मॉरिशस, महाराष्ट्राच्या परस्पर सहकार्यातून विविध क्षेत्रात संयुक्त प्रकल्पांच्या संधी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद्र जुगन्नाथ यांच्या सदिच्छा भेटीत चर्चामुंबई, दि. 25 :- मॉरिशस आणि महाराष्ट्रादरम्यान सहकार्य प्रस्थापित करण्यातून अनेकविध क्षेत्रात संयुक्त प्रकल्प साकारण्याच्या अनेक संधी निर्माण होतील, अशा आश्वासक शब्दांत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद्र जुगन्नाथ यांचे स्वागत केले.

भारत दौऱ्यावर आणि महाराष्ट्राच्या विशेष भेटीवर आलेल्या प्रधानमंत्री श्री. जुगन्नाथ यांची मुख्यमंत्र्यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत श्री. फडणवीस बोलत होते. याप्रसंगी मॉरीशसचे तंत्रज्ञान, संचार आणि नविनतामंत्री योगिदा स्वंमज्ञान, कला आणि सांस्कृतिकमंत्री पृथ्वीराजसिंग रूपन, शिक्षण आणि मानव संसाधनमंत्री श्रीमती लिलादेवी लुच्छमन आदींसह शिष्टमंडळातील वरिष्ठ अधिकारी, तसेच राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासात राज्यांनी स्वयंप्ररेणेतून विविध देशांशी सौहार्द प्रस्थापित करून, विकासात्मक प्रकल्प राबविण्यास प्रोत्साहन दिले आहे. महाराष्ट्र शिक्षण, तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण-संशोधन आणि चित्रपट निर्मिती, पर्यटन यांसह विविध क्षेत्रात अभिनव प्रकल्प राबविण्यात आघाडीवर आहे. या अनुषंगाने मॉरीशसशी सहकार्य प्रस्थापित करून अनेक प्रकल्पांना संयुक्तपणे राबविता येईल. यासाठी अशा संकल्पनांचे महाराष्ट्र स्वागतच करेल.
मॉरिशसचे प्रधानमंत्री श्री. जुगन्नाथ यांनीही महाराष्ट्र एक समृद्ध राज्य असल्याचे गौरवोद्गार काढले. औद्योगिक, व्यापार तसेच पर्यटन, चित्रपट निर्मिती अशा क्षेत्रात संयुक्तपणे प्रयत्न करण्याबाबत सकारात्मक असल्याचेही नमूद केले.
यावेळी उपस्थित मॉरिशसचे मंत्री तसेच राज्याचे मुख्य सचिव श्री. जैन यांच्यासह सचिवांनी  चर्चेत सहभाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा