅशन स्ट्रीट, नाना चौक, मत्स्यालय, शेअर मार्केट, माझगाव डॉक, बाणगंगा, हँगिंग गार्डन, रेसकोर्स, वरळी सी लिंक, वांद्रे स्टेशन, आंतराष्ट्रीय विमानतळ असे 69 पॅनल यात तयार केले आहेत.


या चितारलेल्या अप्रतिम कलाकृतींची लांबी जवळपास एक किलोमीटर आहे. वारली कलाकृतीच्या माध्यमातून साकारलेल्या या चित्रकृतीत एक महत्त्वाची थीम दिली असल्याचे आर्ट देश फाऊंडेशनचे गौतम पाटोळे यांनी सांगितले. 16 कलाकारांनी ही चित्रे साकारली आहेत. या थीममध्ये सुरुवातीच्या पाच पॅनेलमध्ये वारली जनजीवन दर्शविले आहे. दूर गावातील आदिवासी मुंबई शहरात येतो आणि त्याला मुंबईचे विविध ठिकाणांचे दर्शन होते, अशी ही संकल्पना आहे. यातील प्रत्येक चित्रकृतीत पिवळ्या रंगाच्या माध्यमातून आदिवासी कलाकारांनी अधोरेखित केली आहे. महाराष्ट्राच्या आदिवासी भागातील वारली या महत्त्वपूर्ण कलेचे दर्शन मुंबईकरांना व्हावे यासाठीचा हा अट्टाहास आहे. मा.राज्यपाल महोदयांनी देखील प्रत्यक्ष या सर्व चित्रकृतींची पाहणी करुन कलाकारांचे कौतुक केले आणि त्यांच्या कलेस प्रोत्साहन दिले.


महानगरपालिकेचे अधिकारी आणि कलावंत मंडळी यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही संरक्षक भिंत वारलीमय झाली. एखाद्या शासकीय वास्तूचा इतका सुरेख उपयोग करुन शहराच्या सौंदर्यात वाढ करण्याचा आगळा वेगळा उपक्रम आहे. केवळ सौंदर्यात वाढ नसून आपल्या आदिवासी बांधवांच्या वारली कलेला राजभवनवर दर्शविण्याचा एक अनोखा प्रयोग आहे.

- डॉ. राजू पाटोदकर (9892108365)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा