मुंबई शहर जिल्ह्यात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 5 : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) व व्हीव्हीपॅट यंत्रांविषयी जनजागृती मोहीम मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ नेहरु तारांगण येथे करण्यात आला, अशी माहिती जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी उपयोगात आणावयाच्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा सर्वंकष प्रसार, प्रसिद्धी व जनजागृती मोहीम हाती घेण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यात दि. 25 जानेवारी 2019 पर्यंत मोहीम राबविण्यात येणार आहे. जनजागृतीचा शुभारंभ वरळी मतदार संघातील नेहरु तारांगण येथे आयोजित हौसिंग सोसायटी शो-2018 पासून करण्यात आला.

जनजागृती मोहिमेअंतर्गत कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी कुलाबा विधानसभा मतदार संघात के.सी.महाविद्यालय (चर्चगेट) येथील जनजागृती कार्यक्रमास भेट देऊन प्रशिक्षण देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सुमारे 225 विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. महाविद्यालयामधील प्राध्यापक, कर्मचारी वृंद तसेच नवीन मतदारांनी उत्साहाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत माहिती करुन घेतली. त्यानंतर डॉ.पाटील यांनी मलबार हिल विधानसभा मतदार संघअंतर्गत चर्नीरोड येथील शासकीय मुद्रण कार्यालय येथील जनजागृती मोहिमेस भेट दिली. या ठिकाणी मुद्रणालय, उपाहारगृह तसेच जवळपासच्या कार्यालयातील 180 हून अधिक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मुंबई शहर जिल्ह्यातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृतीच्या मोहिमेस सर्व स्तरातील मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्रांबाबत माहिती घेऊन मतदार आपल्या शंकांचे निरसन करुन घेत आहेत.


मुंबई शहर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सर्व जिल्ह्याभरात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी व कर्मचारी या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत, अशीही माहिती श्री.जोंधळे यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा