ग्राहकांच्या तक्रार निवारणास प्राधान्य द्या - शिधावाटप नियंत्रक दिलीप शिंदे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची आढावा बैठक संपन्न


मुंबई, दि. 8 : ग्राहकांच्या तक्रारीचे तात्काळ निराकरण करून त्यांचे  समाधान करावे अशा सूचना जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष तथा मुंबई शिधावाटप क्षेत्राचे नियंत्रक दिलीप शिंदे यांनी दिल्या. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन, वैधमापनशास्त्र ,महानगर टेलिफोन, बेस्ट, आर्थिक गुन्हे नियंत्रण आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रतिनिधी तसेच इतर शासकीय आणि अशासकीय प्रतिनिधी उपस्थित होते.


यावेळी मागील महिन्यातील शिल्लक असलेल्या तक्रारींचा तसेच नव्याने आलेल्या, निकाली काढलेल्या आणि प्रलंबित तक्रारींचा आढावा घेण्यात आला. मुंबई शहरात सुरु असलेल्या मेट्रो आणि इतर कामांमुळे महानगर टेलिफोन निगमकडे ब्रॉडबॅण्ड (7253) आणि लॅण्डलाईनच्या (13226) सर्वाधिक तक्रारी शिल्लक असल्याने यासंदर्भात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल सादर करावा असे निर्देश श्री. शिंदे यांनी उपस्थित प्रतिनिधींना दिले.


बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वाटप सुरु केल्यामुळे केवळ मुंबई आणि ठाणे क्षेत्रात सुमारे 100 कोटी रुपयांची बचत झाली आहे, तसेच कोणत्याही शिधावाटप दुकानांमधून धान्य घेण्याची मुभा पोर्टेबिलिटीअंतर्गत देण्यात आल्यानंतर गेल्या महिन्यात 1 लाख 42 हजार कार्डधारकांनी याचा लाभ घेतला असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. शिधावाटप दुकानांवर माहिती फलक लावणे आवश्यक आहे. तसेच लाभार्थ्यांनी सामानाची पोचपावती घेणे आवश्यक आहे, याबाबतची जनजागृती करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा