महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी एक लाख रुपये थेट कर्ज योजना - अध्यक्ष राजा सरवदे यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 4 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी एक लाख रुपये थेट कर्ज योजना सुरु केली असून या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक हजार लाभार्थ्यांना फायदा होणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष राजा (उर्फ) सुधाकर सरवदे यांनी दिली.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने कर्ज योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री.सरवदे बोलत होते. यावेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक के. बी. फंड उपस्थित होते.

यावेळी श्री.सरवदे म्हणाले, महामंडळाच्या एक लाख रुपये थेट कर्ज योजनेतून एक हजार लाभार्थ्यांना मार्च पर्यंत कर्ज योजना मंजूर केली जाईल. एक लाख रुपये थेट कर्ज योजनेअंतर्गत महामंडळामार्फत रु.85 हजार चे कर्ज 4% व्याजदराने, शासनाचे अनुदान रु. 10 हजार व लाभार्थ्यांचा सहभाग रु. 5 हजार असे राहील. महामंडळाचे जिल्हास्तरावरील व्यवस्थापक कार्यालयास कर्ज मंजुरीचे व अंमलबजावणीचे संपूर्ण अधिकार राहतील. कर्ज प्रकरणे विभागीय कार्यालय यांच्याकडे तसेच राज्यस्तरीय कार्यालयास पाठविण्याची गरज नाही. अर्जदारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येतील अथवा अर्ज व कागदपत्रे रजिस्टर ए.डी. टपालाने पाठविता येतील किंवा समक्ष जिल्हा व्यवस्थापक यांचे कार्यालयात दाखल करता येतील. अर्जा सोबतचे पुरावे कागदपत्रांची संख्या कमी करुन पद्धत सरळ सोपी व सुलभ केली आहे. संस्थांची ना हरकत प्रमाणपत्रे, विविध परवाने, शासकीय जामीनदार इ. आवश्यकता नाही.

प्रत्येक जिल्ह्याचे उद्दिष्ट इतके लाभार्थी निवड संगणकाचे माध्यमातून पारदर्शी पद्धतीने करण्यात येईल. महामंडळाकडून कौशल्य विकास प्रशिक्षण व उद्योग व्यवसायाबाबत प्रशिक्षण घेतलेल्या मुला / मुलींसाठी प्राधान्य राहील. लाभार्थ्यांनी 3 वर्ष मुदतीचे आत कर्ज व व्याज परतफेड केल्यास पुन्हा रु. 85 हजार कर्जासाठी पात्र व प्राधान्य देण्यात येईल.


राज्य शासनाने महामंडळासाठी 135 कोटी रुपयांची कर्ज हमी मंजूर केलेली आहे. महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी उत्पन्न मर्यादा एक लाख रुपये आहे. ती मर्यादा तीन लाख रुपये करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. तसेच केंद्रीय महामंडळाच्या मुदती कर्ज योजनेंतर्गत अर्जदारास 2 रु. हमी शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे अर्जदारास जादा रक्कम भरणा करावी लागते. ही बाब लक्षात घेता हमी शुल्काचा दर रु.2 वरुन 0.50 पैसे करण्यात आला असल्याची माहिती श्री.सरवदे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा